कुंद : (रानमोगरा हिं. कुंदफूल सं. कुंद, सदापुष्प क. मोल्ले, कुंदा  इं. डाउनी जॅस्मिन लॅ. जॅस्मिनम प्युबिसेन्स कुल – ओलिएसी). या आरोही (आधारावर चढणाऱ्या) झुडपाचा प्रसार चीन आणि भारतात सर्वत्र असून ते कोकण, दख्खन व कारवारच्या जंगलात आढळते. बागेत लागवडीतही दिसते. पाने व कोवळ्या भागांवर मखमली लव आढळते. पाने काहीशी जाड, आखूड देठाची, साधी, समोरासमोर, अंडाकृती, टोकदार व दोन्ही बाजू लवदार फुले लहान, बिनदेठाची, पांढरी व फांद्यांच्या टोकास दाट वल्लरीवर जवळजवळ वर्षभर, तथापि डिसेंबर–फेब्रुवारीत अधिक येतात पाकळ्या ६–९ व रुंद, छदे मोठी, हिरवी [ → ओलिएसी]. 

फुले वांतिकारक सुकी पाने पाण्यात भिजवून त्याचे पोटीस जुनाट व्रणावर लावतात.

जमदाडे, ज. वि.

या झाडाची अभिवृद्धी फाटे कलमांनी अगर दाब कलमांद्वारे करतात. याच्या लागवडीकरिता कोणत्याही प्रकारची जमीन चालते परंतु सुपीक किंवा पाणभरत्या रेताड जमिनीत उत्तम वाढते. जमीन खणून खत घालून तयार करून दीड ते दोन मी. अंतरावर कलमे पावसाळ्यात लावतात. पुढे जरुरीप्रमाणे खतपाणी घालतात व छाटणी करतात. कळ्यांना भारतातील शहरांत वेण्या व हार यांकरिता मागणी असते. झुडपे शोभिवंत असल्याने जाळीवर किंवा दुसऱ्या ठेंगण्या झुडपावर चढवितात. 

चौधरी, रा. मो.