नेपॉस, कॉरनील्यस : (सु. १०० – सु. २५ इ. स. पू.). रोमन इतिहासकार. इटलीतील टीसीनम येथे त्याचा जन्म झाला असावा. तथापि त्याचे बरेचसे आयुष्य रोममध्येच गेले. ⇨काटलस ह्या श्रेष्ठ रोमन कवीशी त्याची मैत्री होती आणि काटलसने त्याला आपल्या कविता अर्पण केल्या होत्या.

नेपॉसचे बरेचसे लेखन आज अनुपलब्ध आहे. Chranica ह्या नावाने लिहिलेला जगाचा इतिहास, Exempla (रोमन इतिहासातील काही प्रसंग), एक भूगोलविषयक ग्रंथ ह्यांचा त्यात अंतर्भाव होतो. De Viris illustribusह्या त्याने लिहिलेल्या एका चरित्रग्रंथातील २४ चरित्रे आज आपणास उपलब्ध आहेत. रोमन आणि अ-रोमन अशा श्रेष्ठव्यक्तींची चरित्रे लिहिण्याचा हेतू हा ग्रंथ लिहिण्यामागे होता. इतिहासलेखनाच्या दृष्टिकोणातून पाहता, त्यात अनेक चुका असल्याची टीका ह्या ग्रंथावर झालेली आहे. ह्या चरित्रांची मांडणीही फारशी प्रमाणबद्ध वाटत नाही मात्र परदेशी व्यक्तींच्याही गुणांची कदर करण्याची प्रवृत्ती नेपॉसमध्ये आढळते. रोममधील एक अभिरुचिसंपन्न वाङ्‌मयप्रेमी ॲटिकस (टायटस पाँपोनिअस) तसेच सिसरो आणि थोरला केटो ह्यांची चरित्रेही नेपॉसने लिहिली आहेत. नेपॉसची लेखनशैली सुबोध पण नीरस आहे.

कुलकर्णी, अ. र.