इसेस:(सांदरुस, विशेषधूप सं. श्रीवेष्ठ इं. फ्रँकिन्सेन्स, झांझिबार-मोझँबीक गम कोपल लॅ. ट्रॅकिलोबियम वेरुकोसम कुल – लेग्युमिनोजी). सर्व प्रकारच्या राळींमध्ये (रेझिनांमध्ये) ही अत्यंत कठीण (अपावद अंबर) असून आफ्रिका (मोझँबीक व मॅलॅगॅसी) व आशिया ह्यांच्या उष्ण भागातील दोन मोठ्या वृक्षांपासून (ट्रॅ. वेरुकोसम व ट्रॅ. हॉर्नेमॅनियानम) मिळते. ह्या वृक्षांना संयुक्त द्विदली पाने असून, दले लंबगोल, चिवट व लहान असतात फुले पांढरी, परिमंजरीवर येतात. शेंग जाड, चिवट व न तडकणारी असून तीत एकदोन जाड बिया असतात या वृक्षाची मुळे, खोड व फळे ह्यांतून स्रवणारा डिंकासारखा राळयुक्त पदार्थ (इसेस) जमिनीवर पडून साचतो. इसेस फिकट, पिवळट व तैलहीन असून तीपासून बनवलेले रोगण कठीण व चिवट असते ती कोपल व्हार्निशमध्ये वापरतात. इसेस स्तंभक (आकुंचन करणारी), कृमिनाशक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व वेदनाहारक (विंचवाच्या दंशावर) असते. ती धूप म्हणूनही वापरतात. तिळाचे तेल, मेण व इसेस अग्‍नीवर वितळवून व नंतर गाळून तयार झालेले मलम जखमांवर लावतात. हिमालयात ट्रॅ. हॉर्नेमॅनियानमचे वृक्ष आढळतात.

पहा : लेग्युमिनोजी

परांडेकर, शं. आ.