स्थूलकोनोतक : ( कोलेनकायमा ). लंबनाची प्रक्रिया चालू असलेल्या खोडाच्या टोकाच्या कोवळ्या भागात, पानांच्या देठात, शिरात, फुलांच्या देठात, पुष्कळशा द्विदलिकितांच्या परिपक्व पानात व कोवळ्या स्तंभात, पृष्ठाजवळ अपित्वचेखाली हे ऊतक ( समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह ) आढळते. कधीकधी प्रकाशात ठेवलेल्या मुळातही हे आढळते मात्र बहुधा सर्वच एकदलिकितांच्या स्तंभात व पानांत याचा अभाव असतो. प्ररोहाच्या टोकातील विभज्येपासून किंवा नंतर हिचे प्रभेदन होते. या ऊतकातील कोशिकांची साधारण मांडणी व रचना मृदूतका प्रमाणे असून त्यातील कोशिकांपेक्षा या कोशिका बहुधा काहीशा लांब आणि अरुंद असतात. आखूड कोशिका साधारण लोलका-सारख्या असून लांबट कोशिकांची टोके निमुळती असतात आडव्या छेदात कोशिका बहुभुजी असून कोशिकांतर अवकाश बहुधा नसते. स्थूल-कोनोतकाचे पुढील चार प्रमुख प्रकार पडतात : (१) कोनीय स्थूल-कोनोतक ( आंतरकोशिकीय बंध बिंदूवर जाड असणारे ), (२) स्पर्शरेखीय स्थूलकोनोतक ( कोशिका पंक्तीप्रमाणे रचलेल्या असून कोशिका-भित्ती-जवळ स्पर्श रेषेत समोरासमोर असतात ), (३) वलयाकृती ( कंकणाकृती ) स्थूलकोनोतक ( कोशिका-भित्ती एकसमान रीत्या जाड असतात ) व (४) सुविरल ( रिक्त ) स्थूलकोनोतक ( आंतरकोशिकीय पोकळी असलेले ).

कोशिकावरणात सेल्युलोज, पेक्टिनसंयुगे व ६० ७०% पाणी असते. ते आवरण प्रथम पातळ असते परंतु प्रभेदनानंतर कोनांमध्ये असमान ( उदा., काकडी वगैरे ), स्पर्श रेषेवर पट्टीप्रमाणे ( उदा., रेवंदचिनी) किंवा कोशिकांतर अवकाशाच्या बाजूंनी ( उदा., लेट्यूस, सॅल्व्हिया ) घनीभवन वाढत जाऊन अनुक्रमे कोनीय, पटलवंत, सुविरल इ. प्रकार आढळतात. मुख्यतः सेल्युलोज व पेक्टिनाचे घनीभवन कमी-जास्त होऊ शकतेउदा., प्ररोहाची कोवळी टोके वाहत्या वार्‍यामुळे होणार्‍या बाष्पीभवनास व त्या वार्‍याच्या दाबापासून संरक्षण करण्यास अधिक घन होतात उलट त्वक्षाकराच्या उत्पत्तीच्या वेळी किंवा इजा पोहोचलेल्या भागात घनीभवन कमी होते. जून झालेल्या भागात स्थूलकोनोतक कोशिकांवर लिग्निनाचा थर चढून त्याचे दृढोतकात रूपांतर होणे शक्य असते व तद्नंतर त्या कोशिका मृत होतात. स्थूलकोनोतकाच्या कोशिका विशिष्ट प्रकारच्या घनीभवनामुळे नम्य, स्वाग्रही व आकार्य असतात आकार्यता वयपरत्वे कमी होते ज्या अवयवात हे ऊतक आढळते, त्याच्या लंबनाबरोबर यातील कोशिकाही लांब होणे शक्य असते. कोशिकावरण खाचांकित असून खाचा गोल किंवा रेखा छिद्रित असतात.

घनीभवनाप्रमाणे कोशिकेच्या वेजाचा आकार गोल किंवा कोनीय असतो. कोशिकावरणाच्या आत परिकलाचा पातळ थर असून त्यात बिंदुक असते. कधीकधी या कोशिकांत हरितकणू किंवा टॅनीन आढळते उदा., चुका.

वनस्पतींच्या वाढत्या अवयवांना ( शुंडिका व पाने यांना ) आधार व सामर्थ्य देणे हे या ऊतकाचे मुख्य कार्य असून शिवाय हरितकणू असल्यास प्रकाशसंश्लेषणही तेथे होते.

घन, सुशिला प.