जुग्लँडेलीझ : (अक्रोड वा अक्षोट गण). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) ह्या नावाच्या गटामध्ये एकूण पाच कुले (१) अक्रोड वा अक्षोट कुल (जुग्लँडेसी), (२) भूर्ज कुल (बेट्युलेसी), (३) कट्फल किंवा कायफळाचे कुल (मिरिकेसी), (४) वंजु वा ओकचे कुल (फॅगेसी) व (५) जुलियानिएसी अंतर्भूत असून ह्या कुलांतील बहुसंख्य वनस्पती वृक्ष व क्षुपे (झुडपे) आहेत. त्यांना साधी किंवा संयुक्त व एकाआड एक पाने असतात. त्यांची फुले वायुपरागित (वाऱ्याने पराग नेले जाणारी), काहीशी ऱ्हास पावलेली, एकावृत (परिदलाचे एक वर्तुळ असलेली) किंवा अनावृत (परिदलहीन), एकलिंगी, एकाच वा स्वतंत्र झाडांवर व लोंबत्या कणिशावर [→ पुष्पबंध] येतात. परिदले असल्यास लहान खवल्यासारखी व मामुली दोन किंवा तीन, क्वचित अधिक, किंजदलांच्या अधःस्थ किंजपुटात किंजदलांइतके कप्पे व प्रत्येक कप्प्यात एकदोन बीजके क्वचित कप्पा एकच असून बीजक एक असते किंवा ती अनेक असतात [→ फूल] फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) किंवा कपाली (कवचयुक्त) आणि छदे (फुलाच्या तळाशी असलेली उपांगे) किंवा परिदले यांनी वेढलेले असते [→ फळ].

एंग्लर यांनी त्यांच्या पद्धतीत वर उल्लेखिलेल्या पाचांपैकी तीन कुले स्वतंत्र गणात ठेवून ओकच्या गणात (फॅगेलीझमध्ये) ओकचे कुल (फॅगेसी) व भूर्ज कुल यांचा समावेश केला आहे, रेंडल यांनी फक्त तीनच गणांत (जुग्लँडेलीझ, फॅगेलीझ व जुलियानिएलीझ) सर्वांचा समावेश केला आहे. फुले व अंतर्रचना यांतील लक्षणे विचारात घेऊन अक्रोड गणाचा उगम हॅमेलिडेलीझ (बकलँडिया, लिक्विडांबर इत्यादींचा गण) किंवा त्यांच्या पूर्वजांपासून वावळ्याच्या (चिरबिल्वाच्या) गणाप्रमाणे अर्टिकेलीझप्रमाणे) समांतर मार्गाने झाला असावा असे दिसते टिप्पो यांच्या विचारसरणीमध्ये चिरबिल्व गण व अक्रोड गण यांमधील बहुसंख्य घटकांचे अंतर्रचनेतील साम्यावरून सख्य (आप्तभाव) असल्याचे आढळते. अक्रोड, चेस्टनट, ओक (वंजू), मायफळ, हिकोरी, कायफळ, भूर्ज, बीच इ. उपयुक्त वनस्पती अक्रोड गणातील आहेत.

जुग्लँडेसी : (अक्रोड वा अक्षोट कुल). फुलझाडांपैकी द्विदलिकित वनस्पतींचे एक लहान कुल. यातील अक्रोड (सं. अक्षोट) या महत्त्वाच्या वनस्पतीवरून अक्रोड कुल हे मराठी नाव दिले आहे. यामध्ये सात वंश आणि पन्नास जाती (रेंडल सहा वंश आणि चाळीस जाती) अंतर्भूत आहेत. त्याचा प्रसार उत्तरेतील समशीतोष्ण प्रदेश, उपोष्ण कटिबंध, भारत, इंडोचायना, द. अमेरिका (अँडीज) इ. ठिकाणी आहे. बहुतेक सर्व जाती वृक्ष किंवा मोठी झुडपे असून त्यांना मोठी, संयुक्त, विषमदली, पिच्छाकृती व सुगंधी पाने एकाआड एक असतात एकलिंगी फुले एकाच झाडावर (फक्त एंगलहार्टियात विभक्त झाडांवर) पण स्वतंत्र फुलोऱ्यात असतात. नर किंवा पुं-पुष्पे अनेक व लोंबत्या कणिशावर, सच्छद व दोन छदकांच्या बगलेत असून परिदले चार व खवल्यांसारखी असतात क्वचित (उदा., कार्मा) नग्नपुष्पे आढळतात. फुलात तीन ते शंभर आखूड केसरदले व वंध्य किंजलाचा अवशेष असतो स्त्री-पुष्पातील छदे व छदके सुटी किंवा किंजपुटाशी कमीजास्त प्रमाणात चिकटलेली असतात परिदले चार, लहान दोन किंजदले, क्वचित तीन व किंजल्क दोन अधःस्थ किंजपुटात एकच कप्पा व बीजकास एकच आवरण बीजक सरळ व ऊर्ध्वमुख असते. अश्मगर्भी वा कपाली किंवा पंखधारी फळ बी अपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश नसलेले) परागण वाऱ्याने घडून येते जुग्लँस  वंशात परागनलिका बीजकाच्या तळातून प्रदेहात जाते (तलयुति) [→ फूल].

या कुलातील अनेक वनस्पतींना आर्थिक महत्त्व आहे. इमारती व सजावटी सामानाचे लाकूड (उदा., अक्रोड), हत्यारांचे दांडे व इतर सुतारकामात उपयुक्त असे लाकूड (कार्मा ) यांना भरपूर मागणी असते. काही फळे (उदा. अक्रोड) व बिया (इं. पेकन लॅ. कार्मा इलिनोएन्सिस ) खाद्य असून त्याकरिता यांची लागवड केली जाते. एंगलहार्टियाच्या दोन जाती (एं. रॉक्सबर्धियाना  व एं. स्पायकॅटा  ) असून पहिली प. बंगाल आणि आसामात व दुसरी हिमाचल प्रदेश, उ. प्रदेश, प. बंगाल, आसाम व सिक्कीम येथे आढळतात. पहिलीची साल मत्स्यविष असून दुसरीची साल कातडी कमाविण्यास व मत्स्यविषाकरिता वापरतात एं. स्पायकॅटाचे (हिं. सिलपोमा) लाकूड फळ्या, चहाच्या पेट्या, बांधकाम आणि कोरीवकामास उपयुक्त असते बह्मदेशात ते आगकाड्यांकरिता वा खासी टेकड्यांत चमच्याकरिता वापरात आहे.

पहा : अक्रोड ओक फॅगेसी बेट्युलेसी मिरिकेसी.

संदर्भ : 1. C. S. I. R. The wealth of India, Raw Materials Vol. III, New Delhi, 1952.

     2. Lowerence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

     3. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

     4. Rendle, A. B. The Classification of flowering Plants, Cambridge, 1963.               

परांडेकर, शं. आ.