जांभा–१ : (सुरीया, येरूळ हिं. जांबू क. जांबे सं. कनककुली इं. आयर्नवुड ट्री ऑफ पेगू अँड आराकान, पिंकॅडो लॅ. झायलिया डोलॅब्रिफॉर्मिस कुल-लेग्युमिनोजी). सु. १५–१८ मी. उंच आणि २·६ ते ३·६ मी. घेर असलेला हा मोठा पानझडी व शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष सयाम, मलाया, ब्रह्मदेश, सिंगापूर, इंडोचायना, फिलिपीन्स व भारत (मध्य प्रदेश, दक्षिण भारत, कोकण) येथील जंगलांत आढळतो. ⇨बाभूळ  आणि ⇨शिरीष  यांच्या शिंबी कुलातील [⟶ लेग्युमिनोजी, उपकुल मिमोजॉइडी] असल्याने सामान्य शारीरिक लक्षणे त्यांच्यासारखी आहेत. याचे कोवळे भाग लवदार असून साल करडी किंवा तपकिरी व भेगाळ असते ती पातळ तुकड्यांनी सोलली जाते. पाने एकाआड एक, संयुक्त व दोनदा विभागलेली, पिसासारखी असून ती उन्हाळ्यात गळतात. स्तबकासारखे [⟶ पुष्पबंध] गुच्छ फुलोरे मार्च ते एप्रिलमध्ये येतात. फुले पिवळट पांढरी, लहान आणि फळ (शिंबा) चपटे, कठीण, तडकणारे, करडे तपकिरी असते. बिया सहा ते दहा, चकचकीत, पिंगट व साधारण चपट्या असतात. लाकूड लालसर, तपकिरी, अत्यंत कठीण व टिकाऊ असून घरबांधणी, तेलघाणे, सिलीपाट, तक्तपोशी, आगगाडीचे डबे, वाघिणी, पूलबांधणी, गाड्या, नावा इत्यादींस फार उपयुक्त असते. खोडातून टॅनीनयुक्त द्रव्य काढतात. सालीचा काढा कृमिनाशक असून कुष्ठ, वांत्या, अतिसार, परमा, जखमा इत्यादींवर गुणकारी असतो. बियांचे तेल संधिवात, मूळव्याध व कुष्ठ यांवर उपयुक्त आहे. 

परांडेकर, शं. आ.