कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी : (हरिणपदी कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) सोलॅनेलीझ या गणातील हे एक कुल असून सु. ५० वंश व १,१०० जाती यात समाविष्ट आहेत. त्यांचा प्रसार जगातील उष्ण व समशीतोष्ण भागांत आहे. एक दोन अपवाद (उदा., क्रेसा  वंश) सोडल्यास बहुधा सर्वच वेली आहेत त्यांना दुधी चीक असतो. पाने साधी, एकाआड एक फुले द्विलिंगी, नियमित, बहुधा मोठी, आकर्षक, कधी छदमंडलित व कीटक परागित (कीटकांद्वारे परागसिंचन झालेली). संदले पाच, बहुधा सुटी व सतत राहणारी पुष्पमुकुट पाच सलग पाकळ्यांचा व घंटाकृती किंवा नसराळ्यासारखा, पुष्पदलसंबंध परिवलित केसरदले पाकळ्यांवर आधारलेली व पाच, किंजदले दोन, जुळलेली, किंजपुट ऊर्ध्वस्थ बहुधा दोन कप्प्यांचा, वलयाकृती बिंबाने वेढलेला बीजके एक ते चार, अधोमुखी [ →फूल] फळ मृदू अथवा शुष्क (बोंड), बिया क्वचित केसाळ व अपुष्क (वाढणाऱ्या बीजाला पोषणद्रव्ये पुरविणारा पेशीसमूह नसलेल्या). बोरॅजिनेसी, सोलॅनेसी इ. कुलांशी या कुलाचे साम्य व आप्तभाव आहे. याला ‘गंधवेलादि कुल’ असेही म्हणतात. गारवेल, कामलता, समुद्रशोक, निळवेल या शोभेकरिता रताळे, भुईकोहळा, नावळी इ. खाण्याकरिता निशोत्तर, उंदीरकानी, मर्यादवेल इ. औषधाकरिता वापरतात. अमरवेल  उपद्रवकारक असते.

पहा : पुष्पदलसंबंध

 

केळकर, शकुंतला