ओषधि : (हर्ब). ही वर्णनात्मक संज्ञा क्षुपापेक्षा (झुडपापेक्षा) लहान, मऊ, क्वचित मांसल पण अल्पायू वनस्पतीस लावतात. या वनस्पतीचे खोड जास्तीत जास्त वर्षभर जमिनीवर टिकते. फक्त एका ऋतूत किंवा एका वर्षात पाने येणे, फुले येणे, फळे धरणे व बीजे बनणे या जीवनक्रिया संपल्यास ती ओषधी वर्षायू समजली जाते. उदा., सुर्यफूल. भेंडी, मका, तेरडा इत्यादी. परंतु काही ओषधी भूमिस्थित  (जमिनीतील ) खोडाच्या किंवा मुळांच्या साहाय्याने दुसेऱ्या वर्षीही जीवन चालू ठेवतात आणि फुले, फळे व बीज यांच्या निर्मितीनंतर ते संपते त्याना द्विवर्षायू म्हणतात. उदा., गाजर, मुळा, बीट इत्यादी. काही ओषधींची भूमिस्थित खोडे वर्षानुवर्षे वाढत राहून, प्रत्येक वर्षी त्यांवर पाने, फुले, फळे व बीजे येतात ह्या ओषधी बहुवर्षायू होत. उदा., कर्दळ, केळ, हळद, डेलिया, आले इत्यादी. उष्ण हवेत काही द्विवर्षायू ओषधी आपली जीवनयात्रा एका वर्षातच पूर्ण करतात.

पहा :  बहुऋतुजीविता वृक्ष क्षुप.

परांडेकर, शं. आ.