गवंडीकाम : वीट, दगड, फरशी वगैरे कठीण पदार्थ कोरडे अगर संयोजक वापरून जे बांधकाम करण्यात येते ते गवंडीकाम होय. दगडी बांधकामाकरिता दगडाची घडाई करणारास पाथरवट वा घडाईदार म्हणतात. त्याच्या कामाचाही समावेश गवंडीकामात होतो. घडवलेले दगड, सर्व प्रकारच्या विटा वगैरेंची जुडाई करणे ही कामे जुडाईदार करतो. दरजा भरणे, गिलावा करणे ही कामे गवंडी करतो. घडाईकामास कौशल्य लागते. जुडाईवर गवंडीकामाची मजबुती अवलंबून असते. 

 इतिहास : ईजिप्त, मेसोपोटेमिया, भारत, चीन वगैरे देशांत आढळलेल्या बांधकामाच्या अवशेषांवरून इ.स.पू. ३००० वर्षांच्या काळात गवंडीकाम चांगल्या प्रकारचे होत होते असे आढळून येते. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील उत्खननावरून तेथील काम ईजिप्त वगैरे देशांतील बांधकामापेक्षा जास्त परिणत अवस्थेत होते असे आढळते. त्यावरून गवंडीकाम त्यापूर्वी बराच काळ प्रचारात असले पाहिजे असे अनुमान निघते. तेथील वीटकाम पक्क्या विटांचे, मातीच्या संयोजकात, आडव्या व उभ्या विटांच्या थरांचे, हल्ली ज्याला इंग्‍लिश गुताव म्हणतात त्या पद्धतीने एकमेकांवर रचून सांधमोड करून शास्त्रशुद्ध केलेले आढळते. त्यानंतर इ.स.पू. दुसऱ्या शतकापर्यंत म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळापर्यंत लाकडाचा वापर तटभिंतीकरितासुद्धा करीत होते. फक्त पाटण्याजवळ राजगृह येथे अनघड दगडांच्या भिंती दगडाची पुरणी करून पण संयोजकाशिवाय उभारण्याचा प्रयत्‍न इ.स.पू. नवव्या शतकात झालेला आढळतो. अशोक-काळापूर्वी ग्रीसमध्ये व पर्शियात दगडीकाम भरभराटीत होते. तिकडील प्रवीण कामगारांना सम्राट अशोक यांनी आश्रय देऊन त्यांच्या साहाय्याने दगडी खोदकामास व कोरीवकामास प्रारंभ करून सांचीसारखे दगडी कमानींचे व कठड्यांचे नक्षीकाम केलेले आढळते. तरीही वीटकाम जास्त प्रचारात होते. त्यावेळचे स्तूप विटांत बांधून त्यावर गिलावा केलेला आढळतो. मध्य प्रदेशातील बिसनगर येथे इ.स.पू. दुसऱ्या शतकात बांधलेल्या विष्णुमंदिराच्या पायाचे बांधकाम विटाचुन्यात केलेले आढळते. संयोजकास धर मिळावी म्हणून विटांना खाचा ठेवलेल्या आढळतात. मराठवाड्यातील तेर गावी व आंध्र प्रदेशामधील कृष्णा जिल्ह्यातील चेझली येथे इ.स. पाचव्या शतकात वीटकामात बांधलेली मंदिरे आढळतात. दगड नीट घडवून दगडी बांधकामास पहिल्या शतकाच्या सुमारास चालना मिळाली, तरीही घडीव दगडाच्या बांधकामास चौथ्या शतकात खरा प्रारंभ झाला. त्या कामात संयोजक वापरलेला आढळत नाही. दगडाच्या वजनाने ते पेलून धरले जात असत. आवश्यक तेथे कुसू व लळ एकमेकांत गुंतवून दोन दगड पक्के करीत. अशोक काळातील काही स्तूप तसेच अकराव्या शतकातील गुजरातमधील मोढेरा मंदिरात वीटकामाच्या दर्शनी भागास दगडकामाचे अस्तर दिलेले आढळते. त्यानंतर भारतभर कलाकुसरीची व भव्य अशी मंदिरे बांधली गेली. विजयानगर येथे भव्य प्रासाद, मंदिरे, लहान धरणे, पाण्याचे पाट वगैरे गवंडीकाम झालेले आहे. मदुरेची गोपुरे सतराव्या शतकात बांधली गेली. इंग्रजपूर्व काळात भारतात, विशेषतः राजस्थान, दिल्ली, आग्रा या बाजूस प्रेक्षणीय राजवाडे, स्मारके व मंदिरे बांधली गेली. इंग्रज अमदानीत भव्य इमारतींबरोबरच मोठाल्या धरणांची गवंडीकामे झाली. आधुनिक काळात सिमेंटच्या उपयोगामुळे गवंडीकामाचे रूपच बदलले आहे. 

 वेरूळ वगैरे ठिकाणची लेणी, मद्रासजवळील मलयापुरम् येथील कोरून काढलेले दगडी रथ वगैरे खोदकामाचे व घडाईचे नमुने आहेत. ओरिसातील भुवनेश्वरजवळील लिंगराज आणि इतर मंदिरे, कोनारक येथील सूर्यमंदिर, दक्षिणेतील रामेश्वर, मदुरा बेलूर वगैरे ठिकाणची मंदिरे, राजस्थानातील दिलवाडासारखी जैन मंदिरे ही दगडी कोरीवकामाबद्दल प्रसिद्ध आहेत. मुसलमानी अंमलात बांधलेला ताजमहाल, आग्रा येथील किल्ल्यातील दिवाणखाने, फतेपूर सीक्रीच्या भव्य इमारती सोळाव्या-सतराव्या शतकांतील उदाहरणे आहेत.  त्याच सुमाराचे जयपूर, उदेपूर, अजमीर येथील बांधकाम प्रेक्षणीय आहे. 

परदेशांत ईजिप्तमधील पिरॅमिड हे गवंडीकामाचे प्राचीन उदाहरण आहे. त्याजवळील स्फिंक्स हे प्रचंड कोरीवकाम त्याच सुमारास म्हणजे इ.स.पू. २५०० वर्षांपूर्वीच्या काळात केलेले आढळते. भारतात अकराव्या शतकाच्या सुमारास मंदिरे बांधली जात होती. त्याच काळात यूरोपमध्ये कॅथीड्रले बांधली गेली. पंधराव्या ते सतराव्या शतकांच्या मुदतीत यूरोप व इंग्‍लंडमध्ये अनेक प्रशस्त व कलाकुसरीच्या कामाची कॅथीड्रले, राजवाडे, स्मारके, विद्यालये बांधली गेली. त्यांपैकीच लंडनमधील सेंट पॉल कॅथीड्रल प्रसिद्ध आहे. 

गवंडीकामाचे सर्वसामान्य नियम : दगड, विटा वगैरे कोणत्याही बांधकामातील घटकांचा अखेर एकजीव होऊन काम एकसंध व्हावे हे धोरण असते. त्यांतील घन घटक अलग होऊ नयेत म्हणून त्यांचा एकमेकांत गुताव होईल अशी विशेष प्रकारची रचना करतात. दगडकामातील व वीटकामातील गुताव करण्याच्या पद्धती निरनिराळ्या आहेत. दोन्ही प्रकारांत उभे सांधे कोठेही एका ओळीत येणार नाहीत अशा तर्‍हेने प्रत्येक थरातील घन घटकांची जुडाई करतात, त्यास सांधमोड म्हणतात (आ.१). तसेच बांधकामातील कोणताही एक भाग शेजारच्या कामापेक्षा ठराविक उंचीपर्यंत उभारतात आणि शेजारचा भाग उचलला जाईल तेव्हा, अगोदर उभारलेल्या भागाशी त्याचा जोड सुरक्षित व्हावा म्हणून भावी सांध्याच्या ठिकाणची पहिल्या भागाची रचाई टप्प्याटप्प्यांनी ठेवतात. यास चाल सोडणे म्हणतात (आ.१). प्रत्येक घन घटकाला भक्कम बैठक असावी लागते व तो बसविताना ठोकून ठोकून पक्का करतात. बांधकाम ओले असताना त्यावरून चालत गेले तरी त्यातला कोणताही भाग हलू नये. सर्व कामे ओळंब्यात व आकारात येण्याकरिता प्रत्येक थराची जुडाई  करताना ओळंबा व लाइनदोरी (थराची आडवी पातळी बरोबर राखण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी ) लावणे अवश्य असते. बांधकामाची रुंदी ३५ सेमी. पेक्षा जास्त असेल तेव्हा दोन्ही दर्शनी बाजूंस दोन जुडाईदार समोरासमोर उभे राहून लाइनदोरी व ओळंबा पाहून जोडीने जुडाई करतात. बांधकामास बसवावयाचे लाकडी ठोकळे, खुंट्या, नळ वगैरे काम चालू असताना बसवितात. त्याकरिता काम झाल्यावर भोके पाडण्याने आजूबाजूचे बांधकाम कमकुवत होते. चुना किंवा सिमेंटचा संयोजक वापरला असेल, तर तो आवळून घट्ट होण्याकरिता बांधकाम सु. १४ दिवस ओले ठेवावे लागते. सिमेंट, चुना किंवा मातीचा संयोजक वापरतात अथवा सुके बांधकामही त्याच पद्धतीने रचतात.


