सहजीवन : ( सिंबायोसिस ). दोन जीवांमध्ये असलेल्या निकट पण अपरजीवी ( दुसऱ्या जीवामधून पोषण न घेण्याच्या) भागीदारीला सहजीवन म्हणतात. ही भागीदारी दोन प्राणी, दोन वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजंतू अथवा प्राणी आणि वनस्पती यांच्यात असू शकते. सहजीवनामध्ये दोन भिन्न जीव एकमेकांच्या सान्निध्यात परस्परांना पूरक असे जीवन कंठीत असतात. सहजीवनातील भागीदारांचे साहचर्य कित्येकदा इतके निकट असते की, एक भागीदार दुसऱ्या भागीदाराच्या शरीरात वास्तव्य करतो. जीवांचे हे सहजीवन अतिशय वैचित्र्यपूर्ण असते. भागीदारांच्या परस्परसंबंधावरून सोयीच्या दृष्टीने सहजीवनाचे तीन प्रकार कल्पिता येतात: (१) सहजीवनाच्या पहिल्या प्रकारात दोन्ही भागीदारांना एकमेकांपासून फायदा होतो. याला ‘पारस्पर्य ’ म्हणतात. (२) दुसऱ्या प्रकारात फक्त एकाच भागीदाराचा फायदा होतो. पण दुसऱ्याचे नफा-नुकसान काहीच होत नाही. याला शास्त्रीय भाषेत ‘ सिनीसी ’ म्हणतात मराठीत ‘ सहभोजिता ’ वा ‘ एकहितैषी ’ ही संज्ञा लागू पडते. (३) तिसऱ्या प्रकारात एक भागीदार दुसऱ्याच्या जीवावर सर्व फायदा मिळवितो. या प्रकाराला ‘दास्य ’ वा ⇨ जीवोपजीवन म्हणतात.

पारस्पर्य : सहजीवितेतील द्वैध जीवाचे उत्कृष्ट उदाहरण ⇨ शैवाक ( दगडफूल ) होय. याच्या दोन (शैवल व कवक ) घटकांपासून उत्पन्न झालेल्या वनस्पतींत शैवल-कोशिका ( पेशी ) कवकाच्या तंतुमय वल्कात गुंतलेल्या असतात. अनेक वनस्पतींच्या ( उदा., चीड, ओक, ऑर्किड इत्यादी ) मुळांच्या कार्यक्षम भागांवर जमिनीतील विशिष्ट कवकांनी आकमण केलेले आढळते. यापासून उत्पन्न झालेला सहवास निकट पण गुंतागुंतीचा असतो आणि त्याला संकवक [⟶ कवक] म्हणतात. येथे उभयतांचा फायदा असतो. काही जातींचे जंतू आणि काही वनस्पती, विशेषतः शिंबी (शिंबावंत म्हणजे शेंगा येणाऱ्या ) वनस्पती [⟶ लेग्युमिनोजी], यांत परस्परांना उपकारक असे साहचर्य दिसून येते.

निकट पारस्पर्याची अनेक उदाहरणे सागरी प्राण्यांमध्ये दिसून येतात. ⇨ शंखवासी खेकडा आणि सीलेंटेरेटा संघातील ⇨ समुद्रपुष्प यांच्यात परस्परांना उपकारक असे सहजीवन आढळते. या खेकडयाचे वैशिष्टय असे की, समुद्रात रिकाम्या पडलेल्या शंखात स्वसंरक्षणार्थ हा राहतो. जास्त संरक्षण मिळावे म्हणून आपल्या राहत्या घरावर ( शंखावर ) तो समुद्रपुष्पांची स्थापना करून ते झाकून टाकतो. समुद्रपुष्पांच्या विषारी ⇨ दंशकोशिकांमुळे इतर प्राणी त्यांच्या सहसा वाटेला जात नसल्यामुळे खेकडयाचे आपोआपच संरक्षण होते. समुद्रपुष्पे नेहमी एकाच जागेला चिकटलेली असतात, त्यामुळे अन्नप्राप्तीचा संभव मर्यादित असतो. खेकडा आपल्या शंखासह हिंडत असल्यामुळे समुद्रपुष्पांनाही वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते आणि अन्नप्राप्तीचा संभव वाढतो. शिवाय खेकड्याने मिळविलेल्या अन्नातील काही भाग त्यांना मिळत असावा. अशाच प्रकारे सहजीवन शंखवासी खेकडा आणि स्पंज किंवा हायड्रॉइड प्राणी यांच्यात दिसून येते.

