अपित्वचा : वाहिनीवंत (द्रवपदार्थ वाहून नेणाऱ्‍या वाहिन्या असलेल्या) वनस्पतींच्या कोवळ्या म्हणजे प्राथमिक शरीराच्या कोणत्याही भागावरच्या सर्वांत बाहेरच्या कोशिकांच्या (शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या) थरास ही संज्ञा वापरतात. क्वचित दोन किंवा अधिक थरांची (उदा., वड, रबर, बिगोनिया, कण्हेर इत्यादींची पाने)  अपित्वचा आढळते काही वनस्पतींच्या बाबतीत अपित्वचेखालच्या ⇨मध्यत्वचेचे बाहेरचे थर अपित्वचेत गणले जातात. पाने, फुले व बहुतेक फळे यांवरची अपित्वचा ह्या अवयवांवर त्यांच्या सर्व जीवनात टिकून राहते परंतु कित्येक वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्‍या), द्विवर्षायू व सर्व बहु वर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्‍या) वनस्पतींच्या जून झालेल्या  मूळ, खोड व फांद्या यांच्या बाहेरच्या भागांवरील अपित्वचेचा नाश होऊन त्या जागी नवीन गुणधर्माची ⇨परित्वचा  निर्मिली जाते. अपित्वचा हे ऊतक तंत्र (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचा व्यूह) समजले जाण्याचा कारण उतकाशिवाय काही इतर संरचनात्मक वैशिष्ट्ये त्यात आढळतात (पहा : आकृती).

अपित्वचा. (अ) पृष्ठ दृश्य : (१) अपित्वचा, (२) त्वग्रंध्र, (३) रक्षक कोशिका, (४) छिद्र, (५) गौण कोशिका (आ) आडवा छेद : (६)उपत्वचा, (७) अपित्वचा, (८) रक्षक कोशिका, (९) छिद्र, (१०) गौण कोशिका.

कोशिकावरणाची जाडी सर्वत्र सारखी नसते. ⇨एक्विसीटम  व ⇨डायाटम  यांच्या कोशिकावरणात सिलिका असते. अपित्वचेच्या कोशिका परस्परांस घट्ट चिकटून असतात. त्यामध्ये रक्षक कोशिकांनी वेढलेली बारीक छिद्रे 

[→ त्वग्रंध्रे] असतात. अपित्वचेच्या कोशिका उभ्या छेदात सपाट विटे – सारख्या दिसतात तथापि पुष्कळदा त्यांत आकार व संरचना यांचे वैचित्र्य आढळते. ह्या कोशिका जिवंत असून त्यात हरितकणू (हरितद्रव्ययुक्त जीव-द्रव्याचा विशेषित भाग) बहुधा नसतात क्वचित रंगद्रव्ये,  स्फटिक व वर्णकणू (एक किंवा अधिक रंग -द्रव्ये असलेला जीवद्रव्याचा विशेषित भाग) आढळतात. कोशिकावरणाच्या बाहेरच्या बाजूस व उभ्या (अरीय) भित्तींवर ⇨ उपत्वचेचा कमीअधिक जाडीचा थर बहुधा आढळतो. कोशिकांवर कमीअधिक लांबीचे एक कोशिक किंवा अनेककोशिक केस कधीकधी  आढळतात. मुळांच्या टोकाशी मूलत्राणावरच्या[→ मूळ] भागांवर अपित्वचेपासून निघालेले अनेक एककोशिक सूक्ष्म केस (मूलरोम) असतात. अपित्वचेचे कार्य मुख्यत: संरक्षणाचे असते त्याशिवाय इतर किरकोळ कार्येही (अन्नोत्पादन, जलसंचय, स्रवण, शोषण, संवेदना इ.) असतात. काही ऑर्किडांच्या वायवी मुळावर जलशोषक व अनेक थरांची अपित्वचेचा (व्हलॅमेन) असते.

पहा : ऑर्किडेसी ऊतके, वनस्पतींतील कोशिका विभज्या शारीर, वनस्पतींचे.

परांडेकर, शं. आ.