सांधमोड, चाल व जोडचुना किंवा सिमेंट वापरून कामाची रचाई होत असताना रचून झालेल्या खालच्या थरांचा दर्शनी भाग शेणामातीने सारवतात. दर्शनी भागावर येणारे संयोजकाचे ओघळ व डाग काम पुरे झाल्यावर घासून स्वच्छ करणे त्यामुळे सोपे होते. 

 परांची किंवा पहाड : जमिनीपासून सु. १·२५ मी. उंचीपर्यंतच्या कामाची जुडाई जमिनीवर उभे राहून करता येते. त्यापेक्षा जास्त उंचीवरच्या जुडाईकरिता जुडाईदारास उभे राहून सुरक्षितपणे हालचाल करता येईल असे आधार उभे करावे लागतात, त्यांस परांची किंवा पहाड म्हणतात. लोखंडी पिंप किंवा लाकडी घोडे थोड्या अंतरावर उभे करून त्यांवर फळी टाकून सोपी परांची तयार होते. त्यापेक्षा उंच परांची बांबू, वासे किंवा लोखंडी नळ्या यांची उभारणी करून बनवितात. अशा उभारणीची एक ओळ व चालू बांधकाम यांच्यावर आधारलेल्या परांचीस एकेरी परांची म्हणतात. बांधकामाच्या आधाराऐवजी भिंतीनजीक तशीच दुसरी उभारणी करून त्या दोहोंवर आधारलेली दुहेरी परांची होय. एकेरी परांचीत बांधकामात जी भोके राहतात ती मागाहून दर्शनी भागास साजेसा दगड किंवा वीट बसवून त्यामागील भाग काँक्रीट भरून काढतात. आडवटांवर भक्कम फळ्या बांधून परांची तयार होते. जुडाईदाराच्या खांद्यापर्यंत रचाई झाली म्हणजे फळ्या वरच्या पातळीवर बांधतात. जुडाईदारापर्यंत माल पोहोचविण्याकरिता परांचीला शिड्या लावतात. शिडी चढताना हाताच्या आधारासाठी एका बाजूस बांबू बांधावा लागतो. माल फार उंच न्यावयाचा असेल अशा कामावर यांत्रिक लिफ्टही वापरतात. 

 दगडीकाम : घडाई : घडाईस लागणारी मुख्य हत्यारे म्हणजे (१) निरनिराळ्या प्रकारच्या छिन्‍न्या, (२) लोखंडी हातोडा व (३) लोखंडी गुण्या ही होत. छिन्‍न्या सु. १५ ते २० सेंमी. लांबीच्या व मुठीत मावतील इतक्या म्हणजे २·५ ते ३ सेंमी. जाडीच्या, पोलादाच्या गोल किंवा अष्टकोनी आकाराच्या असतात. पिचर, चिरणी, टाकी व दात्री असे छिन्‍न्यांचे प्रकार आहेतदगड घडाईची हत्यारे : (१) पिचर, (२) चिरणी, (३) टाकी, (४) दात्री, (५) लोखंडी हातोडा. (आ.२). पिचरचे टोक सु. १·५ सेंमी. लांबीचे चपटे असते व त्याची धार ०·५ सेंमी. जाडीची म्हणजे बोथट असते. चिरणीचे टोक चपटेच पण धारदार असते. दात्रीच्या टोकास दाते असतात. टाक्या टोकदार आणि कमीजास्त प्रमाणात अणकुचीदार असतात. निरनिराळ्या छिन्‍न्यांबरोबर २ किग्रॅ. पासून १० किग्रॅ. पर्यंत वजनाचे लोखंडी हातोडे घडाईसाठी वापरतात.  गुण्याचा उपयोग दगडाच्या बाजू काटकोनात आणण्यासाठी करतात. तसेच कोणतीही बाजू एका पातळीत घडवली गेली की नाही हे पाहण्यासाठी करतात. 

 घडाई प्रकार : बुची, सडकीव, दात्री आणि माठीव किंवा बारीक टिचीव असे घडाईचे मुख्य प्रकार आहेत (आ.३). बुची घडाई पिचर व जाड टाकीने करतात आणि घडविलेली बाजू ४ सेंमी. पर्यंत आतबाहेर असलेली अशी खडबडीत असते. सडकीव घडाईकरिता पिचर, चिरणी व कमीजास्त टोकदार टाक्या वापरून कमीजास्त खरबरीतपणाची घडाई करतात. ३ मिमी. ते १ मिमी. खड्डेखुडे असलेल्या खरबरीतपणाप्रमाणे सडकीव घडाईची प्रत ठरवितात. घडाई करताना दगडावर साधारणपणे समांतर रेषा उमटतील अशी घडाई करतात व या रेषा उभ्या, आडव्या किंवा तिरप्या ठेवून घडाईचे प्रकार करतात. दात्री वापरून घडाई करतात तेव्हा दगडावर जास्त ठळक व नागमोडी रेषा उमटतात. माठीव किंवा बारीक 

घडाईचे काही प्रकार : (१) बुची व सडकीव पट्टी, (२) सडकीव, (३) माठीव किंवा बारीक टिचीव.

टिचीव घडाईकरिता शेवटी बारीक अणकुचीदार छिन्‍न्या वापरून खड्डेखुडे नाहीसे करतात. घडाई ठिपक्याठिपक्यांसारखी दिसते व हातास खरबरीत लागते. माठीव घडाईवर दुसरा दगड घोटून घोटून दगडाची बाजू अगदी गुळगुळीत करून प्रेक्षणीय कामात वापरतात.

दगडाची सबंध बाजू एका प्रकारच्या घडाईची असते. बुची किंवा जास्त खरबरीत घडाई असेल, तर बाजूच्या चौफेर २ सेंमी. ते शोभून दिसेल इतक्या रुंदीची माठीव घडाईची पट्टी ठेवतात (आ. ३). काटकोनी कोपऱ्याखेरीज इतर कोनांचे कोपरे गोलाई आकाराचे किंवा नक्षीकामाचे दगड घडविण्याकरिता त्या त्या आकृतीचे पत्र्याचे बारीक फर्मे करून त्याबरहुकूम घडाई करतात. बारीक नक्षीकामास पेन्सिलीच्या आकाराच्या छिन्‍न्या व हलके चिऱ्याचा कापहातोडे वापरतात. ग्रॅनाइट, बेसाल्ट किंवा जांभा असे निरनिराळ्या कठिनतेचे दगड घडविण्याकरिता योग्य अशा छिन्‍न्यांची निवड करावी लागते आणि घडाईच्या हातोड्याने घाव नियमित करावे लागतात. जांभ्या दगडाचे चिरे करवतीने कापता येतात. जांभा दगड खाणीतून काढतानाच तो ठोकळ्याच्या आकाराचा काढतात. तो चौरस आकारात आणण्यास रुंद तोंडाच्या कुदळीसारखे हत्यार असते त्यास धावड म्हणतात. त्यापेक्षा जास्त सफाईदार घडाई त्यावर होऊ शकत नाही. इतर कठीण चिऱ्याचा काप काढावयाचा असेल, तर तोडण्याच्या जागी तीन बाजूंवर छिन्नीने सभोवार खाच घेतात व त्या खाचेवर थोड्या थोड्या अंतरावर भोके घेऊन त्यात लोखंडी पाचरी बसवतात. चिऱ्यावर घेतलेल्या खाचेच्या ओळीत चिऱ्याखाली तळात पहार ठेवून (आ.४) पाचरीवर एकापाठोपाठ ठोके मारतात. म्हणजे खाचेच्या रेषेवर चिरा दुभंगतो. 


यांत्रिक घडाई : दगड कापण्याकरिता अरकशाच्या करवतीसारखी लाकडाच्या चौकटीत करवतीची एक वा अनेक पाती समांतर पण जवळ-लांब हलविता येतील अशी बसविलेली असतात. चौकटीला यंत्राच्या साहाय्याने मिनिटाला १५० ते २०० हेलकावे पुढेमागे देऊन दगडाचे काप घेतात. काप घेत असताना पडणार्‍या भेगेत सतत पाणी सोडतात व त्याबरोबर धारदार रेती, कार्बोरंडमसारखे अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे) पदार्थ टाकून करवतीचे काम हलके करतात. दगड कापण्याकरिता वापरण्यात येणार्‍या गोल फिरत्या करवतीचे पाते कार्बोरंडमचे असते वा पात्याला हिरकण्या बसविलेल्या असतात. अशा करवतीने दगडाचा काप घेताना दगड हलके हलके वर करवतीकडे लोटला जातो आणि कापांच्या चिरेमध्ये सतत पाणी सोडण्यात येते. 

