कारगोळ : (कापशी, रानआंबडा हिं.बंदुमानू क. कडु बाजा, बेंडकार्का, किरूहळ्ळे सं.जीवंती इं.इंडियन नेटल ट्री, चारकोल ट्री लॅ.ट्रेमा ओरिएंटॅलीस कुल-उल्मेसी). हा अल्पायुषी पण जलद वाढणारा, सदापर्णी, ७·५–९ मी.उंच व ०·५–०·९ मी. घेराचा वृक्ष, सामान्यतः भारतात सर्वत्र आढळणारा (विशेषतः उत्तर कारवारात व कोकणात) असून त्याची साल करडी, केशहीन व वल्करंध्रयुक्त (परित्वचेतील सूक्ष्म छिद्रयुक्त) असते. कोवळ्या फांद्या लवदार पाने लंबवर्तुळाकृती, एकाआड एक, तळास असमान, दंतुर, तीन मुख्य शिरांची, साधारण खरबरीत, खालून पांढुरकी फुले हिरवट, अवृंत (बिनदेठाची), एकलिंगी, बहुयुतिक व कक्षास्थ (बगलेतील) वल्लरीवर वर्षभर येतात [→फूल]  फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), फार लहान, गोलाकार, काळे, खाद्य व एकबीजी असते. लाकूड फिकट तपकिरी असून तोफेच्या दारूचा कोळसा करण्यास उपयुक्त. अंतर्सालीपासून उत्तम बळकट धागा मिळतो हे झाड सावलीकरिता उत्तम जंगलातील साफ केलेल्या जागेवर पुन्हा वाढण्यास ह्याचा क्रमांक पहिला असतो. अपस्मारावर उपयुक्त. लाकडाचा लगदा कागदनिर्मितीत वापरतात.

ज्ञानसागर, वि.रा.