पारस्पर्यात एक भागीदार प्राणी व दुसरा वनस्पती असू शकतो. याचे एक उत्तम उदाहरण हायड्रा व्हिरिडिस चे होय. या प्राण्याचा हिरवा रंग त्याच्या शरीरात राहणाऱ्या झोओक्लोरेली या एककोशिक ( एका सूक्ष्म शरीरघटकाच्या ) शैवलांमुळे आलेला असतो. शैवल अन्न तयार करू शकते. या अन्नाचा काही भाग आणि ऑक्सिजन हायड्राला शैवलाकडून मिळतो आणि हायड्रापासून कार्बन डाय-ऑक्साइड व नायट्रोजनमय पदार्थ शैवलाला मिळतात शिवाय शैवलाला संरक्षण मिळते.

पुष्कळ प्राणी आणि जंतू यांचे साहचर्य असल्याचे आढळते. गायी, उंट, मेंढ्या, बकऱ्या इ. रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या आहारनालात जंतू आढळतात. अन्नातील सेल्युलोजाच्या ( तूलिराच्या ) पचनाकरिता त्यांची आवश्यकता असते. शिवाय जंतू संश्लेषणाने काही जीवनसत्त्वे उत्पन्न करतात येथे जंतूंना अन्न आणि संरक्षण मिळते.

अनेक कीटकांच्या आहारनालात जंतू, कवक आणि यीस्ट आढळतात. या वनस्पती कीटकांना अन्नाचे पचन व शोषण करण्यास मदत करतात आणि त्यांच्या मोबदल्यात कीटकांकडून त्यांना अन्नाचा पुरवठा होतो. जे कीटक वाळलेल्या किंवा कुजलेल्या लाकडांवर उपजीविका करतात त्यांच्यात अशा प्रकारचे सहजीवन आढळून येते. काही कीटकांच्या शरीरात जंतू आणि कवक यांच्या पुनरूत्पादनासाठी ‘ मायसेटोम ’ नावाचे एक खास अंग निर्माण झालेले असते.

सहभोजिता : ( सिनीसी ). सहजीवनाच्या या प्रकारची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. फायरॅस्फर या समुद्री माशाचे शरीर लांब व बारीक असते. स्वसंरक्षणार्थ सागरी काकडीच्या शरीरात तो गुदद्वारातून आत शिरतो व तेथूनच बाहेर पडतो. काही कालवे ॲसिडियनांच्या जाड आवरणाच्या आत राहतात. काही झिंगे स्पंजाच्या आत आसरा घेतात. ट्युबिसिनेला या बार्नेकलाच्या प्रजातीतील काही जाती देवमाशांच्या त्वचेत खोल शिरून संरक्षण मिळवितात. वरील उदाहरणात फक्त एकाच भागीदाराचा फायदा होतो परंतु दुसऱ्या भागीदाराचा जसा काही फायदा होत नाही तसाच काही तोटाही होत नाही. [⟶ सहभोजिता].

दास्य : ( जीवोपजीवन ). या प्रकारच्या सहजीवनात एक भागीदार दुसऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करून त्याच्याकडून गुलामाप्रमाणे सर्व कामे करवून घेतो. निसर्गात या प्रकारच्या सहजीवनाचे प्रमाण कमी असले, तरी कीटकवर्गात हा प्रकार विशेष दिसून येतो. ॲमेझॉन मुंग्या बागेतील तपकिरी मुंग्यांना (फॉर्मिका फस्का ) गुलामांप्रमाणे राबवितात. मेलिया टेसेलेटा हा उष्ण प्रदेशांत आढळणारा लहान खेकडा आपल्या आकड्यात नेहमी लहान समुद्रपुष्पे धरून ठेवतो आणि त्यांचा उपयोग स्वसंरक्षण आणि आक्रमण या दोन्ही कामांकरिता करतो.

सहजीवन ही जीवसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे वरील उदाहरणांवरून स्पष्टपणे दिसून येते. पारस्पर्य, सहभोजिता व जीवोपजीवन या तीन प्रकारांत अगदी काटेकोर फरक करणे अनेकदा शक्य नसते, कारण त्यांना जोडणारे काही मधले प्रकारही आढळतात. पुढे दिलेल्या विवेचनात वनस्पतींच्या सहजीवनातील भागीदारीची कालमर्यादा, संबंधित जीवांचा निकटपणा व त्यांच्या परस्परसंबंधाचे अनेक प्रकार व साध्य ध्यानात घेऊन सहजीवनाचे वर्णन केले आहे. वनस्पती व प्राणी यांच्या सहजीवनाची काही उदाहरणेही दिली आहेत.