 दगडाच्या बाजूची घडाई करण्याकरिता सुताराच्या रंध्यातील पात्यासारख्या अनेक पाती सरळ खोबणीत रांगेत सु. ४५° च्या कोनात तिरकस बसवून पात्याच्या धारेनुसार दगड कमीजास्त खरबरीत किंवा खडबडीत बनवितात. पाती किंवा दगड यांपैकी एक स्थिर ठेवून दुसरे यंत्राने पुढेमागे हलविले जाईल अशी दोन्ही प्रकारची यंत्रे प्रचारात आहेत. दगडास नक्षीदार कड करावयाची असेल, तर रंध्यासारख्या पात्याऐवजी नक्षीच्या आकाराचे पाते वापरतात. मात्र हाताने प्रथम नक्षी ओबडधोबड घडवून मग यंत्राने सफाईदार करतात. दगडांना गोलाकार देण्यासाठी लेथ वापरतात. सिमेंटच्या फरशीच्या जमिनीस झिलाई देण्याच्या यंत्राप्रमाणे कार्बोरंडमयुक्त पृष्ठभाग असलेली चकती दगडावर सपाट भिरभिर फिरवून दगड अवश्य तितका गुळगळीत करता येतो [→ बांधकामाचे दगड]. 

 दगडीकामाचे प्रकार व जुडाई : (१) चिरेबंदी किंवा संगीन, (२) खांडकी, (३) डबरी कळीचे, (४) डबरी थराचे व (५) डबरी बिनथराचे असे दगडीकामाचे मुख्य प्रकार आहेत. 

 (१) चिरेबंदी काम : या प्रकारच्या कामात प्रत्येक दगड ठोकळेवजा चौकोनी आकाराचा असतो. त्यास चिरा म्हणतात. चिऱ्यांची उंची ३० सेंमी. पेक्षा कमी असत नाही आणि बांधकामाचा थर चिऱ्याच्या उंचीचा असतो. चिऱ्याची उंची निरनिराळी असेल, तर उंच चिऱ्यांचे थर तळाकडे ठेवून वरचे थर क्रमाने कमी उंच होतील अशी रचाई करतात. प्रत्येक थर एकाच उंचीचा असतो व कोणत्याही थराची उंची ३० सेंमी. पेक्षा कमी असत नाही. चिऱ्यांची लांबी उंचीच्या दुपटीपेक्षा जास्त असते व रूंदी उंचीपेक्षा कमी असत नाही. चिऱ्याची दर्शनी बाजू अगदी घोटीवपासून ५ ते ७ सेंमी. बुचे रहातील अशा कोणत्याही प्रकारची असू शकते. आडव्या आणि उभ्या सांध्यांची कळाशी थराच्या रुंदीइतक्या बारीक टिचीव घडाईची असते आणि चिऱ्यांमधील सांधे १·५ मिमी. पेक्षा जास्त रुंदीचे असत नाहीत. चिरा जागेवर ठेवून व्यवस्थित बसतो आहे असे प्रथम पाहून मग संयोजकाचा पातळ थर पसरून त्यावर चिरा ठेवून लाकडी हातोड्याने ठोकून सांध्याच्या कळाशीत बसवितात. चिऱ्यामध्ये कोणताही उभा सांधा त्याच्या खालच्या चिऱ्याच्या होता होईल तो मध्यावर येईल असा बसवितात. सांधमोड थराच्या उंचीच्या सरासरी निम्‍म्याइतकी असते. संगीनकामात दगड ३० सेंमी. पेक्षा कमी उंचीचे असतात, पण त्यांची घडाई वगैरे चिरेबंदी कामाप्रमाणेच असते. सिमेंट काँक्रीटचे ठोकळे बनवूनही संगीनकाम करतात.  

  

(२) खांडकीकाम : लांबट आकाराच्या दगडांपासून चांगली खांडकी घडवितात. साधारणपणे अशा दगडाचे एक टोक १४ सेंमी. पेक्षा मोठे, साधारण चौरस आकाराचे व दुसरे टोक ६ ते ७ सेंमी. जाडीचे असून लांबी २४ सेंमी. पेक्षा जास्त असते. खांडकीला तोडी किंवा फाडी असेही म्हणतात. दगडाच्या जाड तोंडाला दर्शनी बाजू व लांबीला दुमाला म्हणतात. दर्शनी बाजूच्या समोरासमोरच्या कडा एकमेकींशी समांतर आणि लगतच्या कडेशी काटकोनात व एका पातळीत येतील अशा चौकोनी तोंडाच्या घडवितात. खांडकीस भक्कम बैठक मिळावी म्हणून तिचा तळ व माथा यांकरिता दर्शनी बाजूपासून ८ सेंमी. पेक्षा जास्त लांबीपर्यंत व बाजूच्या सांध्यांच्या कळाशीकरिता ४ सेंमी. लांबीपर्यंत टिचीव घडाई करतात. दुमाल्याचा या घडाईनंतरचा उरलेला मागील भाग चौफेर एकसारखा उतरता असेल ती खांडकी चांगली समजतात (आ.५). सर्वसाधारणपणे खांडकीच्या दर्शनी बाजूंपैकी उंचीपेक्षा तिची लांबी जास्त ठेवतात व दुमाला उंचीच्या दीडपटीपेक्षा जास्त ठेवतात. खांडक्या १४ ते २० सेंमी. उंचीच्या ठेवतात. खांडकी

 खांडकीकामात एका थरात सर्व खांडक्या सारख्या उंचीच्या असतात. दर्शनी भागास खांडक्या असतात, तशाच पिछाडीच्या बाजूसही लावतात. पिछाडीच्या बाजूस गिलावा व्हावयाचा असेल, तर पिछाडीस खांडकीऐवजी मोठ्या आकाराचे डबरी बिनथरी बांधकाम करतात किंवा वीटकाम करतात. खांडकीमागील पुरणी लहानमोठ्या दगडांची व कपच्यांची करतात. सांध्यात कोठेही कपची असत नाही. पुरणी करताना प्रथम संयोजक टाकून त्यात पुरणीचे दगड दाबून बसवावयाचे असतात. पुरणीचे दगड कपच्या अगोदर घालून त्यांवर संयोजक ओतण्याची पद्धत चुकीची आहे, असे दिसून आले आहे. प्रत्येक थराच्या उंचीइतकी पुरणी करतात. नुसता संयोजक कोठेही जास्त जाडीचा ठेवत नाहीत. त्यात मावतील तितके लहानमोठे दगड बसवितात आणि कोणताही भाग पोकळ राहू देत नाहीत. खांडकीकामाची रुंदी असेल त्याप्रमाणे एक घ.मी. कामास ०·२५ ते ०·३० घ.मी. संयोजक लागतो. जलाभेद्य कामास तो सु. ०·४५ घ.मी. लागतो.

(३) डबरी कळीचे काम : ह्या कामात दगडाचे थर क्षैतिज (क्षितिजसमांतर) असत नाहीत. दगडाची दर्शनी बाजू चौकोनी नसते. पण दर्शनी दगडास जितक्या बाजू असतील तितक्या सरळ रेषेत घडवितात आणि दर्शनी भागापासून कमीत कमी ५ सेंमी. तरी त्यांना कळाशी असते. दगडाच्या दर्शनी बाजूस सडकीव अथवा माठीव घडाई असते. प्रत्येक दगडाची दर्शनी  डबरी कळीचे कामबाजू ५०० चौ. सेंमी. पेक्षा मोठी असेल असा डबर वापरतात. दर्शनी सांध्यात कोठेही कपची नसते. प्रत्येक दगड शेजारच्या दगडाच्या कळाशीत बसता करतात. बांधकामाच्या जाडीनुसार प्रत्येक घ.मी. कामास खांडकीकामाइतकाच संयोजक लागतो.  

डबरी थराचे काम

(४) डबरी थराचे काम : खांडकीकामाप्रमाणे हे काम सारख्या उंचीच्या थरांनी रचतात, पण थराच्या उंचीइतकी प्रत्येक दगडाची उंची असतेच असे नाही. दोन किंवा क्वचित तीन लहानमोठे दगड एकावर एक ठेवून थरांची उंची साधलेली असते. डबराचे कानेकोपरे हातोडीने टापून तोडून दगड वापरतात. दर्शनी बाजूच्या दगडांच्या कोरी सरळ रेषेत असतात व तोंडावरील आकारापेक्षा दीडपटीने दुमाला असतो. सांधे सरळ ओळंब्यात असतातच असे नाही. १ घ.मी. कामास कामाच्या रुंदीप्रमाणे ०·३० ते ०·३५ घ.मी. व जलाभेद्य कामास सरासरी ०·४५ घ.मी. संयोजक लागतो. 


