मिर्टेलीझ : (मिर्टिफ्लोरी म. जंबुल गण). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बीजांत दोन दलिका असलेल्या वनस्पतींच्या) वर्गातील हा एक गण असून यामध्ये अंतर्भूत असलेल्या वनस्पती-कुलांच्या तपशिलाबाबत मतभेद आहेत. ए. बी. रेंडेल यांच्या मताप्रमाणे यात पुढील तेरा कुले आहेत : मिर्टेसी, लेसिथिडेसी, काँब्रेटेसी, प्युनिकेसी, मेलॅस्टोमेसी, ऱ्हायझोफोरेसी, सोनेरॅशिएसी, लिथ्रेसी, ऑनेग्रेसी, एलेग्नेसी, थायमेलेसी, हॅलोरॅगॅसी व हिप्पुरिडेसी. ए. एंग्लर व डायल्स यांनी तेवीस कुले मानून त्यांची वाटणी थायमेलिनी, मिर्टेनी, हिप्पुरिडिनी व सायनोमोरिनी या चार उपगणांत केली आहे. जे. हचिन्सन यांनी मिर्टेलीझ गणात फक्त सातच कुले घातली आहेत. थीएलीझ  [⟶ थीएसी] व गटिफेरेलीझ [⟶ गटिफेरी] या दोन गणांशी मिर्टेलीझ गणाचे साम्य आहे.

मिर्टेलीझ गणातील बहुतेक वनस्पती झुडपे, वृक्ष व क्वचित ⇨ ओषधी आहेत. पाने काहींत प्रपिंडचित्रित [उडून जाणाऱ्या तेलाचे ठिपके असलेली ⟶ प्रपिंडे], समोरासमोर, परंतु कधी एकाआड एक असतात. फुले अरसमात्र (उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी), द्विलिंगी, मंडलित (फुलातील मित्र अवयवांची वर्तुळे असलेली) परिकिंज अथवा अपिकिंज आणि चतुर्भागी किंवा पंचभागी असतात तो भाग [⟶ फूल], पुष्पस्थली (देठावरील पुष्पदले जेथे चिकटलेली असतात तो भाग) पेल्याप्रमाणे असून केसरदले थोडी किंवा असंख्य आणि किंजपुट अर्ध किंवा पूर्ण अधःस्थ असतो. काही जातींच्या खोडात अंतःप्रकाष्ठी परिकाष्ठ [⟶ शारीर, वनस्पतींचे महालता] अथवा प्रकाष्ठाने वेढलेले परिकाष्ठ असते. जांभूळ, हिरडा, बेहेडा, अर्जुन, डाळिंब, अंजन इ. आणि काही कच्छ वनस्पती [⟶ वनश्री, कच्छ] या गणातील कुलांत आहेत त्या व इतर कित्येक वनस्पती माणसाने उपयोगात आणल्या आहेत.

संदर्भ : 1. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

             2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II. Cambridge, 1963.

दोंदे, वि. पं. परांडेकर, शं. आ.