पंपभारत : प्राचीन कर्नाटकाचा महाकवी पंप याने विक्रमार्जुनविजय (९४१) हे महाकाव्य रचले. त्यालाच पंपभारत म्हणतात. विक्रमार्जुनविजय अथवा पंपभारत हे महाकाव्य आपला आश्रयदाता दुसरा अरिकेसरी याची कीर्ती चिरंतन करण्यासाठी पंपाने रचले आणि त्या राजालाच आपल्या काव्यात अर्जुनाचे परमवीरपद बहाल केले. वास्तविक अरिकेसरी हा राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याचा एक मंडलाधिकारी पण त्याला इतके मोठे स्थान कवीने का दिले, हे समजून घेण्यासाठी दहाव्या शतकातील कर्नाटकाच्या राजकीय परिस्थितीचे अवलोकन करणे अप्रस्तुत होणार नाही.
राष्ट्रकूट वंशातील राजा दंतिदुर्ग याने ७५३ मध्ये नासिक येथे आपले राज्य स्थापन केले आणि तिसरा गोविंद (कार. ७९३–८१४) याने उत्तरेतील माळव्यापासून दक्षिणेतील कांचीपर्यंत राष्ट्रकूट राज्याचा विस्तार केला. त्याचा मुलगा पहिला अमोघवर्ष (८०८–८०) याने नासिक येथून आपली राजधानी कर्नाटकात मान्यखेट (मालखेड) या ठिकाणी नेल्यापासून या राष्ट्रकूटांना कर्नाटकाचे राजे समजण्यात येऊ लागले. या वंशातील तिसरा कृष्ण (कार. ९३९–६७) याचा पुलिगेरे (लक्ष्मेश्वर) येथील एक मांडलिक दुसरा अरिकेसरी, हा पंपाचा आश्रयदाता होता. दुसरा अरिकेसरी हा मांडलिक होता, तरी राष्ट्रकूटांच्या पडत्या काळात त्याने मर्दुमकी गाजविली आणि तो तिसरा अमोघवर्ष (कार. ९३४–३९) आणि त्याचा मुलगा तिसरा कृष्ण यांच्या राजवटीचा प्रमुख आधारस्त्तंभ बनला होता. अरिकेसरी हा चालुक्य वंशातील होता. या आपल्या आश्रयदात्याचे शौर्य मोठे होते, हे पटविण्यासाठी पंपाने एका नवीन तंत्राचा अवलंब केला. परंपरागत महाभारत या शौर्यगाथेचा साचा म्हणून उपयोग करून त्यात अरिकेसरीला त्याने अर्जुनाचे स्थान दिले. रामायण आणि महाभारत या ग्रंथांचा आपल्या मतप्रचारासाठी त्यांतील नायकांच्या नावात बदल करून उपयोग करण्याचे जैन धर्मीयांचे तंत्र जुनेच आहे. सर्वमान्य असलेल्या तीर्थंकरांचे गुणगान करण्यासाठी या तंत्राचा बराच उपयोग झाला ही गोष्ट खरी असली, तरी त्या मानाने सामान्यच ठरणाऱ्या अरिकेसरीचा महिमा गाण्यासाठी महाभारतासारखे भव्योदात्त माध्यम वापरल्यामुळे औचित्याच्या दृष्टीने पंपाच्या पदरी भरघोस यश पडत नाही. तरीदेखील काव्यगुणात अप्रतिम ठरलेल्या पंपकवीने या दोषाचे गांभीर्य आपल्या आभिजात कृतीद्वारे बरेच सौम्य केले आहे.