(५) डबरी बिनथराचे काम: यासाठी डबर लहानमोठा चालतो. डबराचे कानेकोपरे टापून दगड बसवितात. त्याच्या कोरी होईल तितक्या सरळ रेषेत टापतात. सांधे १६ मिमी. पर्यंत रूंदीचे चालतात व बांधकामाच्या दर्शनी सांध्यात कपचीचा आधार दिलेला चालतो. सांधे ओळंब्यात किंवा क्षैतिज असत नाहीत. पाया भरण्याच्या कामासाठी डबरी बिनथराचे कामडबरी बिनथराचे काम करतात. मोठा डबर असेल तितके काम चांगले होते. चिरेबंदी, संगीन आणि खांडकामाकरिता दगड अगोदर घडवून घ्यावे लागतात. डबरी कामातील कोपर्‍याखेरीज इतर दगड बांधकामाच्या वेळीच घडवून घेतात. डबरी कामाच्या दर्शनी भागावर उभा दगड बसवून काम दिखाऊ करण्याची प्रवृत्ती असते (आ.८). अशा बसविलेल्या दगडास ताठ किंवा तट्टा दगड म्हणतात.बांधकामात कोठेही दगड बसवावयाचा असला, तर मजबुतीसाठी तो सपाट बसविला पाहिजे. 

प्लम काँक्रिट

धरणाच्या भिंती : धरणासारख्या पुष्कळ रुंदीच्या भिंतीच्या बांधकामाचा अर्धा ते एक मी. जाडीचा दर्शनी भाग खांडकीचा बांधून आतील पुरणी थरी बिनथरी दगडीकामाची अगर काँक्रीटची करतात. दर्शनी भागाचे थर धरणाच्या दर्शनी भागाच्या उताराच्या काटकोनातील पातळीत रचतात, पण पिछाडी एका पातळीत आणीत नाहीत. तो पुढेमागे ठेवल्याने पुरणीशी त्याचा चांगला गुताव होतो. दर्शनी काम व पुरणी एकाच वेळी रचीत आणतात. पुरणी नुसती काँक्रिटची असेल, तर काँक्रिटमध्ये मोठें अनघड दगड पेरून बसवितात. पेरलेल्या दगडांचेआकारमान काँक्रीटच्या आकारमानाच्या निम्‍म्याहून कमी असते. अशा पुरणीस प्लम बांधकाम किंवा प्लम काँक्रिट म्हणतात. (आकृती ९).

 

गुताव : चिरेबंदी काम त्यातील दगडाच्या आकारामुळे व वजनामुळे स्थिर रहाते. तरीही पण आवश्यकतेप्रमाणेदगडांचा गुताव पक्का होण्याकरिता सळकुसू (आ. १० अ) व भीड सांधा (आ.१० आ) अंतराअंतरावर दोन दगडांत करतात. इतर दगडीकाम क्षैतिज थरांनी रचले जात असले, तरी प्रत्येक थराचा माथा सपाट न करता उंचसखल राहू देतात म्हणजे वरच्या थराचा खालच्या थराशी गुताव होतो. कामाचा असर एक मीटरपेक्षा जास्त असेल, तर प्रत्येक थराच्या प्रत्येक चौ.मी. मध्ये एक असे किमान ४५ सेंमी. लांबीचे किंवा दोन थरांच्या उंचीचे हेदर उभे बसवून दोन थरांचा गुताव करतात. बांधकामाचा दर्शनी भाग व पिछाडीचा भाग यांचा गुताव व्हावा म्हणून दुमाल्याचे दगड वापरलेले असतात, तरी पण ठराविक अंतरावर हेदर बसवितात. भिंतीचा असर ६० सेंमी. पेक्षा कमी असेल तेव्हा दर्शनी भागापासून पिछाडीपर्यंत लांबी असलेला एक लांबडा, अखंड व दर्शनी भागाच्या दगडांच्या आकाराचा दर्शनी भाग असेल, अशा आकाराचा दगड हेदर म्हणून बसवितात. प्रत्येक थरात सु. १·५ मी. अंतरावर हेदर ठेवतात व एका थरातील दोन हेदरांच्या साधारण मध्यावर

गुताव

वरच्या थरातील हेदर बसवितात (आ.११). ठराविक अंतरावर हेदर ठेवून मग थराची जुडाई करतात. भिंतीचा असर ६० सेंमी. पेक्षा जास्त असेल, तर गलजोड हेदर म्हणजे दोन किंवा अधिक हेदर त्यांच्या दुमाल्यापैकी निदान १५ सेंमी. लांबीत एकमेकांशी खेटून बसून होणारी मालिका दर्शनी भागापासून पिछाडीपर्यंत पोहोचेल अशी बसवितात.

हेदर व गलजोड : (१) हेदर, (२) गलजोड.

कोपरे : बांधकामात दर्शनी भागास कोपऱ्यावर दगड बसवितात त्यांना कोपरे म्हणतात. कोपरे बांधकामाच्या एक किंवा दोन थरांच्या उंचीचे असतात. त्यांची एक बाजू म्हणजे आखूड सूड किमान उंचीच्या लांबींचा व दुसरी बाजू म्हणजे लांब सूड उंचीच्या दुप्पट किंवा किमान ४४ सेंमी. ठेवतात (आ.५). आखूड सूडाच्या दुमाला लांब सूडाच्या लांबीपेक्षा फार तर ५ सेंमी. कमी ठेवतात व लांब सूडाच्या बाजूचा दुमाला आखूड सूडाच्या लांबीपेक्षा ८ सेंमी. पेक्षा जास्त कमी नाही असा ठेवतात. कोपऱ्याच्या तळमाथ्यास दर्शनी भागापासून १० सेंमी. पर्यंत व दोन्हीकडील सांध्यांच्या कळाशीकरिता ४ सेंमी. पर्यंत सडकीव घडाई करतात. दर्शनी भागास माठीव घडाईची पट्टी ठेवून मधील भाग बुचीपासून माठीवपर्यंत कोणत्याही घडाईचा ठेवतात. डबरी कामावर गिलावा व्हावयाचा असेल तर दरवाजे, खिडक्यांचे फाटे, कोपरे वगैरेंच्या ठिकाणापुरते विटकाम रचतात.


चिर्‍यांची वाहतूक : एका भक्कम वाशाच्या दोन्ही टोकांना दोन वासे जूसारखे बांधलेले असतात. भक्कम दोराचे वेढे दिलेला चिरा वाशाच्या मध्यावर शिंक्यासारखा टांगतात. दोन्ही कडील जू खांद्यावरघेऊन ४ ते ८ माणसे चिरा उचलून परांचीवर चढून तो बसविण्याच्या जागेनजीक अलगद उतरतात.चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या या कसबी मजुरांना वनगणे किंवा चौगुणे म्हणतात. चिरा उचलण्यासाठी लोखंडी कुत्रीचिऱ्याखाली दोन गोल पहारी अगर नळ ठेवून त्यांवरून सरकवीत तो जागेवर बसता करतात. नवगण्याऐवजी दोर किंवा साखळी कप्पीच्या साहाय्याने किंवा यारीने उचलून चिऱ्याची उचल करतात. चिऱ्याच्या समोरासमोरच्या दोन अंगांस लहान खाचा घेऊन त्यांत लोखंडी कुत्री अडकवून (आ.१२) चिऱ्याभोवती दोर बांधल्याशिवाय, चिरा उचलता येतो व बसविण्याच्या जागी नेमका ठेवता येतो.

फरसबंदी : जेथे फरसबंदी करावयाची त्या जागी मुरमाचा किंवा काँक्रीटचा भक्कम आधार साधारण सम पातळीत असावा लागतो. फरसबंदीचा माथा सम पातळीत किंवा अवश्य त्या उताराने बसविता यावा म्हणून ठिकठिकाणी ठिय्ये करून किंवा अन्य खुणा करून पातळी निश्चित करतात. फरसबंदी करावयाची जागा साफसूफ करून पाण्याने भरपूर ओली करून त्यावर संयोजकाचा थर पसरतात, त्यास गादी म्हणतात. अर्ध्याएक तासात फरशा बसवून होतील इतक्या भागावर फक्त गादी एका वेळी पसरतात, तीवर साधारणपणे मधाइतक्या श्यानतेचा (दाटपणाचा)  सिमेंटचा गारा पसरून त्यात दगडी, शहाबाद किंवा सिमेंटच्या फरशा,त्यांच्यामधील सांधा सरळ व अरूंद राहील अशा कळाशीने खालचे सिमेंट सांध्यातून वर येईल अशा हालवून, दाबून बसवितात व लाकडी ठोकणीने ठोकून घट्ट बसत्या करतात. सांध्यातून फरशीवर आलेले सिमेंट काढून टाकतात किंवा मागाहून दरजा भरावयाचा असतील, तर सांधे कोरून ठेवतात. अवश्य त्या पातळीपेक्षा फरशी खाली बसली, तर ती काढून जास्त सिमेंट घालून नीट बसवितात. कपच्या वगैरे घालून उचलीत नाहीत. काम सु. १४ दिवस ओले ठेवतात.

मामुली कामाच्या ठिकाणी संयोजकाऐवजी बारीक वाळूचा थर पसरून त्यावर घडवलेली फरशी, सिमेंटशिवाय दाबून सिमेंटने दरजा भरतात.

विटांच्या फरसबंदीकरिता सु. २० सेंमी. जाडीच्या वाळूच्या थरावर पालथ्या विटांचा थर बसवून त्यांचे सांधे सिमेंटने भरतात. या विटांच्या थरावर १:५ असा सिमेंट संयोजक पसरून त्यावर कोडी विटांचा थर सांधमोडीने किंवा विविध आकृतींच्या रूपात बसवून नेहमीप्रमाणे सांधे भरतात. विटा भरपूर भिजवून वापरतात.

