टॅमॅरिकेसी : (झाऊ कुल). या वनस्पति-कुलाचा समावेश परायटेलीझ नावाच्या गणात (आवृत्तबीज, द्विदलिकित) केला असून किंजपुटातील तटलग्न बीजकविन्यास लहान हे लक्षण या गणातील सर्व जातींत आढळते. या लहान कुलात रेंडेल यांच्या मताप्रमाणे सु. चार वंश आणि शंभर जाती असून त्या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ओषधी किंवा क्षुपे (झुडपे) आहेत. त्यांचा प्रसार भूमध्य सामुद्रिक प्रदेश व मध्य आशियातील मुख्यतः रूक्ष, वालुकामय व लवणयुक्त भूमीत आहे. पाने एकाआड एक, लहान खवल्यासारखी व कधीकधी मांसल असतात. फुले एकेकटी किंवा मंजिऱ्यांवर येतात ती नियमित, द्विलिंगी, अवकिंज, चतुर्भागी किंवा पंचभागी असून केसरदले कधी अधिक व किंजदले कधी कमी असतात. किंजपुटात एकच कप्पा, किंजले बहुधा सुटी व बीजके थोडी किंवा अनेक, अधोमुख, तटलग्न किंवा तलस्थ असतात       [→ फूल]. बोंड तडकणारे असून बिया केसाळ किंवा सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेले) व सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या ) असतात [→ बीज]. भारतात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व कारवार आणि पाकिस्तानात सिंध इ. भागांत टॅमॅरिक्स वंशातील काही जाती आढळतात ⇨ झाऊ व लाल झाऊ औषधी आहेत काही जाती बागेत शोभेकरिता लावतात.

देशपांडे, सुधाकर