नागराज : हा साप ⇨ नागाच्या वंशातीलच (नाजा) असून त्याचे जातिवाचक नाव नाजा हॅना आहे. भारत, ब्रह्मदेश, मलेशिया, फिलिपीन्स बेटे, दक्षिण चीन इ. भागांतील दाट अरण्यात तो आढळतो. डोंगराळ प्रदेशात सु. २,१३० मी. उंचीपर्यंत तो आढळून येतो. भारतात हिमालय, बंगाल, आसाम आणि दक्षिण भारतातील डोंगर आणि अरण्ये यांत तो असतो.

हा एक फार मोठा, भयंकर आणि विषारी साप आहे. याची लांबी सामान्यतः ४·५–५·४ मी. असते. नागाप्रमाणेच हा फणा काढतो पण नागाच्या फणेपेक्षा ती लहान असते. फणेवर १० सारखा आकडा किंवा वर्तुळाकार चिन्ह नसते. पूर्ण वाढ झालेल्या नागराजाचा रंग पिवळा, हिरवा तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर सामान्यतः पिवळसर अथवा पांढरे आडवे किंवा Ωच्या आकाराचे पट्टे असतात. खालचे पृष्ठ सरसहा सारख्या रंगाचे किंवा त्याच्यावर ठिपके किंवा सळ्या असतात. गळ्याचा रंग फिक्कट पिवळा किंवा पांढरा असतो. पिल्ले काळी कुळकुळीत असून त्यांच्या अंगावर व शेपटीवर पिवळे वा काळे आडवे पट्टे असतात आणि असेच पट्टे डोक्यावर असतात.

हा आक्रमक वृत्तीचा साप असून काही कारण नसताना वाटेल त्या प्राण्यावर हल्ला करायला सोडीत नाही. शरीराचा पुढचा ६०–९० सेंमी. भाग उभारून हल्ला करण्याच्या पवित्र्यात असलेला तो पुष्कळदा दिसतो. याचा दंश तीव्र असून विष जहाल असते. प्रत्येक दंशाच्या वेळी साधारणपणे विषाचे सु. ३० थेंब तो जखमेत सोडतो.

लहानमोठे विषारी आणि बिनविषारी साप खाऊन हा आपली उपजीविका करतो. क्वचित तो सरडेही खातो.

मादी कळकाची पाने आणि शिरकुट्या यांचे घरटे तयार करून त्यात एप्रिल महिन्यात अंडी घालते.

सगळ्या सापांमध्ये नागराज हा अत्यंत बुद्धिवान सर्प आहे, असे रेमंड एल्. डिटमार्स यांनी बरेच प्रयोग करून सिद्ध केलेले आहे. ग्रेस ऑलिव्ह वायली या विषारी साप बाळगण्याचा आणि त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याचा छंद असलेल्या बाईचे या सर्पाबद्दलचे मत डिटमार्स यांच्या मताशी जुळणारे आहे. इतर कोणत्याही विषारी सापापेक्षा नागराज हा सहज माणसाळणारा आहे, असा आपला अनुभव त्यांनी नमूद केलेला आहे.

दक्षिण चीनमधील कँटनभोवतालच्या प्रदेशात सापाचे मांस खाण्याचा प्रघात असून कँटन शहरातील सापांच्या आणि सर्प-मांसाच्या विक्रीच्या दुकानातून कधीकधी नागराज विक्रीकरिता ठेवलेला आढळतो.

कर्वे, ज. नी.