क्रॉग, (शाक) आउगूस्त (स्टीनबॅर्ग) : (१५ नोव्हेंबर १८७४–१३ सप्टेंबर १९४९). डॅनिश शरीरक्रियाविज्ञ. वैद्यकशास्त्राच्या १९२० सालच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म ग्रेनॉ येथे झाला. १९०३ मध्ये त्यांनी बेडकांच्या श्वसनक्रियेबद्दल प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली. १९१६ मध्ये कोपनहेगन विद्यापीठात ते प्राणी शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे प्राध्यापक झाले.

श्वसनक्रियेसंबंधी बरेच संशोधनात्मक कार्य करून त्यावर त्यांनी मेकॅनिझम ऑफ गॅस एक्सचेंज इन द लंग्ज  हा विवेचक ग्रंथ लिहिला. व्हिएन्ना सायन्स ॲकॅडमीने त्याबद्दल त्यांना पारितोषिक दिले होते. ‘स्नायूंतील रक्तप्रवाहावरील केशवाहिन्यांद्वारे (सूक्ष्म रक्तवाहिन्यांद्वारे) होणारे नियंत्रण’ या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी ऊतकाची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाची) क्रियाशीलता व केशवाहिन्यांतील रक्तप्रवाह यांचा संबंध दाखविला. सक्रिय स्नायूंमधील कार्यक्षम केशवाहिन्यांची संख्या स्तब्ध स्नायूपेक्षा जास्त असते व ह्या फरकावर ऑक्सिजनाचा पुरवठा अवलंबून असतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी लिहिलेले रेस्पिरेटरी एक्सचेंज इन ॲनिमल्स ॲन्ड मॅन (१९१६), द ॲनॉटमी अँड फिजिऑलॉजी ऑफ कॅपिलरीज (१९२२) व ऑस्मॉटिक रेग्यूलेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स (१९३९) हे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. यांशिवाय शरीरक्रियावैज्ञानिक नियतकालिकातही त्यांचे निबंध प्रसिद्ध झाले होते. १९४५ साली त्यांना इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे बाली पदक मिळाले. ते कोपनहेगन येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.