कॉल्डवेल्ड, रॉबर्ट : (७ मे १८१४ — २८ ऑगस्ट १८९१). प्रसिद्ध द्राविडी भाषापंडित व मद्रासचा बिशप. तो मूळचा स्कॉटिश. सोळाव्या वर्षी धर्माभ्यासाकडे प्रवृत्ती दिसून आली. लंडन मिशनरी सोसायटीने त्याला शिक्षणासाठी ग्लासगो विद्यापीठात पाठविले. बी. ए. एल्एल्. डी. अशा पदव्या त्याने संपादन केल्या. याच वेळी त्याला भाषाशास्त्राची गोडी उत्पन्न झाली. १८३७ मध्ये तो मद्रासला गेला. बोटीवरच त्याचा तेलगु तज्ञ चार्ल्स फिलिप ब्राउन याच्याशी परिचय झाला. मद्रासला तो तमिळ शिकला. १८४१ मध्ये तो तिनेवेल्लीला गेला आणि त्याने पुढील पन्नास वर्षे धर्मसेवेत घालविली. द्राविडी भाषापंडित म्हणूनच त्याची कीर्ती अधिक आहे. त्याने परिश्रमपूर्वक फार मोठी भाषासामग्री गोळा केली. ख्रिस्ती प्रार्थनापुस्तक व बायबल ह्यांचे तमिळ भाषांतर-संस्करण करण्यास त्याने मदत केली (१८५८ – ६९). १८५६ मध्ये त्याने द्राविडी भाषांचे तौलनिक व्याकरण (कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ द द्राविडियन ऑर साउथ इंडियन फॅमिली ऑफ लॅंग्वेजेस) प्रसिद्ध केले आणि १८७५ मध्ये त्याची सुधारून वाढवलेली दुसरी आवृत्ती काढली. विविध प्रकारचे लोक व त्यांच्या बोली, त्याचप्रमाणे त्यांचा पूर्वेतिहास यांचा अभ्यास केल्यामुळे तो हे काम उत्तमपणे करू शकला. तिनेवेल्ली जिल्हा तसेच तेथील मिशन यांचा इतिहासही त्याने लिहिला आहे. तो ३१ जानेवारी १८९१ रोजी निवृत्त होऊन कोडईकानलला गेला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला.

कालेलकर, ना. गो.