पंत, गोविंदवल्लभ – १ : (? १८९८– ). हिंदी नाटककार, कथा-कादंबरीकार व कवी. जन्म उत्तर प्रदेशात रानीखेत (जि. अलमोडा) येथे. त्यांचे लहानपण जुन्या पंडिती वातावरणात गेले. वडील बंधूंमुळे त्यांना साहित्याची गोडी उत्पन्न झाली. बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजमध्ये शिकत असतानाच शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. त्यानंतर काही काळ ताडीखेत येथील ‘गांधी आश्रमा’त त्यांनी शिक्षकाचे काम केले. नंतर विश्वंभरसहाय ‘व्याकुल’ यांच्या ‘व्याकुल भारत नाटक कंपनी’ शी त्यांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या नाट्यलेखनास हा अनुभव परिपोषक ठरला. त्यांची मूळ प्रकृती कवीची असल्यामुळे त्यांनी नाटकांसाठी लिहिलेली गीतेही काव्यमय उतरली आहेत. राधेश्याम ‘कथावाचक’ (१८९०–१९६३) या नाटककाराच्या बरोबर राहून त्यांनी रंगभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रयोगक्षम नाट्यरचनेचे बारकावे त्यांना परिचित झाले. त्यांची नाटके प्रयोगाच्या दृष्टीनेही परिणामतः यशस्वी ठरली. चित्रपटसृष्टीचाही त्यांनी मुंबई येथे जाऊन अनुभव घेतला. या काळातच त्यांनी ‘पृथ्वी थिएटर्स’ साठी अहंकार (१९४५–अप्रकाशित) हे नाटक लिहिले. दिल्ली येथे ‘आकाशवाणी’ च्या संगीत-नाटक विभागातही त्यांनी काही काळ काम केले.

त्यांची उल्लेखनीय साहित्यनिर्मिती पुढीलप्रमाणे : नाटके : कंजूसकी खोपडी (१९२१), वरमाला (१९२४), अंतःपुर का छिद्र (१९२५), राजमुकुट (१९३२), अंगूर की बेटी (१९३५), सुहाग बिंदी (१९४०), ययाति (१९४७), सुजाता, प्रेमयोगी (पंडित बनारसीदास यांच्या समवेत) इत्यादी. एकांकिकासंग्रह : विषकन्या (१९५९). कथासंग्रह : एकादशी (१९२४), संध्याप्रदीप (१९३१), फटा पत्र लिलि. कादंबऱ्या : सूर्यास्त (१९२२), प्रतिमा (१९३४), तारिका (१९३४), मदारी (१९३६), तारों के सपने (१९३७), अनुरागिनी (१९४२), एक सूत्र (१९४४), अमिताभ (१९४५), नूरजहाँ (१९४५), मुक्ति के बंधन (१९४८), चक्रकांत (१९४८), प्रगति की राह (१९४८), यामिनी (१९५२), जलसमाधि (१९५३), नौजवान (१९५३), फारगेट मी नाट (१९५९), मैत्रेय (१९५९), पर्णा इत्यादी. काव्य : आरती  (१९१९).

बांदिवडेकर, चंद्रकांत