ॲटिकस, टायटस पाँपोनिअस : (१०९–३२ इ.स.पू.). एक विद्याप्रेमी रोमन सरदार. त्याचा जन्म रोम येथे झाला. सुप्रसिद्ध रोमन वक्ता व व मुत्सद्दी सिसेरो हा त्याचा शालेय जीवनातील सहाध्यायी होता. इ.स.पू. ८८ त इटलीतील यादवी युद्धाची झळ भासू नये म्हणून आपली सर्व मालमत्ता घेऊन तो अथेन्सला आला व इ.स.पू. ६५ पर्यंत तेथेच राहिला. हा काळ त्याने विद्याव्यासंगात घालविला. अथेन्सच्या राज्यातील ॲटिका येथे याचे वास्तव्य दीर्घकाळ झाल्यामुळे त्याला ‘ॲटिकस’ हे नाव मिळाले. रोमन इतिहास आणि वंशशास्त्र यांसारख्या विषयांवर ग्रीक व लॅटिन भाषांतून त्याने ग्रंथलेखन केले. सिसेरोने त्याला लिहिलेल्या पत्रांचा एक संग्रहही त्याने संपादित केला होता तथापि आज त्याचा एकही ग्रंथ उपलब्ध नाही. तो एपिक्यूरस मताचा होता. अथेन्स येथे एक भव्य ग्रंथालय त्याने उभारले होते. मौल्यवान ग्रंथांच्या नकला करून घेण्यासाठी त्याने गुलाम नेमले होते. अथेन्स येथील वास्तव्यानंतर तो रोमला परतला. असाध्य रोगाने पछाडल्यामुळे अन्नत्याग करून त्याने मृत्यू पतकरला.

हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)