कवडी फरसबंदी : काँक्रीटच्या भक्कम तळावर सु. २० सेंमी. जाडीचा संयोजक पसरून त्यावर सिमेंटच्या गाऱ्यात संगमरवरी किंवा चिनीचे (भाजलेल्या व झिलई केलेल्या चिनी मातीचे) तुकडे जागेवर खेटून व खालचे सिमेंट सांध्यातून वर येईल असे दाबून एका पातळीत येतील असे बसवितात व थापीने ठोकून भक्कम करतात. सांध्यातून वर आलेले जादा सिमेंट काढून टाकतात व काम सु. १० दिवस ओले ठेवतांत किंवा चिनीच्या लहानलहान रंगीत कपच्या सिमेंटच्या गाऱ्यात मिसळून त्याचा थर खाली अगोदर पसरलेल्या संयोजकावर देतात. हा थर ६ मिमी. ते १० मिमी. जाडीचा असतो आणि त्याकरिता अनुक्रमे ३ मिमी. च्या आतील व ६ मिमी. च्या आतील आकारमानाच्या कपच्या वापरतात. दोन-तीन तासांनंतर थर साधारण घट्ट झाल्यावर त्यावर चोपणीने हलके हलके ठोकतात किंवा त्यावर हलका हातरूळ फिरवितात. चार-सहा तासांनंतर कामावर गवत हंथरून फरसबंद सु. १० दिवस सतत ओली ठेवतात.

नुसत्या सिमेंट फरसबंदीकरिता संयोजकावर रंगीत वा साध्या सिमेंटच्या गिलाव्याचा हात देऊन घोटतात. त्यावर दोरी करणीने ठोकून रेषा मारतात व सु. १० दिवस त्यावर पाणी भरून ठेवतात.

विटांची रचना : (१) पाटी, (२) तोडी, (३) कोडी, (४) खंडजा

वीटकाम : जुडाई करण्यास विटा वापरण्यापूर्वी त्या निदान दोन तास तरी पाण्यात बुडवून ठेवतात. विटा बुडविल्यानंतर पाण्यातून हवेचे बुडबुडे येण्याचे थांबले म्हणजे विटा पूर्ण भिजल्या असेही गमक आहे. संयोजक आवळून येण्यासाठी अवश्य असणारा ओलावा विटांनी शोषून घेऊ नये हा विटा भिजवून वापरण्याचा हेतू असतो. विटकामातील प्रत्येक थरातील विटांची मांडणी विशिष्ट पद्धतीने करून सांधमोड व गुताव साधण्याचे अनेक प्रकार आहेत. थरातील कोणतीही वीट तिच्या खालील थरातील दोन अगर तीन विटांवर आधारित रहावी हे मूळ तत्त्व प्रत्येक प्रकारांत असते. विटांचा आकार त्याच हिशोबाने ठेवलेला असतो.

भारतीय मानक संस्थचे २० × १० × १० (किंवा ५) सेंमी. असे विटेचे आकारमान निर्बंधित केलेले आहे. वीटकामात विटेची लांबी भिंतीच्या लांबीशी समांतर येईल अशी ठेवली असेल, तर ती पाटी वीट व काटकोनात ठेवली असेल, तर तोडी वीट म्हणतात. विटेची रुंदी ओळंब्यात येईल अशी वीट रचतात तेव्हा त्यास कोडी विटांच्या गुतावाच्या दोन पद्धती : (अ) इंग्‍लिश, (आ)फ्लेमिश. डावी बाजू-विषम क्रमांकाचे थर,उजवी बाजू-सम क्रमांकाचे थर (१)व(४) एक-विटी भिंत, (२)व(५) दीड-विटी भिंत, (३) व (६) दोन-विटी भिंत, (७) पुरोदर्शन.वीट आणि लांबी ओळंब्यात येईल अशी ठेवल्यास त्यास खंडवा वीट म्हणतात (आ.१३). वीटकामाच्या असरात किती विटा मावतात त्यानुसार त्यास पडदी, एक-विटी, दीड-विटी, दोन-विटी, अडीच-विटी असा उल्लेख करतात. पडदीत आडवी एकच वीट असते, तर एक-विटीत ती उभी मावेल असा असर असतो.

पाटी विटांचे थर व तोडी विटांचे थर एकमेकांवर रचून किंवा प्रत्येक थरात पाटी व तोडी विटा एकाआड एक लावून मुख्यतः जुडाई करतात. त्यास इंग्‍लिश व फ्लेमिश गुताव म्हणतात (आ.१४). दोनचार लागोपाठच्या थरांत आडव्या व त्यावर एका थरात उभ्या अशा विटांची जुडाई, वाडेभिंतीसारख्या कमी उंचीच्या आणि बोजा नसलेल्या भिंतीकरिता वापरतात. एका विटेमध्ये जास्त असर असलेल्या भिंतीच्या थरात सांधेमोड व्हावी म्हणून आ. १३ मध्ये दाखविल्याप्रमाणे एकाआड एक थरांची रचना करतात. दोन विटांपेक्षा जास्त असर असलेल्या वीटकामात विटा तितक्या निरनिराळ्या पद्धतींनी रचूनसुद्धा गुताव साधतात. यांना इंग्‍लिश भाषेत हेरिंग बोन व डायगोनल (कर्ण) गुताव पद्धती म्हणतात. उभ्या आडव्या लाकडांची चौकट भक्कम उभारून चौकटीच्या गाळ्यात बहुधा कोडी वीटकाम रचतात. त्यास दाशाचे काम म्हणतात. वीटकामाच्या दुहेरी भिंतीमधे पोकळी आणि गुताव राहील असे करतात. ( आ.१५) किंवा दोन स्वतंत्र भिंती ५ ते १० सेंमी. अंतरावर समांतर बांधतात. दोन्ही भिंतींच्या गुतावाकरिता अंतराअंतरावर दोन्ही भिंतींना जोडणारे भित्तिबंध घालतात.


प्रबलित वीटकाम : पडदीला जास्त भक्कमपणा आणण्याकरिता काही एक ठराविक थरांनंतरच्या एका थरात, दोन पोलादी सळ्या, ५ सेमी. अंतर ठेवून समांतर बांधून त्या लांबीमध्ये पसरून त्याच्या वर व खाली १·५ सेंमी. जाडीचा सिमेंटचा संयोजक राहील अशा जाडीचा सांधा भरतात. अशा प्रकारचे बांधकाम भूकंपात टिकते म्हणून भारतातील पंजाब-हरियाणा भागात त्याचा विशेष वापर करतात.दुहेरी भिंत : (१) अधोदर्शन, (२) छेद

वीटकामाची जुडाई करताना संयोजक पसरून त्यावर प्रत्येक वीट दाबून व सांध्याकडे सरकवून बसवितात आणि थापीच्या मुठीने ती ठाकून ठोकून पक्की करतात. दोन विटांमधील सांध्यात संयोजक भरून थापीने ठासून तो भरपेट केला पाहिजे. उभ्या आडव्या सांध्याची जाडी १० मिमी. पेक्षा जास्त होता कामा नये. प्रत्येक थरावर संयोजक पसरून त्यावर वरचा थर रचावयास घेतात. थर ओळंब्यात व क्षैतिज दिशेत रचले जाण्याकरिता वेळोवेळी ओळंबा सोडून दोन टोकांमध्ये पाणसळीत लाइनदोरी खेचून बांधून जुडाई करावी लागते. सांध्यातील संयोजक ओला असतानाच तो कमीत कमी १० सेंमी. खोलीपर्यंत खरवडून काढतात.वीटकामास चुन्याचा वा सिमेंटचा संयोजक वापरला असेल तेव्हा १४ दिवस वीटकाम सतत ओले राहिले पाहिजे. ठोकळी विटा वापरून अरुंद कोरीव सांधे ठेवून केलेल्या वीटकामास पहिल्या दर्जाचे वीटकाम म्हणतात. हातभट्टीच्या गावठी विटा वापरून दुसर्‍या दर्जाचे काम होते. मातीचा संयोजक वापरतात, तेव्हा मातीत वीटकाम असे म्हणतात. कच्च्या विटा चिखलात रचूनही वीटकाम करतात.

प्रत्येक घ.मी. पहिल्या दर्जाच्या वीटकामास फुटतूट धरून सु. ५४० विटा व दुसर्‍या दर्जाच्या कामास सु. ४६० विटा लागतात. संयोजक ०·२४ ते ०·२६ घ.मी. लागतो.

जुडाईदाराची हत्यारे : सर्वसाधारण कामास जुडाईदारास थापी, करणी व नहला ओळंबा, पाणसळ, लाइनदोरी, गुण्या व बसुली अथवा बसुला ही हत्यारे लागतात (आ. १६). गिलावा करणाऱ्या गवंड्याला याखेरीज लहानमोठे तराफे लागतात. थापी खोलगट व गोलाकार टोकाची असून संयोजक घमेल्यातून उचलून बांधकामावर टाकण्याकरिता उपयोगी असते. करणीने संयोजक पसरून सांध्यात भरतात. नहला दरजा भरून घोटण्याकरिता वापरतात. गुण्याची एक बाजू ओळंब्यात धरून दुसऱ्या बाजूशी समांतर लाइनदोरी खेचली, तर ती पाणसळीत येते.