सहजीवन ( वनस्पती ) : दोन किंवा अधिक जिवंत व भिन्न जातींतील जीवांच्या निकट सहवासाला सहजीवन ही संज्ञा वापरलेली आढळते. हा सहवास अल्पकाल असणे शक्य आहे किंवा तो संबंधित जीवांच्या संपूर्ण आयुष्यभरही टिकू शकतो. संबंधित जीवांना ‘ सहजीवी ’ म्हणतात. हा संबंध विविध प्रकारचा असतो. त्यातून पोषण, संरक्षण, आधार, प्रजोत्पादन इ. साध्य होतात. संबंधित जीवांपैकी एकाचा किंवा दोन्हींचा फायदा असल्याचे बहुधा उघड दिसते कधी एकाचा फायदा व दुसऱ्याचे नुकसान स्पष्ट असते तर कधी संबंधाचे साध्य संशयास्पद असते. संबंधित जीवांपैकी कधी एक प्राणी व दुसरी वनस्पती असते, तर कधी   दोन्ही प्राणी किंवा दोन्ही वनस्पती असतात. दोन जीव ( सहजीवी ) सर्वच काल परस्परांशी संलग्न असल्यास त्या सहजीवनाला ‘ संयोजी ’ आणि अल्पकाल संबंध असल्यास ‘ वियोजी ’ म्हणतात. उदा., फुलावर मध लुटण्याकरिता आलेले फुलपाखरू किंवा पक्षी तेथेच अल्पकाल थांबतो परंतु आंब्याच्या फांदीवर ⇨ बांडगूळ कायमपणे वाढत असते. एक सहजीवी ( येथे जीवोपजीवी) दुसऱ्यावर ( आश्रयावर ) उपजीविका करतो त्यावेळी त्या सहजीवनाला ‘ पोषक ’ म्हणतात परंतु पोषणाशिवाय अन्य प्रकारचे साध्य असते तेव्हा ‘सामाजिक सहजीवन ’ असे म्हणतात. पोषक व सामाजिक ह्या प्रत्येक प्रकारात एका जीवाचे नुकसान व दुसऱ्याचा फायदा असतो त्यावेळी ते सहजीवन ‘विरोधी ’ होते आणि दोन्ही व्यक्तींना फायद्याचे होते त्यावेळी ते ‘ अन्योन्य ’ अथवा ‘ पारस्परिक ’ समजतात. सजीवांच्या जीवनात परिस्थितीशी समरस होण्याकरिता सृष्टीत ज्या अनुयोजना आढळतात त्यांचा आविष्कार किती विविध प्रकारचा असू शकतो, त्याची कल्पना सहजीवनाच्या पुढे दिलेल्या तपशिलावरून येईल.

संयोजी : (१) आंबा किंवा कडुनिंब यासारख्या मोठया झाडांच्या फांदीवर ( आश्रयावर ) वाढणारे बांडगूळ किंवा ⇨ हायमोड, कण्हेर किंवा मेंदी यांच्या झुडपावर वाढणारी ⇨ अमरवेल, तंबाखूच्या मुळांवर वाढणारा ‘ बंबाखू ’ [⟶ तंबाखू] आणि गव्हावर वाढणारा ‘ तांबेरा ’ [⟶ कवक]  या सर्व सहजीवनाच्या प्रकारांत आश्रय वनस्पतीवर दुसरी वनस्पती सतत चिकटलेली असून आश्रयापासून ती अन्नरस घेते व त्याच्या नुकसानीस रोगाप्रमाणे कारणीभूत होते. हे सहजीवन संयोगी, पोषक व विरोधी प्रकारचे आहे [⟶ जीवोपजीवन].

(२) काही शैवले व कवके यांची शरीरे कायमची एकत्र वाढून त्यापासून ‘ दगडफूल ’ वनस्पती बनते खडकावर किंवा वृक्षांच्या फांदीवर यांपैकी कोणत्याही एकाला स्वतंत्रपणे जगणे कठीण असते परंतु दोन्ही एकत्र होऊन परस्परांना पाणी, अन्न व संरक्षण देऊन यशस्वी जीवन जगतात [ ⟶ शैवाक]. हे सहजीवन संयोजी, पोषक परंतु अन्योन्य प्रकारचे असते.

