मान्ना: फ्रॅक्सिनस, यूकॅलिप्टस, अल्हागी, टॅमॅरिक्स इ. प्रजाती व बांबुसी उपकुल यांतील काही वनस्पतींपासून आणि विशेषतः मान्ना ॲश (फ्रॅक्सिनस ऑर्नस) या वनस्पतीपासून मिळणाऱ्या गोडसर खाद्यपदार्थास मान्ना म्हणतात, वनस्पतीच्या विविध भागांवर पडलेल्या वा पाडलेल्या छिद्रांमधून व चिरांमधून सावकाशपणे बाहेर झिरपणारा मधासारखा रस सुकून व कठीण होऊन मान्ना बनलेला असतो. मान्ना शर्करा म्हणजे मॅनिटॉल काही मान्नामधील मुख्य घटक असून मान्नामध्ये श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य व रेझीनही असते.

 फ्रॅक्सिनस प्रजातीतील काही जातींच्या वनस्पतींच्या खोडाला भेगा पडून अथवा चिरा पाडून मान्ना मिळतो. मान्ना ॲश या जातीपासून व्यापारी मान्ना मिळतो [→ ॲश]. हा छोटा वृक्ष भूमध्यसमुद्रभोवतालच्या व आशिया मायनर प्रदेशात आढळतो. उष्ण हवामानात याचा रस आपोआप पाझरतो. मात्र चिरा पाडल्याने रस पाझरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सु. दहा वर्षांच्या झाडाच्या फांद्या तोडून अथवा खोडाला चिरा पाडून मान्ना मिळवितात. झाडावर रस सुकून कठीण झाल्यावर तो गोळा करतात. इटली व सिसिलीत हा अधिक प्रमाणात गोळा करतात. पत्री, तुकडे, गुठळ्यांचे पुंजके या रूपांत याची विक्री होते. हा पदार्थ हलका, सच्छिद्र, पिवळसर व गोड असतो. लहान मुलांना सौम्य रेचक, कफोत्सारक व शोथशामक (दाहयुक्त सूज कमी करणारा) म्हणून, तसेच उच्च रक्तदाबाशी निगडित असलेल्या विकारांवर हा वापरतात. फ्रॅ. फ्लॉरिबंडा या जातीपासूनही मान्ना मिळतो.

 यूकॅलिप्टस व्हिमिनॅलीस या वनस्पतीच्या सालीला उन्हाळ्यात भेगा पडतात व त्यांतून स्त्राव येतो. त्यापासून बनणाऱ्या पदार्थाला ‘यूकॅलिप्टस मान्ना’ वा ‘ऑस्ट्रेलियन मान्ना’ म्हणतात. हा उपरोक्त व्यापारी मान्न्यासारखा असून ह्यात मुख्यत्वे अरॅबिनोज, रॅफिनोज, डेक्स्ट्रोज व सुक्रोज या शर्करा असतात.

 अल्हागी कॅमेलारुम किंवा अ. मौरोरम (म. गु. जवासो हिं. जवासा इं. कॅमल्स थॉर्न, प्रिकली अल्हागी, पर्शियन मान्ना) हे काटेरी सु. १ मी. उंचीचे झुडूप भूमध्यसामुद्रिक प्रदेश, प. आशिया व भारत (गुजरात, पंजाब, राजस्थान, उ. प्रदेश) येथे आढळते. याच्या पानापासून मिळणारा गोडसर स्त्राव सुकल्यावर त्याचे गुठळ्या असलेले अपारदर्शक पुंजके बनतात. हा मान्ना सौम्य रेचक असून पूर्वी इराणमधून भारतात ह्याची आयात होत असे.

 टॅमॅरिक्स अफायला, टॅ. डायोइका. टॅ. ट्‌रुपी, टॅ. मान्निफेरा आणि टॅ. गॅलिका ह्यांच्यापासूनही मान्ना मिळतो. काही खवले कीटक (कॉकस मान्निपॅरस किंवा ट्रॅब्युलिना मान्निपारा) या वनस्पतींच्या पानांवर व फांद्यांवर छिद्रे पाडतात. त्यामुळे त्यांच्यातून स्त्रवणाऱ्या रसापासून मान्ना तयार होतो, असे काहींचे मत आहे, तर या वनस्पतींवर पोसल्या जाणाऱ्या कीटकांमार्फत मान्ना स्त्रवला जातो [→ मधुरस], असेही मानणारे काही आहेत. अरबस्तानात अजूनही हा गोड पदार्थ मेवामिठाई, पाव इत्यादींत वापरतात. मध्यपूर्वेतील काही भागांत टॅमॅरिक्स प्रजातीच्या एका जातीच्या वनस्पतीच्या खोडातून जून महिन्यात पांढरे द्रव्य बाहेर पडते, ते हिमद्रवाप्रमाणे असून खाण्यास आल्हाददायक असते. त्याला ‘बदाऊनी मान्ना’ म्हणतात व बदाऊनी लोक हा मान्ना भाकरीबरोबर खातात.

 रुक्ष भागातील फुले येणाऱ्या बांबूच्या देठांपासून कधी कधी गोड, पांढरा, खाद्य डिंकासारखा पदार्थ स्त्रवतो. जावामध्ये मिळणाऱ्या अशा मान्नामध्ये मुख्यत्वे मेलिटोज व मेलिझायटोज या शर्करा असतात. यांशिवाय नैर्ऋत्य आशियात ओकपासून ‘ओक मान्ना’, अमेरिकेत शुगर पाइनपासून (पायनस पँबरटियाना) ‘अमेरिकन मान्ना’ व तागुआ पामपासून (फायटेलेफस मायक्रोकार्पा) ‘पाम मान्ना’ मिळतो. [→ पाम].

 बायबलमध्ये मान्नाचा उल्लेख आहे. जुन्या कराराच्या एक्झोडस या दुसऱ्या पुस्तकात ज्यू लोकांना ईजिप्तमधून बाहेर पडल्यावर ४० वर्षे विजनवासात भटकावे लागल्याचा उल्लेख आहे. या काळात चमत्कार होऊन स्वर्गातून खाली आलेले अन्न त्यांना खावयास मिळाले. या अन्न पदार्थालाच मान्ना म्हटले आहे. हा मान्ना वर उल्लेखिलेल्या टॅमॅरिक्स प्रजातीतील वनस्पतींपासून अथवा नोस्टॉक या निळसर हिरव्या शैवलांपासून किंवा लेकॅनोरा प्रजातीतील दगडफुलांच्या अनेक जातींपासून मिळणारा मान्ना असावा. यांपैकी लेकॅनोरा एस्क्युलेंटा या डोंगराळ भागातील खाद्य दगडफुलांचे हलके गोळे बनतात. ते वाऱ्याने दगडापासून सुटे होतात आणि हळूहळू तरंगत खाली येऊन (स्वर्गातून आल्याप्रमाणे) सखल भागात साचतात. जेव्हा त्या ज्यू लोकांनी हा प्रथम चाखून पाहिला तेव्हा त्यांनी ‘मान हू?’ (हे काय आहे?) असा प्रश्न केला व त्यावरून या पदार्थांचे मान्ना असे नामकरण झाले असावे. हा थोड्या प्रमाणात पावात (ब्रेड) वापरतात व त्याला ‘स्वर्गातील पाव’ म्हणतात. हा पाव ख्रिश्चनांच्या यूकॅरिस्टचे (प्रभुभोजनाचे) प्रतीक मानतात.

पहा : मान्ना शर्करा.

मिठारी, भू. चिं. ठाकूर, अ. ना.