जूव्हेनल : (इ. स. सु. ६०–१२७ नंतर). श्रेष्ठ रोमन उपरोधकार. पूर्ण लॅटिन नाव डेसिमस जूनिअस जूव्हेनेलिस. त्याच्या जीवनासंबंधी निश्चित स्वरूपाची अशी माहिती फारशी उपलब्ध नाही. जूव्हेनलची आज उपलब्ध असलेली चरित्रे बरीच उत्तरकालीन असून त्यांतील काही माहिती असंभाव्य वाटते तसेच ह्या चरित्रात पूर्ण एकवाक्यताही नाही. इटलीतील ॲक्वायनम येथे तो जन्मला असावा. काही काळ त्याने वक्तृत्वाचा व्यासंग आणि व्यवसाय केला असावा, असे दिसते. इ. स. ९८ पासून त्याच्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा आरंभ झाला असावा. जूव्हेनलने आपल्या एका उपरोधिकेतील काही भाग रोमचा सम्राट डोमिशन (कार. ८१–९६) ह्याच्या खास मर्जीतला एक नट, पॅरिस ह्याला उद्देशून लिहिला होता. तथापि अन्य एका नटाने तो आपल्याच विरुद्ध असल्याचा समज करून घेऊन ट्रेजन (कार. ९८–११७) ह्या रोमच्या सम्राटाकडून जूव्हेनलला ईजिप्तमध्ये हद्दपार करविले आणि तेथेच जूव्हेनल वृद्धावस्थेत मरण पावला, असे म्हटले जाते.

जूव्हेनलने सोळा उपरोधिका लिहिल्या. त्या एकूण पाच भागांत संपादित करण्यात आल्या आहेत. ह्या उपरोधिकांतून रोममधील जीवनातील अपप्रवृत्ती आणि विसंगती ह्यांचा त्याने विदारक उपहास केलेला आहे. आपण पूर्वकालीन जीवनाबाबत लिहित आहोत, अशी जूव्हेनलची भूमिका दिसत असली, तरी रोममधील पूर्वकालीन जीवनातील दोष त्याला आपल्या समकालीनांमध्येही दिसत होतेच, हेही ह्या उपरोधिकांवरून प्रतीत होते. कडवट, बोचरा, निष्ठुर उपरोध नीतिवादी सूर आणि वेधक शैली ही जूव्हेनलच्या उपरोधिकांची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. हॉरिसला त्याने आपला गुरू मानले असले, तरी हॉरिसचा सहानभूतिसंपन्न विनोद जूव्हेनलच्या उपरोधिकांत आढळून येत नाही. रोमन जीवनाचे त्याने रंगविलेले चित्र निराशाजनक असले, तरी अनेक दोषांचे अतिरंजित दर्शन घडविण्याकडे त्याची प्रवृत्ती असल्याचेही प्रत्ययास येते.

ड्रायडन, सॅम्युएल जॉन्सन आदी इंग्रज कवींवर जूव्हेनलचा विशेष प्रभाव दिसून येतो. जॉन्सनच्या ‘लंडन’ आणि ‘व्हॅनिटी ऑफ ह्यूमन विशेस’ ह्या दोन कवितांवर जूव्हेनलच्या अनुक्रमे तिसऱ्या व दहाव्या उपरोधिकेचा प्रभाव पडलेला आहे.

कुलकर्णी, अ. र.