लालगोंडा : (अ) नर, (आ) मादी.लालगोंडा : या पक्ष्याची शेपटी एकसारखी थरथरत असल्यामुळे याला थरथरा असेही म्हणतात. टर्डिडी पक्षिकुलात याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव फीनिक्युरस ऑक्रूरॉस  हे आहे. हा सप्टेंबरमध्ये भारतात येतो व एप्रिलमध्ये परत जातो. हिवाळ्यात तो सगळीकडे सपाट व डोंगराळ प्रदेशांत आढळतो. खेड्यांच्या आणि शेतीच्या आसपास, दाट झाडीत झुडपांच्या जंगलात तो रहातो. मळे व बागांतही तो येतो. लालगोंडा चिमणीएवढा असतो. नराच्या शरीराचा रंग काळा असतो कमरेपासून मागचा भाग आणि पोट नारिंगी तांबूस काळसर पंख तपकिरी शेपटी नारिंगी तांबूस-काळसर मादीचा रंग तपकिरी पिंगट, खालची बाजू फिक्कट व पोटापासून मागे त्यात नांरिगी छटा, डोळ्यांभोवती फिक्कट रंगाचे वलय, कमर आणि शेपटी तांबूस-काळसर असते. डोळे गडद तपकिरी चोच आणि पाय काळे. हे पक्षी एकएकटे असतात. 

सर्व प्रकारचे किडे व कोळी हे याचे भक्ष्य होय आणि ते टिपण्याकरिता जमिनीवर उतरतो. कधीकधी उडणारे किडे हा माशीपकड्याप्रमाणे हवेतच पकडतो. याचा आवाज साधारण कर्कशच असतो पण प्रजोत्पादनाच्या काळात नर मंजूळ सूर काढतो.

हिमालयात ३,०४८ मी. उंचीपासून ५,९८२ मीटरपर्यंत व त्याच्या पलीकडे इराणपासून मंगोलियापर्यंतच्या भागात मेपासून ऑगस्टपर्यंत याची वीण होते. याचे घरटे वाटीसारखे खोलगट असून ते काटक्या, मुळ्या, गवत, शेवाळ वगैरे पदार्थांचे बनविलेले असते. ते भिंतींमधील भोकांत, खडकाखाली किंवा अशाच ठिकाणी असते. मादी ४-६ अंडी घालते. ती पांढरी स्वच्छ किंवा हिरवट निळ्या रंगाची असतात.

लालगोंडाच्या आणखी एकदोन जाती आहेत व त्या हिमालयात रहाणाऱ्या आहेत.

कर्वे, ज. नी.