जुडाईदाराची हत्यारे : (१) अनुक्रमे थापी, करणी व नहला, (२) ओळंबा : (अ) ओळंबा, (द) दोरी, (३) गवंड्याचा गुण्या, (४) पाणसळ-लाइनदोरीत ओवलेली, (५) बसुली अथवा बसुली, (६) तराफा.

कमानीचे बांधकाम : दरवाज्यांवर वा खिडक्यांवर रचावयाच्या लहान कमानी बांधताना बाजूच्या भिंतीचा थोडासा आधार घेऊन किंवा तळापासून स्वतंत्र लाकडी ठेपे देऊन त्यावर फळ्या पसरतात. फळ्यांवर विटांचे राडेरोडे रचून त्याचा माथा चिखल थापून कमानीच्या गोलाईत आणून कमानीचा आडका तयार करतात. अशा चिखलाच्या आडक्याला कलबूत म्हणतात. चिखल थोडासा वाळल्यावर कमान दोन्हीकडील कटिबिंदूंपासून सारखी रचीत आणून चावीचा दगड अथवा वीट ठोकून बसवून कमान पुरी करतात. कमानी एकापेक्षा जास्त थराच्या असल्या, तर प्रत्येक थरातील कमान पुरी जोडून नंतर त्यावरचा थर जोडण्यास घेतात. कमानीच्या एका थरात उभ्या व खंडजा विटा एकाआड एक जोडल्यास सांघमोड व गुताव चांगला होऊन कमान जास्त मजबूत होते (आ. १७ ).

१७. कोटी व खंडजा विटांच्या कमानी

कमानीची जुडाई पुरी झाल्याबरोबर दोन्ही बाजूंच्या खवाट्यांवरील बांधकाम चावीच्या पातळीपर्यंत पुरे करून घेतात. विटांचे सांधे अक्षीय येण्याकरिता विटा बसुलांनी तासून जागेवर निमुळत्या करून बसत्या करतात. लहान कमानीखालचे अडके आठ दिवसांपर्यंत काढीत नाहीत. मोठ्या कमानींचे त्यापेक्षा जास्त दिवस ठेवतात. दगडी बांधकामात विटा, संगीन, सडकीव वा माठीव घडाईचे दगड किंवा फरशीवजा दगड वापरून कमानीचे काम करतात [→ कमान ].


जुडाईतील इतर बाबी : दरवाजे, खिडक्या वगैरेंकरिता बांधकामात उघडीपा ठेवतात. त्यांच्या आतल्या आणि बाहेरच्या बगलांचे कोपरे घडीव दगडांचे किंवा विटांचे बांधतात. बगला फाटाच्या असल्या, तर दगडी कोपरे त्या आकाराचे घडवून अगर विटा त्या आकारात तोडून कोपरे बनवितात. दोन भिंतींच्या जोडाचे काम एकहाती करून भिंतीची लांबी वाढविण्याकरिता त्या बाजूच्या बांधकामात चाल सोडतात. भिंतीच्या जोडावरचा गुताव विशेष मजबूत असावा म्हणून जोडावर चाल सोडीत नाहीत. भिंतीवर जेथे बहाले, कैच्या वगैरे वजन पेलणाऱ्या गोष्टी टेकावयाच्या असतील त्यांना टेकण तळपाट म्हणून अखंड दगडाचा किंवा सिमेंट काँक्रीटचा ठोकळा बांधकामाच्या रुंदीवर तळपाट म्हणून ठेवतात (आ.१८). बांधकामासाठी वापरावयाच्या संयोजकाची रास आपोआप पसरणार नाही इतपत संयोजक घट्ट ठेवतात. प्रत्येक थरातील सर्व सांध्यांत संयोजक पुरेपूर भरला असला, तरी चारसहा थरांनंतरच्या थरावर संयोजकाचा पातळ गारा पसरून तो बांधकामात जिरू देतात. काही दिवस जुडाई थांबवावयाची असेल, तर झालेल्या कामावर आळी करून ती पाण्याने भरून ठेवतात. त्याच्यावर नवीन काम रचण्यापूर्वी त्या थरावरील सर्व संयोजक खरवडून टाकून संयोजक पसरून वरील कामास सुरुवात करतात.

ओक, भ. प्र.

दरजा भरणे : बांधकामाकरिता वापरलेला संयोजक बांधकामाच्या पृष्ठावरील सांध्यात तसाच राहू दिला., तर ऊन, पाऊस, वापर यांपुढे तो टिकत नाही म्हणून पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत सांध्यातील संयोजक उकरून काढतात व बांधकामावर गिलावा करावयाचा नसेल तेव्हा त्या ठिकाणी व फरसकामात जास्त मजबुतीचा व टिकाऊ संयोजक भरतात. यास दरजा भरणे म्हणतात. दरजा भरण्याचा प्रमुख उद्देश जरी सांध्याची मजबुती वाढविणे व पावसाचे पाणी सांध्यातून बांधकामात शिरू नये हा असला, तरी बांधकामाचा दर्शनी भागदरजा भरणे नीटनेटका दिसावा हा ही एक उद्देश असतो. बांधकामावर गिलावा केल्याने हे काम होते, पण त्यापेक्षा कमी खर्चाचे म्हणून नुसत्या दरजा भरतात. बांधकामातील सांधे भरपेट व चांगल्या संयोजकाने भरलेले असले, तर संयोजक आवळून येत असतानाच तोच संयोजक नहल्याने पृष्ठभागावर घोटून सांध्याच्या दोन्ही कडा सरळ रेषेत कापून बाजू साफ केल्यास दरजा भरण्याचे बहुतेक उद्देश थोड्या फार प्रमाणात साध्य होतात.

संयोजक आवळून कठीण झाल्यावर सांध्यातून तो उकरून काढताना आजूबाजूच्या कामास धक्का पोहोचण्याचा संभव असतो म्हणून बांधकाम ओले असतानाच सांधे उकरतात व लगोलग दरजा भरतात. बांधकामास चुन्याचा संयोजक वापरला असेल, तर रचाई झाल्यापासून चारपाच दिवसात व सिमेंट संयोजक असेल,तर पहिल्या दोन दिवसांत सांधे उकरतात. दगडी बांधकामाच्या निरनिराळ्या प्रकारांत व विटांच्या बांधकामात सांध्याची उंची कमीजास्त असते. त्या उंचीस अनुसरून सांधे ७ मिमी. पासून २५ मिमी.पर्यंत खोल उकरतात. दरजा भरण्यापूर्वी तारेच्या ब्रशाने साफ करून पाण्याने धुवून काढतात. चुना व बारीक वाळूच्या समभाग मिश्रणाने सांधे भरतात. त्या मिश्रणात बेलफळाचा गीर मिसळतात किंवा सिमेंट-वाळूच्या १ : १ अथवा १ : २ या प्रमाणातील मिश्रणाने दरजा भरतात. दरजा नहल्याने ठोकून व घासून भरगच्च भरतात आणि कडा सरळ कापून फरशी दगड विटांवर उडालेला चुना वा सिमेंट काढून टाकतात. चुन्याने भरलेल्या दरजा तीन दिवसांपर्यंत सतत ओल्या राहतील अशी व्यवस्था करतात.

बांधकामाच्या दरजांचा दृश्य भाग आ. १९ मध्ये (पृष्ठ ८८५) दाखविल्याप्रमाणे निरनिराळ्या पद्धतींनी पुरा करतात. भरवा पद्धतीत आजूबाजूच्या बांधकामाच्या पृष्ठभागाच्या सपाटीत दरज सपाट ठेवतात. झिरीदार पद्धतीत दरजा भरल्याबरोबर त्याच्यावर लाइनदोरी दाबून पृष्ठभागाच्या आत ३ मिमी. खाेलीपर्यंत अर्धवर्तुळाकार बनवितात व नहल्याने दाबून चोळून सु. ६ मिमी. खोल नेतात. नुकिली पद्धतीत अर्धवर्तुळाऐवजी त्रिकोनाकृती आत जिरवतात. अशा त्रिकोनाची खोली व उंची बांधकामाच्या सांध्याच्या उंचीच्या निम्म्याने ठेवतात. सलामी पद्धतीत दरजातील वरच्या कडेच्या माल पृष्ठभागाच्या आत दाबतात पण खालच्या कडेचा दाबत नाहीत व दरज उतरत्या आकाराची होते. गोटेदार पद्धतीत पृष्ठभागाच्या बाहेर दरज येईल अशी दरज भरून बाहेरील भागास अर्धगोल, अर्धषट्‌कोनी इ. आकार देतात. उभरी पद्धतीत दरजेतील माल सांध्याच्या उंचीच्या अर्ध्या उंचीइतका पृष्ठभागाच्या बाहेर व उंचीपेक्षा कमी रुंदीचा पट्टा ठेवतात.

