सायणाचार्य : (१३१५–१३८७). विद्वान वेदभाष्यकार आणि मुत्सद्दी. जन्म आंध्र प्रदेशातील एका ब्राह्मण कुटुंबात. वडिलांचे नाव मायण आईचे श्रीमती. चौदाव्या शतकात दक्षिणेत निर्माण झालेल्या विजयानगर राज्याचे प्रधानमंत्री, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात ‘विद्यारण्य’ ह्या नावाने शृंगेरी येथील शांकर मठाच्या पीठावर अधिष्ठित झालेले ⇨ माधवाचार्य हे सायणाचार्यांचे ज्येष्ठ बंधू. त्यांच्याखेरीज भोगनाथ नावाचा एक भाऊही त्यांना होता. सायणाचार्यांच्या पत्नीचे नाव हेमावती असे होते. त्यांना कंपण, मायण आणि शिंगण हे तीन पुत्र होते.

शृंगेरी पीठाचे स्वामी विद्यातीर्थ, भारती कृष्णतीर्थ आणि कांचीपुरम् चे श्रीकंठनाथ ह्या तीन गुरूंकडे त्यांचे अध्ययन झाले. व्याकरण, मीमांसाशास्त्र आदी अनेक शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तरुण असतानाच ⇨ विजयानगर साम्राज्याचा एक संस्थापक हरिहर (कार. १३३६1–५६)ह्याच्या कंपणनामक धाकट्या बंधूचे ते महामंत्री झाले. हरिहराचा प्रतिनिधी म्हणून आंध्र प्रदेशातील उदयगिरीस कंपण हा राज्य करीत होता. कंपणाच्या मृत्यूनंतर त्याचा लहान पुत्र संगम ह्याला सायणाचार्यांनी शिक्षण दिले त्याच्या वतीने राज्याचा कारभारही त्यांनी उत्तम प्रकारे केला. सायणाचार्य हे सरस्वतीचे जसे उपासक होते, तसे ते युद्घकलेतही निपुण होते. पुढे विजयानगरात सम्राट बुक्क ह्याच्या राज्यात ते प्रधान झाले. कंपणाकडे महामंत्री असतानाच सायणाचार्यांनी ग्रंथरचना सुरू केली होती तथापि त्यांच्या हातून झालेले ऐतिहासिक कार्य म्हणजे त्यांनी लिहिलेली वेदभाष्ये. सम्राट बुक्काने माधवाचार्यांना वेदभाष्ये लिहिण्याचा आदेश दिला होता तथापि माधवाचार्यांनी हे काम आपल्या धाकट्या बंधूंकडे– सायणाचार्यांकडे– सोपवावे असे सम्राटाला सुचविले

आणि वेदभाष्ये लिहिण्याची जबाबदारी सायणाचार्यांकडे आली. अनेक पंडितांच्या साहाय्याने सायणाचार्यांनी हे महत्त्वपूर्ण काम पार पाडले. ह्या कार्यामागे माधवाचार्यांचा असलेला भक्कम पाठिंबा आणि सायणाचार्यांना आपल्या वडील बंधूंबद्दल असलेला नितांत आदर ह्यांमुळे वेदभाष्यांच्या अध्यायसमाप्तीच्या निवेदनात ‘माधवीये वेदार्थप्रकाशे’ असा निर्देश आलेला आहे. यावरून त्यांनी रचलेल्या वेदभाष्याचे नाव वेदार्थप्रकाश असे असल्याचे स्पष्ट होते.

वेदार्थ समजून घेण्याच्या दृष्टीने सायणाचार्यांच्या वेदभाष्यांची रचना झाली. यास्काच्या काळीच वेदार्थ समजून घेणे अवघड झाले होते. त्या दृष्टीनेही सायणाचार्यांच्या वेदभाष्यांचे महत्त्व आहे.वेदांचा अभ्यास करणाऱ्या काही पश्चिमी पंडितांना मात्र सायणाचार्यांच्या वेदभाष्याबाबत, विशेषतः ऋग्वेदभाष्याबाबत, त्यांनी लावलेल्या वेदार्थाबद्दल शंका निर्माण झाल्या तथापि सायणाचार्यांनी वेदभाष्यांचे काम तडीला नेताना प्राचीन भारतीय परंपरा, तीत होऊन गेलेले विद्वान आचार्य, इतिहास-पुराणे, वेदांगे ह्यांच्यातील महत्त्वपूर्ण संदर्भांचे भान ठेवले होते. त्यांचे वेदभाष्य पारंपरिक ब्राह्मणग्रंथ, श्रौतसूत्रे व निरुक्त यांच्या आधाराने रचले असून वेदांचा यज्ञपर अर्थ लावणारे आहे.

सायणाचार्यांच्या ग्रंथांत सुभाषितसुधानिधि, आयुर्वेदसुधानिधि, यज्ञतंत्रसुधानिधि, अलंकारसुधानिधि, पुरुषार्थसुधानिधि, प्रायश्चित्तसुधानिधि, धातुवृत्तिसुधानिधि अशा काही ग्रंथांचाही समावेश होतो.

कुलकर्णी, अ. र.