पेट्रिया : फुलझाडांपैकी व्हर्बिनेसी कुलातील (साग कुलातील) एका वंशाचे शास्त्रीय नाव. यूरोपात अठराव्या शतकात अनेक आयात वनस्पतींचे संकलन करण्याबद्दल प्रसिद्धी पावलेल्या रॉबर्ट जेम्स किंवा लॉर्ड पेट्रे (१७१०-४२) यांचे नाव या वंशास दिले असून ह्या वंशात सु. तीस जाती (काहींच्या मते बारा) समाविष्ट आहेत त्या सर्वच वेली असून त्यांचे मूलस्थान अमेरिकेतील उष्ण प्रदेश आहे. पेट्रिया व्हॉल्युविलीस (इं. पर्पल रीथ म. नील हार) ही जाती तिच्या सौंदर्याबद्दल लोकप्रिय असून भारतात ती सु. १५० वर्षांपूर्वी आणली गेली आहे व आता तिचा प्रसारही बराच झाला आहे. उत्तर भारतात ⇨विस्टारियाची वेल चांगली वाढत नाही तेथे ही वेल चांगली येते, त्यामुळे हिलाच विस्टारिया समजतात. तिचे खोड कठीण व त्यावरची साल खरबरीत व करडी असते. पाने मोठी (७-१० सेंमी.) ताठर, साधी, संमुख (समोरासमोर), अंडाकृती किंवा लंबगोल असतात. हिची सुंदर, नाजूक, निळी व बिनवासाची फुले फांद्यांच्या टोकास अनेक १७-२० सेंमी. लांब व लोंबत्या मंजऱ्यांवर मार्च-एप्रिलमध्ये, क्वचित पुन्हा ऑक्टोबरात येतात. दुरून तारकाकृती दिसणारा भाग हा निळा पंचदली संवर्त (पुष्पकोश) असून पुष्पमुकुट नसराळ्यासारखा पण लहान, पाच पाकळ्यांचा, गर्द निळा, पतिष्णू (गळून पडणारा) व संदलांनी पूर्णपणे वेढलेला असतो तो गळून पडल्यावर संवर्त मागे राहतो व दीर्घकाळ वेलीचे सौंदर्य कायम राखतो. एकात एक अशी दोन फुले बसविल्याचा आभास यामुळेच होतो. फळ शुष्क, न तडकणारे, दोन कप्प्यांचे व संवर्ताने वेढलेले आणि बिया एक किंवा दोन असतात. भारतात फळे येत नाहीत. सामान्य शारीरिक लक्षणे व्हर्बिनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पांढऱ्या फुलाची एक जाती (ॲल्बिफ्लोरा) आहे. नवीन लागवड कलमे व अध:श्वर [→ खोड] यांनी करतात प्रथम रेतीमिश्रित मातीत रोप तयार करून मग बागेत सकस जमिनीत लावतात. फुलोरे बरेच दिवस टिकत असल्यामुळे पुष्पपात्रात ठेवण्यास चांगले असतात. बागेत कमानीवर अथवा मांडवावर चढविल्यास शोभेत भर पडते.

(चित्रपत्र ५८).

चौगले, द. सी.