सप्तरंगी : इंगळी, निसूल – बोंडी लॅ. सॅलॅसिया चायनेन्सिस सॅ. लॅटिफोलिया, सॅ. प्रिनॉयडीस कुल – हिप्पोकॅटिएसी ). सप्तरंगी हे या वनस्पतीचे व्यापारी नाव आहे. हिचा सरळ किंवा वेडावाकडा वाढणारा वृक्ष अथवा मोठे काष्ठयुक्त झुडूप अंदमान बेटांसहित भारतात सर्वत्र आढळते. ते समुद्रकिनारी, नदीनाल्यांच्या काठी, तसेच जंगलांत समुद्रसपाटीवर ७५० मी. उंचीपर्यंत जोमाने वाढते. पाने अंडाकृती ते कुंतसम ( भाल्यासारखी ), फुले पिवळसर असून २-६ च्या झुपक्यांनी बगलेत येतात. फळ लहान, गोलसर, १-२सेंमी. व्यासाचे व पिकल्यावर लाल होणारे असते. त्यात एकच बी असते. बी खादय गराने वेढलेले असते. पिकलेली फळे खातात.

भारतीय वैदयक पद्धतीत सप्तरंगीच्या मुळांचा उपयोग मधुमेहविरोधी म्हणून करतात व नैदानिक चाचण्यांमध्ये त्याचा परिणामकारकपणा असल्याचे म्हटले आहे. मुळाच्या सालीत दोन १, ३- डायकिटोने [C30H48O3 व C30H46O3], स्निग्धांशयुक्त द्रव्य, रबर, डल्सिटॉल, मँजिफेरीन, फ्लोबॅटॅनीज व ग्लुकोसायडी टॅनिने असतात. मुळांत ल्यूकोपेलार्गोनिडीन आणि त्याचे द्विवारिक व चतुर्वारिक हे असतात. मुळे स्तंभक (आकुंचन करणारी ) असतात. ती गर्भपातक असून अनार्तव व शूलार्तव ( कष्टार्तव ) व गुप्तरोगांत उपयुक्त असतात. खोडात गटापर्चा, डल्सिटॉल व ल्यूकोपेलार्गोनिडिनाचे द्विवारिकही असतात. पानांतही गटापर्चा असतो. तसेच सालीत व पानांत ट्रायटर्पिनांचे अस्तित्व आढळले आहे.

लेंडफळ सॅ. मॅकोस्पर्मा ही जाती पश्चिम घाटात कोकणापासून दक्षिणेस आढळते. तिची फळे गोलसर, नारिंगी रंगाची व ३ सेंमी. व्यासाची असून त्यांचा गर स्वादयुक्त असतो.

जमदाडे, ज. वि.