दांडेकर, मो. मा.


गिलावा : इमारतीतील भिंती सपाट व गुळगुळीत व्हाव्यात आणि त्यामुळे स्वच्छता रहावी यांसाठी गिलावा करतात. भिंती शक्य तितक्या जलाभेद्य रहाव्या हा गिलाव्याचा आणखी एक हेतू असतो. गिलावा करण्याची पद्धत फार प्राचीन आहे. अजंठा लेण्यांत प्राचीन काळी काढलेली चित्रे आहेत, ती काढण्याकरिता अगोदर दगडावर गिलावा केलेला आहे. ईजिप्तमधील पिरॅमिडांमध्ये अजूनही पक्का व टिकावू असलेला गिलावा केलेला आढळतो. ज्या आधारावर गिलावा करावयाचा त्यास गिलावा धरून रहावा म्हणून पकड असावी लागते. खडबडीतपणामुळे अशी पकड निर्माण होते. अवश्य तेवढी पकड नसेल, तर ती बनवावी लागते. गिलाव्यातील घटकांच्या चिकटण्याच्या गुणधर्माप्रमाणे गिलावा घट्ट व टिकाऊ बनतो. कोणताही गिलावा देण्यापूर्वी बांधकामाच्या दरजा खरवडून बांधकाम भिजवून ठेवतात. दगडी, विटांच्या किंवा काँक्रीटच्या आधारावर गिलावा करतात. त्याचप्रमाणे लाकडाच्या बनविलेल्या जाळ्या, कूड, तारेच्या जाळ्या, चिरा पाडलेला पत्रा ताणून तयार केलेल्या जाळ्या वगैरेंच्या आधारावर गिलावा करून १५ ते २० मिमी. इतक्या कमी रुंदीच्या भिंती किंवा नकली छत बनवितात. गिलाव्याचे बहुधा दोन हात पुरे होतात. दगडी आधारावर केलेल्या गिलाव्याची जाडी ३० मिमी. पर्यंत असेल, तर चांगल्या प्रकारे ओतलेल्या काँक्रीटच्या कामावर ६ मिमी. जाडीचा गिलावा पुरेसा होतो. माती, चुना, जिप्सम आणि सिमेंट हे निरनिराळ्या प्रकारच्या गिलाव्यांचे मुख्य घटक आहेत.

मातीचा गिलावा : याचा वापर हल्ली फक्त ग्रामीण भागात करतात. मातीच्या संयोजकात रचलेल्या भिंती किंवा कुडाच्या भिंतीवर मातीचा गिलावा करतात. मातीच्या संयोजकाकरिता योग्य अशी चिकण माती व त्यात २५ टक्के शेण मिसळून केलेल्या गार्‍यात एक आठवड्यानंतर गवताचे किंवा तागाचे तुकडे घालून तुडवून एकजीव करतात, ह्या गिलाव्याचा पहिला हात सपाट लाकडी रंध्यात सारखा करतात. गिलावा सुकू लागल्यावर पडणाऱ्या भेगा बुजविण्याकरिता लाकडी टिपणीने गिलावा आठदहा दिवस वारंवार ठोकतात व पातळ शेणखळ्याने एकदोनदा सारवतात. अशा ठोकण्याने गिलावा चिटकून बसतो व घट्ट बनतो. त्यावर शेण, पांढरी किंवा तांबडी माती किंवा सिमेंटचे सारवण केले म्हणजे अखेरचा हात होतो.

चुन्याचा गिलावा : तिखट चुन्यात दोन भाग वाळू मिसळून तो मळतात व त्यात १० टक्के गूळ मिसळून हा गिलावा भिंतीवर जोराने पसरून मारतात. यामुळे हा थर खालील आधारास चिटकून बसतो व त्याच्या खडबडीत पृष्ठभागाची पकड दुसऱ्या हातास मिळते. दुसऱ्या हाताकरिता वरीलप्रमाणेच पण ३० ते ४० मिमी. लांबीचे वाखाचे तुकडे घालून सात दिवसांच्या अंतराने दोनदा मळतात. दुसरा हात देण्यापूर्वी पृष्ठभागावर ठिकठिकाणी एका पातळीत असतील असे सु. ३ मी. अंतरावर गिलाव्याचे दाढे करतात. गिलाव्याचा दुसरा हात लांब लाकडी रंध्याने दोन दाढ्यांच्या पातळीत चोळून सारखा करतात. लाकडी टिपणीने ठोकून त्यात पडणाऱ्या बारीक चिरा बुजविल्या जातात. १६ किग्रॅ. गूळ व सु. ९ किग्रॅ. बेलफळाचा गीर ७५ ते १०० लि. पाण्यात विरघळवून त्या पाण्याचा शिडकावा गिलाव्यावर ठोकणी चालू असताना मारल्यास गिलावा लवकर आळतो आणि त्याचा दर्जा सुधारतो. जास्त गुळगुळीत पृष्ठभाग पाहिजे असेल, तर संदल्याचा तिसरा हात देतात. गिलाव्याचा दुसरा हात देण्याकरिता गिलाव्यात ४ किग्रॅ. गूळ व टरफले काढलेले २२ किग्रॅ. हिरडे ३० लि. पाण्यात विरघळवून व ४८ तास मुरविलेले पाणी मिसळतात. त्यास हिरड्याचा गिलावा म्हणतात. यावर दोन भाग सफेतीत एक भाग चुन्याची पूड मिसळून त्याचा पातळ थर देतात व त्यावर सफेतीचा हात देतात.

चुना-सिमेंट गिलावा : वरीलप्रमाणे चुन्याचा गिलावा करण्यास चुना मळावा लागतो व गिलावा पुरा होण्यास कालावधी लागतो म्हणून त्याऐवजी सिमेंट व तिखट चुन्याची फकी यांच्या समप्रमाण मिश्रणाच्या तिप्पट वाळू एकत्र कोरडी कालवितात व अर्ध्या तासात वापरला जाईल इतका माल प्रत्येक वेळी पाण्यात कालवून तो गिलावा चुन्याच्या गिलाव्याच्या दुसऱ्या हाताप्रमाणे पहिला हात म्हणून देतात. हा तीन-चार दिवसांत पक्का होतो. दुसऱ्या दिवशी त्यावर वारंवार पाणी मारावे लागते. यावर अखेरचा हात म्हणून सिमेंट, तिखट चुना व रांगोळीइतकी बारीक वाळू सम प्रमाणात मिसळून पाणी घालून तो गिलावा चोळतात व करणीने घोटून पुरा करतात.

सिमेंट गिलावा : चुन्याच्या गिलाव्यापेक्षा सिमेंटचा गिलावा जास्त जलाभेद्य असतो. सिमेंट व त्याच्या चौपट वाळू एकत्र मिसळून त्या गिलाव्याचा पहिला हात देतात आणि तो वाळण्यापूर्वी सिमेंट व बारीक वाळू सम प्रमाणात मिसळून त्याचा दुसरा हात ब्रशाने लावून करणीने घोटतात. यानंतर एक आठवडाभर हा गिलावा ओलाचिंब राहील अशी दक्षता घ्यावी लागते. यापेक्षा जास्त जलाभेद्य गिलावा पाहिजे असेल, तर दुसऱ्या हातासाठी वापरावयाच्या गिलाव्यात तुरटी व धुण्याचा साबण यांचे सम प्रमाण द्रावण मिसळतात. पाण्याचा दाब सहन करील असा जलाभेद्य गिलावा करण्यास सिमेंट व वाळूचे कोरडे मिश्रण एक चौ. सेंमी. ला २ ते ३ किग्रॅ. इतक्या जोराच्या हवेच्या फवाऱ्याच्या साह्याने कामावर मारतात. अवश्य तेवढे पाणी फवारा उडताना त्यात मिसळेल अशी सोय केलेली असते.

जिप्समचा (प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा ) गिलावा : हा गिलावा भारतात सरसहा वापरीत नाहीत. हा गिलावा आगप्रतिबंधक व ध्वनिशोषक असतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये दुप्पट किंवा तिप्पट वाळू किंवा लाकडाचा भुसा मिसळून तो गिलाव्याच्या पहिल्या हाताकरिता वापरता येतो, पण सतत ओलाव्याच्या जागी तो टिकत नाही. जिप्सम भाजून प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार होताना त्यात चुना मिसळून भाजला, तर होणाऱ्या पदार्थाचा गिलावा ओलाव्यातही टिकाऊ होतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये चुना किंवा सिमेंट मिसळून केलेला गिलावा शेवटच्या हातासाठीही वापरता येतो. 

