आबई : (अबई, खरसंबळ, कोयतेवाल, गवारा हिं. बडा सेम, मखन सेम क. कडवरे, सांबे, शंबीकाई गु. बालौर सं. महाशिंबी, असिशिंबी इं. ब्रॉड-सोअर्ड-पॅटगोनियन-बीन लॅ. कॅनवेलिया एन्सिफॉर्मिस कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॉपिलिऑनेटी). मूळची वेस्ट इंडीजमधली ही शिबावंत (शेंगा येणारी) बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी)  ðमहालता कोकणात व सह्याद्रीवरच्या जंगलात रानटी अवस्थेत क्वचित दिसते, तथापि उष्णकटिबंधात ती सर्वत्र लागवडीत आहे. भारतात ही सर्वत्र लावलेली आढळते. फांद्या व खोड गुळगुळीत पाने संयुक्त, त्रिदली दले मोठी, पातळ, साधारण अंडाकृती देठ तळाशी फुगीर उपपर्णे त्रिकोनी [→ पान] पानांच्या बगलेतील फुलोऱ्यावर (मंजरी) १२-२०, निळसर किंवा पांढरी, पतंगरूप [→ अगस्ता] फुले ऑगस्ट-ऑक्टोबरपर्यंत येतात. शेंग लांब १५·२० × २·५ सेंमी., चपटी, काहीशी वाकडी व त्रिधारी पण टोकदार. त्यावरून संस्कृत व इंग्रजी नावे पडली. बिया ८·२०, पांढऱ्या किंवा पिंगट असतात.

‘गवारा’ या नावाचा एक लहान प्रकार (व्हिरोजा) रानात आढळतो त्याच्या बिया विषारी व मादक असतात. आबईच्या शेंगा व बिया खाद्य, पौष्टिक, क्षुधावर्धक असून त्यात अ जीवनसत्त्व असते. ताज्या कच्च्या बिया फार खाल्यास उदरविकार, ð अंडवृद्धी, पोटशूल (पोटात होणाऱ्या वेदना) वगैरे विकार होतात. शेंगा लोणच्यात घालतात. दाह, पित्तप्रकोप, जखमा इत्यादींवर उपयुक्त यकृतापवृद्धीवर मूळ गोमूत्रात उगाळून ७ दिवस रोज घेतल्यास गुणकारी. भाजलेल्या बिया कॉफीऐवजी वापरतात.

पहा: लेग्युमिनोजी.  

परांडेकर, शं. आ. 

आबई हे शेंगभाज्यांच्या वर्गातील पीक आहे. त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. ते बहुधा शेताच्या कुंपणाच्या कडेला किंवा बंगल्याच्या आवाराच्या कुंपणाच्या कडेने लावतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत आळी तयार करतात. त्यांच्यात प्रत्येकी दोन दोन बिया लावतात. पुढे त्यांचे वेल आपणहून कुंपणावर चढून पसरतात. हे वेल दोन एक वर्षे टिकून शेंगा देतात. लागणीपासून चार महिन्यांनी फुले येऊन नंतर दीड दोन महिन्यांत भाजीयोग्य शेंगा तयार होतात. कोवळ्या शेंगांचीच भाजी करतात.  

भोसले, रा. जि.