हॉरिस : (इ. स. पू. डिसेंबर ६५–२७ नोव्हेंबर ८). श्रेष्ठ लॅटिन भावकवी आणि उपरोधकार. रोमन नाव क्विंटस होरेशस फ्लॅकस. जन्म व्हेन्युसिया, इटली येथे. एके काळी त्याचे वडील गुलाम होते परंतु हॉरिसच्या जन्मापूर्वी ते स्वतंत्र झाले होते आणि त्यांना नागरिकत्व मिळाले होते. व्हेन्युसिया येथे असलेल्या होरेशिअन ह्या जमातीवरून होरशिअस असे त्याचे नाव ठेवले गेले, असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. मुक्ततेनंतर लिलावांच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या रकमा जमविण्याचे काम हॉरिसचे वडील करीत असत. त्यांची थोडी मालमत्ताही होती. आपल्या मुलाला उत्कृष्ट संस्कारक्षम शिक्षण देण्याची त्याची ऐपत होती. त्यामुळे त्यांनी हॉरिसला प्रथम रोमला आणि नंतर अथेन्सला शिक्षणासाठी पाठविले. हॉरिस हा ग्रीसमध्ये असताना तेथे यादवी युद्ध उद्भवले. इ. स. पू. ४४ मध्ये जूलिअस सीझरचा खून झाल्यानंतर मार्कस ब्रूटस आणि कॅशिअस ह्या सीझरच्या मारेकऱ्यांविरुद्ध अँटनी आणि ऑक्टेव्हिअस ( पुढे ऑगस्टस प्रसिद्धीस आलेला) ह्यांनी केलेले हे युद्ध होते. ह्या युद्धात हॉरिस ट्रिब्यून म्हणून ब्रूटसच्या सैन्यात सहभागी झालेला होता. एके काळी गुलाम असलेल्या बापाच्या मुलाला मिळालेला हासन्मान अपवादात्मक होता. फिलीप्पी येथील युद्धात पराभव झाल्यानंतरतो इटलीला परतला. त्यानंतर लष्करातली त्याची अल्पशी कारकीर्द संपुष्टात आली होती. वडिलांकडून त्याला मिळणारी मालमत्ता जप्त करण्यात आली. अँटनी आणि ऑक्टेव्हिअस यांच्या विरुद्ध तो लढाईत लढला होता तथापि इ. स. पू. ३९ मध्ये ऑक्टेव्हिअसने जाहीर केलेल्या सार्वजनिक माफीचा त्याला फायदा मिळाला. सरकारी खजिन्यातील एक कारकून म्हणून त्याला नोकरीही मिळाली. त्यानंतर तो काव्यलेखनाकडे वळलेला दिसतो. त्याची आरंभीची एपोड्स आणि उद्देशिका (ओड्स) ह्याच काळातली. एपोड हे ग्रीक कवी आर्किलोकस ह्याने भावकवितेसाठी निर्मिलेले एक वृत्त. हॉरिसने ह्या वृत्तात केलेल्या काव्यरचनांचे विषय मुख्यतः राजकीय आहेत. आपल्या शत्रूंचा उपहास करण्यासाठीही त्याने ह्या वृत्तात काव्यरचना केल्या.

 

हॉरिसच्या काव्यरचनेमुळे त्याची व्हेरिअस आणि व्हर्जिल ह्या कवींशी ओळख झाली. त्यांच्यामुळेच रोमन मुत्सद्दी आणि वाङ्मयप्रेमी गेयस मिसीनस ह्याच्याशी त्याचा परिचय झाला. मिसीनस हा पहिलारोमन सम्राट ऑगस्टस (ऑक्टेव्हिअस) ह्याचा विश्वासू सल्लागार होता. ऑक्टेव्हिअसच्या नव्या राजसत्तेच्या गौरवासाठी मिसीनसला चांगल्या साहित्यिकांची आवश्यकता वाटत होती. ह्या पार्श्वभूमीवर मिसीनसच्या मित्र वर्तुळात हॉरिसला प्रवेश मिळाला. मिसीनसचा आणि सम्राट ऑगस्टसचा हॉरिसवरचा अनुग्रह सतत वाढतच गेला. इ. स. पू. ३७ मध्ये व्हेरिअस आणि व्हर्जिल ह्यांच्यासह एका राजनैतिक कामासाठी मिसीनसबरोबर तो जाऊनही आला.