संदला किंवा नीरू : गिलावा गुळगुळीत व्हावा म्हणून अखेरचा हात संदल्याचा देतात. चुन्याच्या कळ्या विरवून, ढवळून ते मिश्रण जाड कापडातून गाळतात व सु. १० दिवस निवळू देतात. निवळी काढल्यानंतर राहिलेला मऊ चुना म्हणजे संदला होय. दमट चुन्याचा संदला बनविण्याकरिता तो पुष्कळ पाण्यात भिजवून ते मिश्रण घाणीत मळतात. नंतर ते गाळून संदला बनवितात. संदला वापरण्यात येईपर्यंत ओला ठेवणे अवश्य असते. संदल्यात रांगोळीइतकी बारीक वाळू अगर सुर्खीची पूड थोडीशी मिसळल्यास किंवा संदल्याच्या हातावर सफेतीचा एक हात ताबडतोब दिल्यास चिरा पडत नाहीत. संदला चोळल्यावर त्यावर पाणी मारीत नाहीत. सुर्खी मिसळलेला संदला सागोल नावाने सुका आयता मिळतो. संदल्यावर शंखजिरे चोळल्याने पृष्ठभाग जास्त गुळगुळीत होतो. संदल्यात अभ्रकाची पूड घातल्यास गिलाव्यावर चमक दिसते. गिलावा फार गुळगुळीत असेल, तर त्यावर रंग थर धरीत नाही. 


भिंतीच्या बाहेरील अंगास बहुधा सिमेंटचा गिलावा करतात. गिलाव्यावर १५ दिवस पाणी मारावे लागते. खडबडीत दिसणाऱ्या गिलाव्यासाठी २५ मिमी. जाडीची अणकुचीदार वाळू सिमेंटच्या तिप्पट प्रमाणात घेऊन अवश्य तर एखादा रंग मिसळून तयार करतात व त्याचा बहुधा एकच हात छऱ्यासारखा मारतात. यापेक्षा कमी खडबडीत दिसावयास पाहिजे असेल, तेव्हा थोडी बारीक वाळू वापरून त्यावर हलक्या हाताने रंधा फिरवितात. गिलावा ओला असताना त्यात मोठे निरनिराळ्या रंगाचे खडे हाताने चिकटवून बसवून ठोकून एका पातळीत बसवून बाहेरच्या अंगास चौकटी तयार करण्याची गिलाव्याची एक पद्धत आहे. कंगोरे किंवा नक्षीकाम करण्याकरिता त्याच्या आकाराचे फर्मे तयार करून एकसारखा आकार देतात. हे काम संदल्यात किंवा जास्त कलाकुसर असेल, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये चुना मिसळून करतात. 

जाळीवर गिलावा : ५ ते ६ सेंमी. भोके असलेली तारेची जाळी ताणून तयार केलेली जाळी वगैरे ताठ उभारून त्याच्या एका बाजूस तात्पुरते तक्ते लावून दुसऱ्या बाजूने त्यावर गिलावा मारतात व दृश्य भागास अखेरचा हात देतात. अत्यंत कमी रुंदीची भिंत किंवा छत अशा तऱ्हेने बनवितात. पेशवाई काळात लाकडी जाळ्यांवर मातीचा गिलावा करून भिंती करीत असत. 

गिलाव्याचा सर्व खटाटोप टाळण्याकरिता आधुनिक पद्धतीत ॲस्बेस्टसाचे सपाट पत्रे, मुद्दाम बनविलेले लाकडी तक्ते वा पत्रित (लॅमिनेटी ) तक्ते भिंतीच्या पृष्ठभागावर स्क्रूने बसवितात. सांधे एकजीव करतात किंवा रीप मारून चौकटी करतात. हे स्वच्छ रहातात, टिकाऊ असतात व सुंदर दिसतात. ते बसविण्याकरिता इतर बांधकाम खोळंबत नाही. 

बांधकामातील संज्ञा : पाया : जमिनीखाली आधाराकरिता केलेले बांधकाम. 

बांधकामातील संज्ञा : (अ) उभा छेद : (१) पाया, (२) जोते, (३) काँक्रीट, (४) फरसबंदी, (५) पाटथर, (६) कंगोरा, (७) कुडवा,(८) तळसरी, (९)बाहेरील बगल, (१०) आतील बगल, (११) चप, (१२) खोबणी, (१३) फाट, (१४) छावणी, (१५) तळपाट, (१६) तुळई, (१७) कंगणी, (१८) घोडा, (१९) जलथा, (२०) गच्ची, (२१) मुंडेरी (आ) अ मधील क ड येथील आडवा छेद.

जोते : जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर तळमजल्याच्या जमिनीच्या पातळीपर्यंतचे बांधकाम. 

पाटथर : जोत्याच्या भिंतीच्या माथ्यावरील एकसंध घडीव दगड, सिमेंटचा ठोकळा अगर फरशी. 

कंगोरा : बांधकामाचे काही थर किंचित आत सरकवून बांधकाम रचल्याने राहणारी कड. 

कुडवा : भिंतीच्या तळाजवळच्या भागावरील पट्टा, निराळ्या रंगाने किंवा उभ्या फरशा बसविलेला भाग. हा भाग १५ सेंमी. ते ७५ सेंमी. पर्यंतच्या उंचीचा असू शकतो.  

कोबा : वीटकुरे व संयोजक मिळून केलेले काँक्रीट. 

वीटकुर : विटांचे तुकडे. तळसरी: खिडक्यांच्या उघडीपाखाली बांधकामावर पसरलेला काँक्रीटचा ठोकळा किंवा घडीव दगड. 

बगला : खिडकी-दरवाज्याच्या उघडीपेच्या दोन्ही उभ्या बाजू चौकटीच्या दर्शनी भागाकडील बाहेरची व आतील बाजूची जास्त रुंद असलेली आतली बगल. 

फाट : आतली बगल आतल्या टोकाला जास्त रुंद येईल अशी तिरकस बगल.

 छावणी : खिडकी-दरवाज्याच्या उघडीपेवरच्या गाळ्यावर घातलेले दगडाचे किंवा काँक्रीटचे आच्छादन. 

चांदई : कडेची भिंत. 

आडभिंती : आतील भिंती. 

पडभिंत : मुख्य भिंतीस धीरा म्हणून बाहेरच्या बाजूस बांधलेली तिरकस भिंत. 

घोडनट वा घोडे : भिंतीत गुंतवून बाहेर झुकतील असे लाकडी, दगडी किंवा विटांचे ठोकळे. 

कंगणी : भिंतीच्या दर्शनी भागावर पुढे आलेली बांधकामाची ओळ. 

गलथा : भिंतीच्या दर्शनी भागापुढे मनुष्य उभा राहू शकेल अशी रुंद कंगणी. बांधकामातील संज्ञा : (अ) उभा छेद : (१) पाया, (२) जोते, (३) काँक्रीट, (४) फरसबंदी, (५) पाटथर, (६) कंगोरा, (७) कुडवा,(८) तळसरी, (९)बाहेरील बगल, (१०) आतील बगल, (११) चप, (१२) खोबणी, (१३) फाट, (१४) छावणी, (१५) तळपाट, (१६) तुळई, (१७) कंगणी, (१८) घोडा, (१९) जलथा, (२०) गच्ची, (२१) मुंडेरी (आ) अ मधील क ड येथील आडवा छेद.

रमणा :  दर्शनी भागाच्या पुढे झुकलेली लहान मोकळी जागा. 

पेंड : घराच्या पाटणीवर किंवा ओमणावर पसरलेला मातीचा थर.

गांट : उतरत्या छपराची कड भिंतीस भिडते त्या सांध्यावर भरलेली संयोजकाची ओळ. चाल सोडणे : बांधकामाची लांबी वाढविण्याच्या वेळी गुतावाकरिता कडेला सोडलेले टप्पे. 

आळे : बांधकामावर पाणी राहण्याकरिता मातीचे लहान बांध घालून केलेल्या जागा.

चप मारणे, कोर मारणे : कोपऱ्याची कड तोडून चपटी अगर गोलाईत आणणे .

मुंडेरी : भिंतीच्या उघड्या माथ्यातून पावसाचे पाणी वगैरे भिंतीच्या पोटात शिरू नये म्हणून उतरते व दोन्ही बाजूंस बाहेर झुकेल असे गिलाव्याचे, विटांचे, फरसबंदीचे, दगड अगर काँक्रीटचे आच्छादन.

तराफा : गिलावा घोटण्याकरिता मूठ असलेली सपाट फळी. ०·५ ते १·० मी. लांब, सु. ८ सेंमी. रूद व ०. ७५ ते १· ०० सेंमी. जाड.  

पहा :  काँक्रीट बांधकाम तंत्र बांधकाम संरचना, सिद्धांत व अभिकल्प बांधकामाची साम्रग्री बांधकामाचे दगड विटा संयोजक.

ओक, भ. प्र.

संदर्भ : 1. Branden, F. Van Den Knowles, M. Plastering : Skill and Practice, Chicago, 1953.

    2. Government of Maharashtra, P.W.D. Handbook, 2 Vols., Bombay, 1960.

    3. Government of Maharashtra Standard Specifications, Bombay, 1965.

    4. Greenhalgh, R. Ed., Modern Building Construction, 3 Vols., London.

    5. Mecay, W. B. Building Construction, 2 Vols., London, 1963.

    6. Sane, S.Y. Construction Engineering, Vol. I , Bombay, 1966.