बुटे : (बोथी क. हडंग इं.सामनवुड लॅ. एरिओलीना कॅंडोली कुल-स्टर्क्युलिएसी). ब्रह्मदेश, भूतान व भारत येथील जंगलात वाढणारा हा ९-१८ मी. उंच पानझाडी वृक्ष आहे. ह्या वनस्पतीच्या एरिओलीना ह्या वंशात एकूण १५ जाती असून भारतात त्यांपैकी ७ आढळतात. ह्या वृक्षाची पाने साधी, मोठी (१३-१८ x १० सेंमी.), अंडाकृती, टोकदार, दातेरी, लवदार असून तळापासून टोकाकडे ५-७ प्रमुख शिरा निघालेल्या दिसतात. फुले अनेक, पिवळी, मोठी (४ सेमी. व्यासाची), पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकाकडे, मार्च ते जूनमध्ये मंजरीत [⟶ पुष्पबंध] येतात. पाकळ्या आयत, टोकाशी खाचदार, तळाशी केसाळ, आत वळलेल्या, केसरदले एकसंघ (एकत्र जुळलेली) व त्यांच्या नलिकेवर असंख्य परागकोश किंजघर नसतो आणि किंजपुट अवृंत्त (बिनदेठाचा) व १० कप्प्यांचा किंजल गुळगुळीत [⟶ फूल]. बोंड कठीण, लांबट (५ सेंमी. लांब) असून तडकल्यावर त्याची दहा शकले होतात बिया सपक्ष (पंखधारी) व अनेक. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ स्टर्क्युलिएसीमध्ये (मुचकुंद कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाचे लाकूड तांबूस, कठीण व चिवट असून त्याला उत्तम झिलई करता येते. ते घरबांधणी, गाड्या, मुसळे, वल्ही, बंदुकीचे दस्ते व इतर सुतारकामासही उपयुक्त असते यूरोपात ते कपाटे, पेट्या, कातीव व कोरीव काम, कुंचले, नक्षीकाम इत्यादींसाठी वापरतात.

अरंग : (बोटकू लॅ. ए.हूकेरियाना). हा लहान पानझडी वृक्ष बुटेच्या वंशातील असून त्याची अनेक लक्षणे त्यासारखीच आहेत किरकोळ फरक मात्र आहेत. पाने लहान व गोलसर फुले (मार्च-एप्रिलमध्ये) बुटेपेक्षा मोठी किंजल लोमश (केसाळ) फळ लहान व कठीण बिया सपक्ष. हा वृक्ष भूतानात व भारतात (दख्खन द्वीपकल्पात व उत्तरेस गंगेच्या मैदानात) आढळतो. याचे लाकूड फिकट तांबूस, मजबूत व टणक असते. ते बुटेप्रमाणे उपयुक्त आहे तथापि विशेषतः नांगर व कुऱ्हाडीचे दांडे यांकरिता वापरतात. मध्य प्रदेशात गुरांना चारा म्हणून याचा पाला खाऊ घालतात. सालीपासून उत्तम धागा मिळतो.

बुटे व बोटकू ही नावे मराठीत वरील दोन्ही जातींकरिता वापरलेली आढळतात तसेच ’बोथी’ हे नाव अन्य जातीस (ए.किंकेलॉक्युलॅरिस) वापरलेले आढळते तिलाच ’बज्जरीधामण’ असेही म्हणतात. हिचे लाकूड बळकट व उपयुक्त असून मुळांचे पोटीस जखमा बऱ्या होण्यास बांधतात. हा लहान वृक्ष दक्षिणेच्या पठारावर व कोकणात आढळतो.

पराडकर, सिंधु अ.