फीड्रस : (इ.स.पू. सु. १५ – इ.स. सु. ५४). रोमन बोधकथाकार. त्याने लिहिलेल्या बोधकथांच्या उपोद्‌घात-उपसंहारांवरून त्याची काही माहिती मिळते. तो मॅसिडोनिआत जन्मला. तेथून तो रोमला आला. तो मूळचा गुलाम परंतु सम्राट ऑगस्टसने त्याला मुक्त केले होते. ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींचा त्याचा चांगला अभ्यास होता, असे दिसते. सम्राट ऑगस्टसनंतर झालेल्या टायबीअरिअस (कार. इ. स. १४-३७), कॅलिगुला (कार. इ.स. ३७-४१) आणि पहिला क्लॉडियस (कार. इ.स. ४१-५४) ह्या तिघांच्या कारकीर्दी त्याने पाहिल्या, असेही दिसून येते.

फीड्रसच्या बोधकथांचे पाच खंड असून त्यांत मुख्यतः ग्रीक बोधकथाकार ⇨ इसाप ह्याच्या नावावर मोडणाऱ्या कथांना लॅटिन पद्यरूप दिलेले आहे. अन्य ठिकाणांहून घेतलेल्या बोधकथा-दंतकथा तसेच फीड्रसने स्वतः रचिलेल्या काही बोधकथाही त्यांत अंतर्भूत आहेत. ह्या बोधकथांतून तत्कालीन सामाजिक-राजकीय जीवनातील अपप्रवृत्तींवर उपरोधप्रचुर टीका फीड्रसने अनेकदा केलेली आहे. टाअबीअरिअस ह्या सम्राटाचा मंत्री सिजेअस ह्याला फीड्रसच्या काही बोधकथा आक्षेपार्ह वाटल्यामुळे फीड्रसला शिक्षा भोगावी लागली होती.

फीड्रसच्या पूर्वी क्विन्टस एनिअस, हॉरिस ह्यांच्यासारख्या रोमन कवींच्या काव्यरचनांतून काही बोधकथा येऊन गेलेल्या होत्या परंतु लॅटिन साहित्यात ⇨बोधकथा ह्या साहित्यप्रकाराला एक स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचे श्रेय फीड्रसला दिले जाते. त्याच्या बोधकथांची पहिली छापील आवृत्ती १५९६ मध्ये काढण्यात आली. तिचेही पाच खंड आहेत. जे. पी. पोस्टगेट आणि ए. ब्रॅनॉट ह्यांनी संपादिलेल्या फीड्रसच्या बोधकथांच्या आवृत्या (१९२०, १९२४) प्रसिद्ध असून ब्रॅनॉट ह्याच्या आवृत्तीत ह्या बोधकथांचे फ्रेंच भाषांतरही देण्यात आलेले आहे

कुलकर्णी, अ. र.