(३) समशीतोष्ण कटिबंधातील जंगलात कित्येक वृक्षांच्या मुळांवर कवकतंतूंचे दाट जाळे असते त्या तंतूंपैकी काही मुळांतील कोशिकांमधून किंवा प्रत्यक्ष कोशिकांतच प्रवेश करतात आणि काही तंतू बाहेरील जमिनीत वाढून पाणी, नायट्रेटे व फॉस्फेटे ही लवणे शोषून घेतात आणि ते वृक्षाला उपलब्ध करून देतात वृक्षाकडून कवकाला कार्बोहायड्रेटे व इतर कार्बनी स्वरूपात अन्न मिळते हे सहजीवन [ ⟶ संकवक कवक] याच सदरात येते. कित्येक आमरे [ ⟶ ऑर्किडेसी], ⇨सायलो– टेलीझ,लायकोपोडिएलीझ व ⇨ नेचे यांपैकी काही जाती आणि पाइन ( चीड), ओक, लार्च, फर व स्प्रूस यांसारखे वृक्ष यांचाही येथे समावेश होतो.

(४) ⇨ लेग्युमिनोजी कुलातील ( किंवा शिंबावंत कुलातील ) मूग, वाटाणा व हरभरा यांसारख्या अनेक वनस्पतींच्या मुळांवर ज्या गाठी येतात, त्यांमध्ये हवेतून नायट्रोजन घेऊन त्याची संयुगे बनविणारे सूक्ष्मजंतू (ऱ्हायझोबियम लेग्युमिनोसॅरम = बॅक्टिरियम रॅडिसिकोला ) असतात. त्यांना ह्या शिंबी वनस्पतींपासून निवारा, संरक्षण व कार्बोहायड्रेटे मिळतात तर या आश्रय वनस्पतींना सूक्ष्मजंतूंपासून नायट्रेटांच्या संयुगांचा लाभ होतो हे उदाहरणही संयोजी, अन्योन्य व पोषक संबंधाचे आहे.

(५) ⇨ सायकस वृक्षाच्या प्रवालसम ( पोवळ्यांसारख्या ) मुळांत काही असेच सूक्ष्मजंतू व नॉस्टॉक हे नील-हरित शैवल [ ⟶ शैवले]   आढळते तसेच ॲझोला या ⇨ जलनेचा च्या पानांत ॲनाबीना हे नील-हरित शैवल असते ही शैवलेही नायट्रोजनयुक्त संयुगे बनवून आश्रय वनस्पतीला देतात आणि त्याचा मोबदला त्यांना निवारा, काही कार्बनी पदार्थ आणि संरक्षण या रूपात मिळत असावा. अँथोसिरॉस या ( शेवाळी विभागाच्या यकृतका उपविभागातील ) प्रजातीच्या काही जातींत त्यांच्या कायकात ( साध्या शरीरात ) नॉस्टॉक शैवल आढळते आश्रयाला त्याची जरूरी नसते उलट ते नसल्यास मूळच्या आश्रय वनस्पतीची वाढ चांगली होते यावरून तेथे त्यांचा अन्योन्यसंबंध संशयास्पद ठरतो. सायकस, ॲझोलाअँथोसिरॉस यांच्या शरीरांत आढळणाऱ्या या दुसऱ्या वनस्पती जीवोपजीवी न मानता ‘ अंतर्वनस्पती ’ गणल्या जातात. सृष्टीत या वनस्पती स्वोपजीवी म्हणून वाढतात तसेच कासवाच्या पाठीवर सतत वाढत राहणाऱ्या शैवलाचे उदाहरण संयोजी, सामाजिक पण कासवाच्या दृष्टीने उदासीन ( निरर्थक ) ठरते. शैवलाला मात्र फक्त सुरक्षित व सोयीस्कर आधार मिळतो.

