दुतोंड्या साप : हा साप बोइडी या सर्पकुलातील आहे. ⇨ अजगर, ⇨ बोआ, ⇨ कांडर इ. सापांचा या कुलात समावेश होतो. याचे प्राणिशास्त्रातील नाव एरिक्स जॉनाय आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि प. भारत यांतील मैदानी व डोंगराळ भागांत तो नेहमी आढळतो.

जमिनीवरील सर्व सापांच्या शेपटीला टोक असते पण याचे शेपूट जाड, आखूड, बोटके आणि गोलसर असल्यामुळे दुरून ते डोक्यासारखे दिसते. यावरून त्याला दुतोंड्या साप हे नाव पडले आहे. भोळसट लोकांची तर अशी समजूत आहे की, हा साप सहा महिने एका तोंडाकडून तर सहा महिने दुसऱ्या तोंडाकडून चालतो. या सापाला दोन तोंडे असतात हा लौकिक समज टिकविण्याकरिता गारुडी पुष्कळदा या सापांच्या बोथट शेपटीच्या टोकावर मोठी चीर पाडून ते दुसरे तोंड म्हणून दाखवितात.

याचे शरीर जाड आणि जड असते. लांबी १–१·२५ मी. असते. रंग गर्द तपकिरी किंवा काळा असतो. पाठीवर ठिपके किंवा पट्टे असतात पण काहींमध्ये मुळीच नसतात. मुस्कट पुढे आलेले असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला चिकटलेले असते. डोळे अगदी बारीक असतात. डोळ्यांतील बाहूल्या उभ्या व त्यांच्या भोवतालचा पडदा पिवळा असतो. हा साप बिळे करणारा आहे. उंदीर, घुशी, खारी, सरडे वगैरे प्राणी याचे भक्ष्य होय. अजगराप्रमाणेच भक्ष्याभोवती घट्ट विळखे घालून तो या प्राण्यांना मारून गिळतो.

हा एक बिनविषारी आणि निरुपद्रवी साप आहे. त्याची सरपटण्याची रीत मंद आणि बेडौल असते.

पिल्ले तपकिरी रंगाची असून त्यांच्या पाठीवर शेपटाकडे आडवे काळे पट्टे असतात. पिल्ले जसजशी मोठी होत जातात तसतसे हे पट्टे हळूहळू नाहीसे होतात आणि पाठीचा रंग एकसारखा काळा होतो.

कर्वे, ज. नी.