जूनिपर : (लॅ. जूनिपेरस कुल-क्युप्रेसेसी). प्रकटबीज वनस्पतींपैकी [उघडी बीजे असलेल्या वनस्पतींपैकी → वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] एका मोठ्या गणातील [→ कॉनिफेरेलीझ शंकुमंत गण] एक मोठा वंश जाती सु. चाळीस. लहान प्रणत (जमिनीसपाट वाढणाऱ्या) क्षुपापासून (झुडपापासून) ते सु. तीस मी. उंच वृक्षापर्यंत विविध आकारमानांची झाडे ह्या वंशात समाविष्ट आहेत. साधारणपणे ओलसर, भुसभुशीत जमिनीत व उघड्यावर ही झाडे चांगली वाढतात. ती सर्व सदापर्णी आणि सुगंधी असून त्यांचा प्रसार उ. गोलार्धात सर्वत्र आहे ती शोभेकरिता बागेत लावतात. त्यांच्या चार-पाच जाती भारतात आढळतात. त्यांची पाने सांधलेली, किंचित पसरट, रेषाकृती किंवा लहान खवल्यासारखी, आलग्न (पृष्ठाशी काहीशी समांतर चिकटल्याप्रमाणे), जोडीने किंवा तिन्हीच्या मंडलात येतात [→  पान]. कधीकधी एकाच झाडावर एकाच वेळी दोन प्रकारची पाने भिन्न फांद्यांवर अथवा भिन्न वेळी येतात. पुं-शंकू (काहीशा लांबट अक्षावर बीजके किंवा परागकोश धारण करणाऱ्या खवल्यांचा भोवऱ्यासारखा अवयव) व स्त्री-शंकू स्वतंत्र, परंतु बहुधा भिन्न झाडांवर येतात. स्त्री-शंकू पक्वावस्थेत त्यातील खवले (शल्कपर्णे) मांसल आणि परस्परांशी एकरूप होऊन वाढल्याने मृदुफळाप्रमाणे दिसतात परागकण एका शंकूतून दुसऱ्याकडे (स्त्री-शंकूकडे) वाऱ्याच्या साहाय्याने नेले जाऊन नंतर फलधारणा होते. पक्व स्त्री-शंकूत एक ते तीन, क्वचित आठ किंवा अधिक, कठीण आणि पंख नसलेल्या बिया असतात [ → पाइन]. त्यांवर मोठे तैलप्रपिंड (ग्रंथी) असतात.

सॅव्हिन : (लॅ. जूनिपेरस सॅबिना ). ही मध्य यूरोपातील जाती विषारी आहे. तिच्या कोवळ्या पाल्याचे तेल (सॅव्हिन तेल) मासिक पाळीच्या दोषांवर देतात ते कातडीला लागल्यास आग होते. ते पूर्वी औषधात गर्भपातक म्हणून वापरीत. हिमालयात आढळणारी ⇨आभाळ  (सं. हपुषा), जू. रिकर्व्हा, जू. मॅक्रोपोडा  व थेलू (जू. एक्सेल्सा ) इ. झाडे उपयुक्त आहेत. कित्येक जातींचे लाकूड पेट्या, पेन्सिली, कुंपणाचे व दूरध्वनीचे खांब इत्यादींकरिता वापरतात. धूप व सूक्ष्मदर्शकासंबंधीचे व इतर अनेक उपयोगांच्या अशा ‘सीडर वुड’ तेलाकरिता जू. व्हर्जिनियानाचे लाकूड फार उपयुक्त आहे. आग्नेय यूरोपातील आणि प. आशियातील जू. ड्रूपेशियाची, ‘फळे’ (हाभेल) खाद्य आहेत. जुनिपेरस  वंश प्राचीन असल्याचे तृतीय कल्पाच्या (सु. ६·५ ते १·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकातील त्याच्या जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) समजून येते.

                                          

परांडेकर, शं. आ.