स्टेशिअस, पब्लिअस पापिनिअस : ( सु. ४०—सु. ९६). लॅटिन साहित्याच्या रौप्ययुगातील ( इ. स. १४—११७) एक प्रमुख कवी. जन्म इटलीतील नेपल्स ( प्राचीन नाव नीअपलिस ) येथे. त्याचे वडील शाळाशिक्षक होते. ते साहित्याचे अध्यापन करीत. ते कवीही होते. आपल्या मुलातील साहित्याची आवड त्यांनी जोपासली आणि त्याला कविता करण्यास उत्तेजन दिले. स्टेशिअसने क्लॉदिन्या नावाच्या एका विधवेबरोबर विवाह केला होता. तिला एक मुलगी होती. स्टेशिअसला मात्र स्वतःचे असे अपत्य नव्हते तथापि एका गुलाम मुलाचा त्याने पुत्रवत सांभाळ केला होता. त्या मुलाच्या मृत्यूबद्दल उत्कट दुःख व्यक्त करणारी एक कविता त्याने लिहिली आहे. स्टेशिअस रोमला गेला आणि रोमन सम्राट डोमिशन ( कार. ८१—९६) ह्याच्या पदरी दरबारी कवी म्हणून राहिला. इ. स. ९४ मध्ये तो नेपल्सला परतला असावा. नेपल्समध्येच त्याचे निधन झाले.

स्टेशिअसच्या उपलब्ध काव्यरचनांत Silvae ( इं. शी. ‘ फॉ रेस्ट्स ’ ) हा कवितासंग्रह (५ भाग, एकूण कविता ३२), तसेच Thebaid आणि Achilleid ह्या महाकाव्यांचा अंतर्भाव होतो. Silvae मधील कवितांत पाच कविता सम्राट डोमिशन आणि त्याचा अनुग्रह लाभलेल्या काही व्यक्ती ह्यांच्या स्तुतिपर आहेत. विवाह, कोणाला निरोप देणे, कोणाचा जन्मदिन अशा प्रासंगिक विषयांवरच्या कविताही ह्या संग्रहात आहेत. आपल्या मित्रांच्या व्हिला ( इटलीतील वैशिष्ट्यपूर्ण घरांचा प्रकार ) आणि त्यांच्या समोरील बागा ह्यांची चित्रमय शैलीतली वर्णनेही त्याच्या कवितांतून येतात. निद्रा हा त्याच्या एका कवितेचा विषय आहे.

Thebaid ह्या महाकाव्याचे बारा सर्ग आहेत. ह्या महाकाव्याची रचना स्टेशिअस बारा वर्षे करीत होता. इ. स. ९२ मध्ये त्याने ते प्रसिद्ध केले. ईडिपसचा पुत्र पॉलिनायसीझ ह्याने आपला भाऊ एटिओक्लीझ ह्याच्याकडून थीब्ज ह्या प्राचीन ग्रीक शहराची सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पॉलिनायसीझ आणि त्याचे समर्थक ह्यांनी त्याच्या-विरुद्ध हाती घेतलेली मोहीम हा ह्या महाकाव्याचा विषय. ह्या महा-काव्यावर महाकवी ⇨ व्हर्जिलचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. महाकाव्याच्या अखेरीस त्याने व्हर्जिलबद्दलचा आपला आदरभाव व्यक्त केलेला आहे. Achilleid हे महाकाव्य ट्रोजन युद्धातला थोर वीर आकिलीझ ह्याच्या कथेवर लिहिण्याचा संकल्प त्याने केला होता तथापि त्याचा पहिला सर्ग आणि दुसर्‍या सर्गाचा काही भागच तो लिहू शकला.

स्टेशिअसची निवेदनशैली जोमदार असली, तरी तीत काही प्रमाणात कृत्रिमता जाणवते. त्याच्या व्यासंगाचा प्रत्यय देणारे निर्देशही ठिकठिकाणी आढळतात.

मध्ययुगात स्टेशिअसची प्रशंसा इंग्रज कवी ⇨ चॉसर (१३४०—१४००) आणि इटालियन महाकवी ⇨ दान्ते (१२६५—१३२१) ह्यांनी केलेली आढळते. ⇨ अलेक्झांडर पोप आणि ⇨ टॉमस ग्रे ह्या इंग्रज कवींनी Thebaid चे काही भाग इंग्रजीत अनुवादिले आहेत.

कुलकर्णी, अ. र.