रोझेसी : (गुलाब किल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨रोझेलीझ या गणातील एक कुल. यामध्ये जे. सी. विलिस यांच्या मते सु. १०० प्रजाती (डब्ल्यू. ओ. फोक : ८९ प्रजाती ए. बी. रेंडेल : ९० प्रजाती जी. एच्. एम्. लॉरेन्स : ११५ प्रजाती) आणि २,००० जाती (लॉरेन्स : ३,२०० जाती) असून त्यांचा प्रसार सर्वत्र आहे तथापि मुख्यतः उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण प्रदेशांत (तसेच पू. आशिया, पू. अमेरिका आणि यूरोप येथे) विशेष आहे. हिमालयात काही प्रजातींतील अनेक जाती आढळतात. सुपरिचित ⇨ गुलाब पुष्पामुळे व सफरचंद, जरदाळू, बदाम, स्ट्रॉबेरी, लोक्वॉट, नासपती, अलुबुखार, पद्मक, रासबेरी, चेरी इत्यादींच्या खाद्य फळांमुळे या कुलाला महत्त्व आले आहे. यातील वनस्पती ओषधीय [⟶ ओषधि], वेली, झुडपे व लहानमोठे वृक्ष असून पाने साधी किंवा संयुक्त, एकाआड एक, सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली) असतात. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, बहुधा पंचभागी (क्वचित ३-८ अथवा अधिक भाग प्रत्येक मंडलात असलेली), अरसमात्र (कोणत्याही उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी), क्वचित असमात्र (उभ्या पातळीने दोन सारखे भाग न होणारी) असून त्यांतील पुष्पदलांची बैठक (पुष्पस्थली) सपाट किंवा पोकळ व कधी किंजपुटास चिकटलेली असते. संदले (पाकळ्यांखालच्या भाग) व प्रदले (पाकळ्या) सुटी असतात (क्वचित पाकळ्या नसतात) केसरदले (पुं-केसर) त्यांच्या २-४ पट किंवा अधिक पट, सुटी आणि कळीमध्ये आत वळलेली असतात किंजदले संदलांइतकी किंवा त्यांच्या २-३ पट किंवा अनेक (क्वचित एकच) सुटी किंवा पोकळ पुष्पस्थलीस आतून चिकटलेली असतात. ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात एक किंवा दोन बीजके (बीजपूर्व अवस्था) असतात [⟶ फूल]. फळ विविध प्रकारचे [उदा., घोसफळ, पेटिका, कृत्स्‍न, मृदू, अश्मगर्मी अथवा आक्रान्त प्रकारचे ⟶ फळ]. बिया बहुधा अपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश नसलेल्या) असतात. या कुलाचे ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलाशी असलेले साम्य लक्षात घेऊन त्यांमध्ये आप्तभाव असल्याचे लक्षात येते. रोझेसी कुलाची सहा उपकुलांत विभागणी केलेली आढळते.

सदर्भ : Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

परांडेकर, शं. आ.