 

इ. स. पू. ३५ मध्ये हॉरिसच्या उपरोधिकांचा Carmen Saeculare हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला. सटायर्सचे हे दुसरे पुस्तक इ. स. पू.३० मध्ये आणि मिसीनसच्या सूचनेवरून इ. स. पू. २९ मध्ये एपोड्स प्रसिद्ध झाली. इ. स. पू. ३४ किंवा ३३ मध्ये मिसीनसने त्याला एक शेत दिले. उत्पन्नाच्या ह्या स्रोतामुळे हॉरिसला स्वास्थ्य मिळाले त्याच्या विविध पुस्तकांची प्रकाशने म्हणजे ह्या काळातल्या त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना होत. त्याच्या उद्देशिकांचे ओड्स– पहिले तीन संग्रहइ. स. पू. २३ मध्ये प्रसिद्ध झाले. इ. स. पू. २० मध्ये त्याची तात्त्विक स्वरूपाची एपिसल्स (२ भाग) प्रसिद्ध झाली. सम्राट ऑगस्टसच्या विनंतीवरून त्याच्या उद्देशिकांचा चौथा संग्रह त्याने प्रकाशित केला(इ. स. पू. १३). ४७६ ओळींची आर्स पोएटिका ही दीर्घ कविता बहुधा त्याने ह्यानंतर लिहिली. एक प्राचीन साहित्यसमीक्षात्मक दस्तऐवज म्हणून ह्या कवितेचे मोल मोठे आहे.

 

हॉरिसचा मित्र आणि आश्रयदाता मिसीनस ह्याच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनी हॉरिस रोम येथे निधन पावला.

 

हॉरिसची कवी म्हणून असलेली कीर्ती मुख्यतः त्याच्या उद्देशिकांवर अधिष्ठित आहे. त्यांत त्याने रोमन साम्राज्याच्या आकांक्षा व्यक्त केल्या असून सम्राट ऑगस्टसला गौरविले आहे. त्यामुळे एक थोर राष्ट्रीय कवी म्हणूनही त्याला मान्यता मिळाली. आपल्या मित्रांच्या जीवनातील काही प्रसंग, जीवनाची क्षणभंगुरता हेही त्याच्या उद्देशिकांचे काही विषय होत. त्याच्या कवितांतून रोमन समाजातल्या उच्च, तसेच कनिष्ठ वर्गाचे वेधक चित्रण आढळते. लॅटिन साहित्यात अनेक नव्या शब्दप्रयोगांची तसेच वाक्प्रयोगांची त्याने भर घातली आहे. इंग्रजी भावकविता तसेच उपरोधिका यांवर त्याचा प्रभाव मोठा आहे. परिपूर्ण घाट, भावनेची उत्स्फूर्तता, त्याचे राष्ट्रप्रेम, त्याची नागरता आणि त्याचा विनोद ही त्याच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

 

दान्तेने तत्कालीन रोमन कवींत होमर आणि व्हर्जिलनंतर हॉरिसला तिसऱ्या क्रमांकावर स्थान दिले आहे.

 

पहा : लॅटिन साहित्य.

 

संदर्भ : 1. Brink, C. O. Horace on Poetry, 1963.

           2. Commager, Henry Steele, Jr. The odes of Horace: A Critical Study, 1962.

           3. Fraenkel, Eduard, Horace, 1957.

           4. Rudd, Niall, The Satires of Horace: A Study, 1966.

           5. Wilkinson, L. P. Horace and His Lyric Poetry, 1951.

 

गुडेकर, विजया