गोविंददास कविराज : (१५३५—१६१३). प्रसिद्ध बंगाली कवी. वर्धमान जिल्ह्यातील श्रीखंड या गावी सेन कुटुंबात जन्म. पित्याचे नाव चिरंजीव व मातेचे नाव सुनंदा. विशिष्ट वैष्णव पदावलीचे कर्ते. त्या काळी ‘ब्रजबुली’ मध्ये (ब्रज भाषेहून वेगळी) गीतिकाव्ये लिहिणाऱ्या कवींत ते श्रेष्ठ मानले जातात. मातामह दामोदर सेन यांच्या प्रभावाने गोविंददास प्रथम शिव-शक्तीचे उपासक बनले होते. तो त्यांचा बहुदा कुलधर्म असावा. पुढे मोठेपणी श्रीनिवास आचार्यांच्या प्रभावाने त्यांनी वैष्णव संप्रदायाची दीक्षा घेतली. वैष्णव होण्यापूर्वी त्यांनी थोडीबहुत पद्यरचना केलेली होती. वैष्णव झाल्यानंतर त्यांनी सातत्याने राधाकृष्ण-पदावली रचल्या. वृंदावन येथील गौडीय वैष्णव संप्रदायाचे प्रमुख जीव गोस्वामी यांनी गोविंददासांच्या प्रतिभाशक्तीचे सादर कौतुक करून त्यांना ‘कविराज’ ही पदवी दिली. समकालीन अनेक मान्यवर, गुणी, धनी व्यक्तींशी गोविंददास कविराज यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. 

गोविंददासांच्या पदावली विशुद्ध ब्रजबुलीत असून छंदांवरही त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. त्यांच्या काव्यरचनेचे सौंदर्य तसेच अनुप्रासादींनी साधलेले नादमाधुर्य इ. विद्यापतींसारखे असल्याने त्यांच्या ‘द्वितीय विद्यापति’ म्हणून लौकिक झाला. संस्कृत भाषासाहित्यावरही त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. वैष्णव पदावलींखेरीज त्यांनी संस्कृतमध्ये संगीत माधव  नावाचे एक नाटक व कर्णामृत  नावाचा एक काव्यग्रंथ लिहिला.                  

कमतनूरकर, सरोजिनी