श्लायडेन, मातीआस याकोप : (५ एप्रिल १८०४ – २३ जून १८८१). जर्मन वनस्पतिवैज्ञानिक. कोशिका (पेशी) सिद्धांताचे ⇨टेओडोर श्व्हान यांच्यासमवेतचे सहसंस्थापक.  

श्लायडेन यांचा जन्म हँबर्ग येथे झाला. १८२४२७ मध्ये त्यांचे हायडल्बर्ग येथे शिक्षण झाल्यावर हँबर्ग येथे ते वकिली व्यवसाय करू लागले, पण अल्पावधीतच त्यांना वनस्पतिविज्ञानात रस वाटू लागला व पूर्णवेळ ते वनस्पतिविज्ञानाचे अध्ययन करू लागले. त्यांनी वैदयकाचाही अभ्यास केला. त्यांच्या समकालीन वनस्पतिवैज्ञानिकांच्या वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या विरोधामुळे त्यांनी सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने वनस्पतींच्या संरचनेचा अभ्यास करणे पसंत केले. येना विदयापीठात वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक असताना त्यांनी काँट्रिब्युशन्स टू फायटोजेनेसिस (१८३८) हा गंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी वनस्पतीचे विविध अवयव हे कोशिकांचे बनलेले असतात, असे प्रतिपादन केले. त्यांनी कोशिका केंद्रकाचे (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या मध्यवर्ती गोलसर भागाचे) महत्त्वही ओळखले होते. केंद्रकाचा कोशिका विभाजनाशी संबंध असतो असे त्यांच्या लक्षात आले. चार्ल्स डार्विन यांचा क्रमविकासाचा सिद्धांत मान्य करणारे श्लायडेन हे पहिले जर्मन जीववैज्ञानिक होत. श्लायडेन यांच्या वनस्पतिविषयक गंथामुळे वनस्पतिविज्ञानाच्या संशोधनाला चालना मिळाली. फ्रँकफुर्ट (जर्मनी) येथे ते मरण पावले.

जमदाडे, ज. वि.