ऑव्हिड : (इ. स. पू. ४३–इ. स. १८) प्रसिद्ध रोमन कवी. संपूर्ण लॅटिन नाव पब्लिअस ओव्हिडिअस नेसो. जन्म इटलीतील सूल्मोना (प्राचीन स‌ल्मो) येथे एका संपन्न इक्वेस्ट्रिअन कुटुंबात. स‌रकारी नोकरीत त्याने आपला उत्कर्ष साधावा, अशी त्याच्या पित्याची इच्छा होती व त्या दृष्टीने आवश्यक असे उत्तम शिक्षणही त्यास देण्यात आले होते. तथापि काही कनिष्ठ अधिकारपदांवर कामे केल्यानंतर त्याने स‌रकारी नोकरीचा त्याग करुन सर्वस्वी साहित्यसेवेला वाहून घेतले. त्याने लिहिलेल्या विफल प्रेमाच्या कवितांमुळे तो प्रथम कवी म्हणून प्रसिद्धीस आला. Amores (इं. शी. लव्हज), Heroides (इं. शी. हिरॉइन्स), Ars amatoria (इं. शी. आर्ट ऑफ लव्ह), Remedium amoris (इं. शी. लव्हज रेमिडी), Medicina faciei (इं. शी. फेस लोशन्स), Metamorphoses, Fasti (इं. शी. कॅलेंडर), Tristia (इं. शी. सॉरोज), Epistulae ex Ponto (इं. शी. लेटर्स फ्रॉम द ब्लॅक सी) हे त्याचे काही काव्यग्रंथ. ‘लव्ह्ज’ मध्ये त्याच्या अगदी आरंभीच्या विफल प्रेमाच्या कविता आहेत. ‘हिरॉइन्स’ मध्ये ग्रीक व रोमन पुराणकथांमधील पनेलपी, मीडीअ, डायडो यांसारख्या स्त्रियांनी आपापल्या प्रियकरांना लिहिलेली काल्पनिक पत्रे आहेत तर ‘आर्ट ऑफ लव्ह’ मध्ये गणिकेचे प्रणयाराधन कसे करावे, ह्याचे वर्णन आहे. हा ग्रंथ नीतिविरोधी आहे अशीटीका नीतिवाद्यांकडून झालेली आहे. या ग्रंथाचे तीन भाग असून तिसऱ्याभागात प्रियकर कसा मिळवावा आणि ताब्यात ठेवावा यासंबंधी तरुण स्त्रियांना सूचना आहेत. ‘लव्हज रेमिडी’ मध्ये प्रेमातून अंग काढून घेऊन प्रेमप्रकरणे कशी संपवावीत हे सांगितले आहे. ‘फेस लोशन्स’ च्या सु. शंभर ओळी उपलब्ध आहेत. त्यात स्त्रियांच्या स‌ौंदर्यप्रसाधनांवर लिहिले असून ते व्हर्जिलच्या जॉर्जिक्सचे विडंबन असावे.

मेटॅमॉर्फसिस  हा ऑव्हिडचा स‌र्वश्रेष्ठ ग्रंथ होय. पश्चिमी साहित्यातील श्रेष्ठ कृतींतही त्याची गणना होते. हा हेक्झॅमीटरमध्ये लिहिलेला असून त्यात अनेक मिथ्यकथा आणि आख्यायिका कौशल्याने एकत्र गुंफिल्या आहेत. त्याच्या प्रतिभेचा सामर्थ्यशाली आविष्कार येथे प्रकर्षाने दिसून येतो. ‘कॅलेंडर’ चे स‌हा भाग असून त्यात जानेवारी ते जून या स‌हा महिन्यांतील प्रत्येक दिवसाशी निगडीत असलेल्या मिथ्यकथा, आख्यायिका आणि ठळक घटना दिलेल्या आहेत. ‘सॉरोज’ आणि ‘लेटर्स फ्रॉम द ब्लॅक सी’ ही काव्ये ऑव्हिडच्या चरित्रविषयक तपशीलांच्या दृष्टीने विशेष लक्षणीय ठरतात. इ.स. ८ मध्ये ऑगस्टस बादशहाने ऑव्हिडला हद्दपार करून काळ्या स‌मुद्राच्या किनारी असलेल्या टोमिस (हल्लीचे कॉन्स्टाँट्सा) येथे ठेवले. या हद्दपारीची निश्चित कारणे कोणती हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. ऑव्हिडचे अनेक ग्रंथ नष्ट झाले. मीडीअ ही त्याची शोकात्मिका त्यांपैकीच एक होय.

ऑव्हिडने मुख्यतः मनोरंजनासाठी लिहिले. त्याच्या साहित्यातून कथानिवेदनाचे असामान्य कौशल्य जाणवते. स‌हजपणे छंद हाताळण्याचे त्याचे सामर्थ्यही प्रत्ययास येते. त्याच्या लेखनाला गांभीर्याची बैठक नसली, तरी मध्ययुगात त्याला बरीच लोकप्रियता लाभली. प्रबोधनकाळातील यूरोपीय साहित्यिकांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो.

संदर्भ : 1. Frankel, H. F. Ovid : A Poet Between Two Worlds, Berkeley, 1945.

             2. Otis, B. Ovid as an Epic Poet, Cambridge 1966.

             3. Rand, E. K. Ovid And His Influence, New York, 1925.

कुलकर्णी, अ. र.