विक्रमार्जुनविजय हे व्यासप्रणीत महाभारताचे चंपूकाव्यशैलीतील संक्षिप्त रूप दिलेले महाकाव्य आहे. व्यासांच्या कृतीच्या आशयाचे महत्त्व जागतिक स्वरूपाचे असल्यामुळे ती कोणत्या एका धर्माची मिळकत नव्हे, असे पंपाचे मत आहे. महाभारताचा कोणताही महत्त्वाचा भाग न वगळता त्याचा संक्षेप करण्यात त्याला निश्चित यश आले आहे. व्यासकृत भारताचा खरोखरीच नायक कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे. धर्म, भीम, अर्जुन हे पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या युतीला सामूहिक नायकत्व बहाल करणे, कथेच्या दृष्टीने सोयीचे नसते. यासाठी पंपाने अर्जुनाला महाभारताचा नायक ठरविले. त्याने या विषयात कोणत्या पूर्ववर्ती ग्रंथाचा आधार घेतला, हे समजणे कठीण आहे तरीपण अर्जुनाला नायकपद देण्यात अनौचित्य नाही हे त्याला ठाऊक होते. व्यासांनी जितक्या कौशल्याने चरित्रचित्रण केले, तितक्याच कौशल्याने पंपाने अरिकेसरीची प्रतिमा साकार करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. व्यासांना अभिवादन करून प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी त्याने अर्जुनाचेच स्तवन केले आहे. धर्म, भीम, द्रौपदी ही त्यात गौण पात्रे ठरली आहेत. कुरुक्षेत्रावरील युद्ध आटोपल्यावर युधिष्ठिराऐवजी अर्जुनाचेच राज्यारोहण त्याने आपल्या काव्यात दाखविले आहे. अरिकेसरीची कीर्ती चिरंतन करण्यासाठी महाभारताचे कथानक राबवून आपल्या काव्यनैपुण्यामुळे पंपाने यश मिळविले असले, तरी महाभारताच्या भक्तांना त्याचा प्रयत्न धाडसाचा वाटल्याशिवाय रहात नाही. असे असले, तरी केवळ आपल्या आश्रयदात्याचा गौरव करण्याच्या लौकिक दृष्टीने महाभारतासारखा श्रेष्ठ ग्रंथ राबवणारा भाट, असा आक्षेप त्याच्यावर कोणी घेतला नाही. कारण त्याने महाभारतातील व्यक्ती आणि जीवनाचे विविध दृष्टिकोन यांचा इतक्या समर्थपणे विचार केला आहे, की त्याचा मूळ उद्देश त्याच्या काव्यात लुप्तप्राय ठरलेला आढळतो. त्याचे कवी या नात्याने सिद्ध झालेले यश पाहून पुढील काळातील रन्न (९९३) याने आपले प्रसिद्ध गदायुद्ध हे काव्यही याच थाटात रचले आणि तेही तितकेच श्रेष्ठ काव्य म्हणून प्रसिद्धी पावले. पंपाचे खरे यश त्याच्या रसपरिपोषात आहे. पंडूचे मरण, भीष्माची प्रतिज्ञा, कर्ण–भीष्म यांच्यातील वादविवाद, कीचकवध, द्यूतक्रीडा इ. प्रसंग मूळ महाभारताइतक्याच उत्कटतेन त्याने हाताळले. पंपाने महाभारतातील पर्वविस्तार बदलून त्याऐवजी कथासौष्ठवासाठी निवडक अशी दृश्ये आणि प्रसंग निवडले आहेत. पंपभारताच्या यशाचे मर्म या विशिष्ट रचनेत व परिणामकारक वर्णनशैलीत आहे. महाभारतातीलवीरांच्या प्रतिमा पंपभारतातदेखील तितक्याच तेजस्वी वठल्या आहेत. अर्जुनाची श्रेष्ठता वर्णन करीत असतानाच त्याच आत्मीयतेने पंपाने कर्णाचेही चरित्रचित्रण केले आहे. कर्ण दुर्योधनाचा एकनिष्ठ मित्र होता, ही गोष्ट पंपाला त्याच्या स्वतःच्या अरिकेसरीबद्दलच्या निष्ठेच्या संदर्भात स्फूर्तिप्रद ठरली असावी. पंपभारताचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य हे, की मूळ महाभारतातील ‘नारायणं नमस्कृत्य’ या भावनेने आदरणीय ठरलेल्या श्रीकृष्णाचा फक्त काही ठिकाणी ‘अजित’ या नावाने कवीने उल्लेख केलेला आढळतो. यावरून पंप श्रीकृष्णाला फक्त जैनधर्मीय द्वितीय तीर्थंकराएवढाच आदर दाखविण्यास तयार होता भागवत संप्रदायातील श्रीकृष्णाचे अत्युच्च स्थान त्याला मान्य नव्हते, असे दिसते. कन्नड काव्याचा पिता व आदिकवी ह्या पदव्या पंपास यथार्थतेने लागू पडतात.
पंपभारत हे कन्नडमधील आद्य व श्रेष्ठ महाकाव्य असून कोणत्याही अंगाने त्याच्याकडे पाहिले, तरी त्याचे श्रेष्ठत्व प्रत्ययास येते. शब्दसौष्टव, कल्पकता, नादमाधुर्य, छंदाचे वैविध्य, देसी शैलीचे सौंदर्य, रसनिष्पत्ती इ. गुणविशेषांचा मनोज्ञ संगम त्यात झालेला आढळतो. स्वतः पंपानेच म्हटले आहे, की ‘काव्य हे सागराप्रमाणे नित्यनूतन व गंभीर असावयास हवे. त्यात विश्वाचे सार असून त्याने धर्माचा प्रसार करावयास हवा.’ या निकषावर त्याचे प्रस्तुत काव्य निश्चितच उतरते. हे तसे नावाने लौकिक काव्य असले, तरी व्यापक अर्थाने धार्मिक काव्यच म्हणावे लागेल. त्याच्या आदिपुराण ह्या धार्मिक काव्याहूनही हे काव्य अधिक परिपूर्ण, विकसित व कलात्मक दृष्टीने श्रेष्ठ आहे.
दिवेकर, गु. व्यं.