तिवर : (हिं. बिना गु. तवरियान क. इपती सं. तुवरा इं. व्हाइट मॅनग्रोव्ह लॅ. ऑव्हिसेनिया ऑफिसिनॅलीस कुल–व्हर्बिनेसी). भारतात सर्वत्र शिवाय श्रीलंका, ब्रम्हदेश, अंदमान व निकोबार येथील समुद्रकिनारी व दलदलीत वाढणारे हे सदापर्णी झुडूप ९–१२ मी. पर्यंत उंच वाढते. याला हवेकडे वाढणारी श्वसनमुळे असतात. पाने (४–७·५ सेंमी.), साधी, साधारण लांबट, वर चकचकीत, खाली पांढुरकी व समोरासमोर असतात. फुले लहान, बिनदेठाची, पिवळी व सुगंधी असून फांद्यांच्या टोकांस, गुच्छाकृती फुलोऱ्यात एप्रिल–जूनमध्ये येतात. त्यांची संरचना आणि इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ व्हर्बिनेसी अगर साग कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. बोंड अंडाकृती व टोकदार बी एकच असून फळातच रुजून प्राथमिक मुळाचा भाग (अपत्यजनन) बाहेर येतो  [→ वनश्री (कच्छ वनश्री)]. गळवे पिकण्यास अपक्व बियांचे पोटीस करून बांधतात. साल तुरट, स्तंभक (आकुंचन करणारी) मूळ वाजीकर (कामोत्तेजक) पाने गुरांना चारण्यास आणि लाकूड जळणाकरिता वापरतात. सालीतील टॅनिनामुळे ती कातडी कमाविण्यास उपयुक्त असते. लाकडाची राख कपडे साफ करण्यास आणि चित्रकाराच्या रंगांत मिसळून त्यांचा चिकटपणा वाढविण्यास वापरतात.

पहा : तिवार.

नवलकर, भो. सुं.