ॲरिस्टोलोकिएसी : (ईश्वरी कुल). फुलझाडांपैकी द्वि-दलिकित वर्गातील ह्या वनस्पति-कुलाचा समावेश हिद्‌नोरेसी व रॅफ्लेसिएसी या दोन संबंधित कुलांबरोबर ॲरिस्टोलोकिएलीझ या गणात केला असून त्यातील वनस्पती बहुतेक आरोही (वर चढणाऱ्या)⇨ओषधी किंवा काष्ठमय खोडांची क्षुपे (झुडुपे) आहेत त्यांचा समावेश सु. ६ वंश व ४०० जातींत केला आहे. त्यांचा प्रसार उत्तर समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांत आहे. पाने साधी, एकाआड एक व तैलप्रपिंड (ग्रंथी) युक्त फुले द्विलिंगी, एकावृत, अरसमात्र किंवा एकसमात्र, अपिकिंज असून एकाकी किंवा झुबक्यांनी, मंजरीवर अथवा कणिशावर येतात [→ फूल]. परिदले ३, जुळलेली, पाकळ्यांसारखी, धारास्पर्शी केसरदले ६-३६, सुटी किंवा किंजलाला चिकटून ‘किंजकेसराक्ष’ बनतो. किंजदले बहुधा ६, क्वचित ४ संयुक्त किंजपुट अधःस्थ, सहा किंवा चार कप्प्यांचा असून बीजके पुष्कळ, अधोमुख व अक्षलग्न⇨फळ (बोंड) पटभिदुर व बिया सपुष्क असतात. या कुलातील⇨पोपटवेलीच्या अनेक जाती शोभेकरिता बागेत लावतात. या कुलाला ‘सापसंदादि-कुल’ असेही म्हणतात.

पहा : पुष्पबंध.

जमदाडे, ज. वि.