(६) घनदाट जंगलातील कित्येक मोठया वृक्षांच्या फांदयांवर कित्येक नेचे, आमरे, अननसाच्या कुलातील [ ⟶ ब्रोमेलिएसी] काही जाती, शैवाके, शेवाळी, अनेक लहान स्वतंत्र वनस्पती फक्त आधार घेतात आणि वृक्षाच्या सालींच्या मृत भागातून किंवा त्यावरच्या खोबणीत साचलेल्या कचऱ्यातून आणि अन्य साधनांनी पाणी व लवणे घेतात, त्यांना ⇨ अपिवनस्पती म्हणतात त्या जीवोपजीवी नसतात, तथापि त्यांची संख्यावाढ कधीकधी इतकी होते की, त्यांच्या ओझ्याने आश्रय वनस्पतींच्या शाखा मोडतात किंवा त्यांच्या सालीवरच्या आच्छादनामुळे ⇨ वल्करंधे ( सालीवरील छिद्रे ) बंद होऊन आश्रय वनस्पतींचा हवेचा पुरवठा कमी होतो. हे सहजीवन संयोजी, सामाजिक व विरोधी ठरते. काहींच्या मते या सहजीवनात कोणाचेही फारसे नुकसान होत नाही व विशेष फायदाही होत नाही म्हणून त्याला ‘ उदासीन ’ सहजीवन म्हणतात.

(७) जंगलातील लहान मोठया वृक्षांवर कित्येकदा अनेक मोठया वेली चढून त्यांच्या माथ्यावर आपला पर्णसंभार पसरवितात त्यांना चांगला आधार व भरपूर प्रकाश मिळतो परंतु त्यामुळे आश्रयी वनस्पतीवरचे ओझे वाढते आणि त्यांच्या आच्छादनामुळे अन्ननिर्मितीत अडचण येते  [ ⟶ महालता] सहजीवनाचा हा प्रकारही सामाजिक व विरोधी आहे.


वियोजी : (१) परिस्थितीनुसार काही वनस्पतींना जमिनीतून नायट्रोजनयुक्त क्षार मिळत नसल्याने त्या क्रमविकासात (उत्कांतीमध्ये ) कीटकभक्षक बनल्या आहेत. त्यांच्या पानांचे रूपांतर कीटकांना आकर्षक असून त्यांच्याव्दारे कीटक पकडले व मारले जातात आणि त्यांच्या शरीरांतील प्रथिने ( अथवा नायट्रोजन आणि फॉस्फरसयुक्त इतर पदार्थ ) शोषली जातात [ ⟶ कीटकभक्षक वनस्पति]. ह्या सहजीवनात एखादा कीटक व विशिष्ट वनस्पती यांचा संबंध कायम नसून अल्पकाल असतो म्हणून हे सहजीवन वियोजी, पोषक पण विरोधी आहे याचा कीटकांना फायदा नसून उलट ते मारक ठरते मात्र आश्रयाला फायदयाचे आहे.

(२) याउलट, कित्येक कीटक फुलातील रंग, वास व मधुरस यांमुळे आकर्षित होऊन फुलावर अल्पकाळ येतात व परत जाताना फुलातील अनेक परागकण नकळतच घेऊन जातात हे कीटक त्यानंतर दुसऱ्या फुलावर जातात त्यावेळी ते परागकण तेथे किंजल्कावर ( स्त्रीकेसराच्या टोकावर ) पडतात. त्यामुळे ⇨ परागण ( परागसिंचन ) घडून येते येथे आश्रय वनस्पतीला कीटकांचा प्रजोत्पादनात उपयोग होतो, तसेच कीटकालाही मधुरस किंवा पराग हे खादय मिळते हे सहजीवन वियोजी, पोषक व अन्योन्य प्रकारचे आहे [ ⟶ उंबर अंजीर].

(३) कित्येक पक्षी फळे आणि बीजे यांसमवेत असलेला खाद्य भाग घेऊन फळांचे व बीजांचे विकिरण घडवून आणतात हे उदाहरण वरच्याप्रमाणे अन्योन्य व पोषक सहजीवनाचे आहे.

(४) एखादया जंगलात मोठया वृक्षाखाली असलेल्या सावलीत अनेक छायाप्रिय वनस्पती सोयीस्कर रीत्या वाढतात. तेथे शेवाळीच्या गालिचाखाली जमीन ओलावा धरून असते आणि जमिनीत अनेक प्राणी ( विशेषतः गांडुळे, मुंग्या, अळ्या, मुंगळे इ.) आपल्या जीवनक्रमात पालापाचोळ्याचा अन्नासारखा उपयोग करतात आणि आपल्या आत-बाहेर जाण्यायेण्याने ती भुसभुशीत करतात व तिची सुपिकताही वाढवितात या जमिनीचा वृक्ष, ⇨ क्षुपे ( झुडपे ) व ⇨ ओषधीं च्या वाढीवर इष्ट परिणाम होतो. त्याच जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यावर अनेक कवके व जंतू उपजीविका  [ ⟶ शवोपजीवन] करतात. उर्वरित भाग जमिनीशी एकरूप होऊन तिचा कस वाढतो. यावरून तेथील वनस्पतिजीवनात अन्योन्य, सामाजिक, पोषक पण वियोजी असा सहजीवनाचा प्रकार आढळतो.

