कॅस्करा-सॅग्रेडा : (इ. कॅलिफोर्नियन वेस्टर्न बक्थॉर्न). हे नाव ऱ्हॅम्नस पुर्शियानाऱ्हॅ. कॅलिफोर्निका (कुल-हॅम्नेसी) या लहान वृक्षांच्या (उत्तर अमेरिका व कॅनडा येथील)तांबूस तपकिरी सालीला व त्यापासून काढलेल्या अर्काला दिलेले आहे. यातील औषधी गुणधर्मांची माहिती पश्चिमेकडील इंडियन लोकांना व पहिल्या स्पॅनिश वसाहतवाल्यांना होती व त्यांनीच हे नाव ‘पवित्र वल्क’ या अर्थी दिले आहे. उन्हाळ्यात दोन–तीन वर्षांची जुनी साल काढून व वाळवून अर्क काढतात. त्यात अ‍ँथ्रॅसीन राळ, ॲमरॉइडे, टॅनीन, मॅलिक व ऑक्झॅलिक अम्ले, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल इ. पदार्थ असतात. शिवाय त्यात पौष्टिक व सौम्य रेचक गुण असून त्यामुळे जुनाट मलावरोध नाहीसा होतो. हे वृक्ष भारतात आढळत नाहीत. तथापि ऱ्हॅम्नास वंशातील ⇨रक्तरोहिडा (रगतरोडा ऱ्हॅम्नस वाइटाय ) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व निलगिरी आणि पळणी येथील टेकड्यांवर आढळणाऱ्या वनस्पतीच्या सालीतही पौष्टिक, स्तंभक (आंकुचन करणारा) व रेचक गुण आढळतात.

पहा : ऱ्हॅम्नेसी

हेर्लेकर, न. द.