(५) मुंग्या, मुंगळे आणि भुंगेरे यांचा अनेक वनस्पतींशी निकटचा संबंध आलेला आढळतो. कधीकधी मुंग्या झाडांतील पोकळ्यांत किंवा लहान-मोठया खोबणीत-भेगांत फक्त आश्रय घेतात आणि कधीकधी अनेक मुंग्या सुकलेल्या पानांची झाडावर घरटी बनवून त्यात राहतात त्यांच्यापासून झाडाला इजा पोहोचलेली आढळत नाही परंतु झाडावर आलेल्या इतर प्राण्यांवर मात्र त्या सर्व एकदम तुटून पडून हल्ला करतात, म्हणजेच झाडाला संरक्षण देतात हे सहजीवन सामाजिक, वियोजी व अन्योन्य प्रकारचे असते. याचेच दुसरे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियातील एका बाभळीच्या (ॲकॅशिया स्फेरोसेफॅला ) जातीत अशा संरक्षक मुंग्यांच्या दलाला निवारा व अन्न दोन्ही मिळतात. काही मुंगळे ‘ माव्या ’चे कीटक   ( ॲफिड्स ) वनस्पतीच्या कोवळ्या भागांवर आणून सोडतात व तेथे माव्याचे कीटक वनस्पतींतील अन्नरस घेतात त्यांच्या शरीरातून येणाऱ्या गोड रसावर मुंगळे लुब्ध असतात म्हणून त्या झाडावर या मुंगळ्यांची  ये-जा सतत सुरू असते ते त्यांचे संरक्षणही करतात. हे सहजीवन वियोजी, पोषक पण अन्योन्य व वनस्पतीच्या दृष्टीने विरोधी आहे. मुंग्यांचे काही प्रकार वनस्पतींची पाने कुरतडून त्यांचा जमिनीत थर करतात आणि त्यावर कवकांची बीजुके ( सूक्ष्म व प्रजोत्पादक घटक ) पेरून छोटे कवकोदयान करतात पुढे त्यावर ते निर्वाह करतात हे सहजीवनही त्याच प्रकारचे आहे. तसेच काही झाडांना वाळवीपासून बराच उपद्रव पोहचतो व त्यांचा शेवटी नाशही होतो हे उदाहरण संयोजी, पोषक व विरोधी प्रकारचे आहे मात्र येथे वाळवीला वनस्पतींच्या शरीरातील सेल्युलोजाचे ( तूलिराचे ) पचन करता येत नाही, तर वाळवीच्या आहारनालातील जीवोपजीवी प्रकेसली ( कोशिकेतील जीवद्रव्याचा बाहेर आलेला एक लांबट धागा किंवा अनेक धागे असणाऱ्या ) अतिसूक्ष्म प्राणी म्हणजे आदिजीव [ ⟶ प्रोटोझोआ] ते कार्य करतात त्याचा मोबदला आदिजीवाला पोषण व निवारा वाळवीकडून मिळतो येथे तीन भिन्न जीवांचे सहजीवन दिसून येते. रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पचनमार्गात कित्येक सूक्ष्मजंतू असून त्यांचा उपयोग विशेषतः सेल्युलोजाच्या पचनाकरिता व काही जीवनसत्त्वे उपलब्ध होण्यास केला जातो. हे सहजीवन संयोजी, अन्योन्य व पोषक असते. अनेक एककोशिक शैवले आणि हायड्रा, प्रवाळ व पट्टकृमी यांसारखे प्राणी यांचे संयोजी, अन्योन्य व पोषक असे सहजीवन असते.

पहा : कवक जीवोपजीवन परिस्थितिविज्ञान रवंथ करणे शवोपजीवन शैवले शैवाक सहभोजिता.

संदर्भ : 1. Ahmadjian, V. The Lichen Symbiosis, 1993.

           2. Alle, W. C. The Social Life of Animals, 1976.

           3. Bell, P. Coombe, D. Strasburger’s Textbook of Botany, London, 1965.

          4. Brain, M. V. Social Insects : Ecology and Behavioural Biology, 1983.

          5. Milne, L. J. Milne, M. Plant Life, 1959.

          6. Taylor, W. T. Weber, R. J. G. General Biology, New York, 1961.

जोशी, मा. वि. परांडेकर, शं. आ.