ला रॉशफूको, फ्रांस्वा द्यूक द : (१५ सप्टेंबर १६१३- १६ किंवा १७ मार्च १६८०). विख्यात फ्रेंच सुभाषितकार. ‘प्रँस द मासिय्याक’ ह्या नावानेही प्रसिद्ध. पॅरिस शहरी त्याचा जन्म झाला. आरंभी त्याने राजकारणात भाग घेतला. तत्कालीन फ्रान्समधील कार्दीनाल द रीशल्य ह्या महत्त्वपूर्ण राजकारण्याच्या विरुद्ध त्याने हालचाली केल्या आणि नंतर ‘ला फ्रोंद’ ह्या नावाने फ्रान्सच्या इतिहासात प्रसिद्ध असलेल्या दोन बंडांत (१६४८, १६५१) त्याने भाग घेतला. तथापि राजकारणात त्याला वैफल्य आले आणि तो राजकारणातून निवृत्त झाला. ह्या निवृत्तीच्या काळात मादाम द लाफायेत, मादाम द सेव्हीन्ये, मादाम द साब्ले ह्यांसारख्या बुद्धिमान, साहित्यप्रेमी आणि संभाषणचतुर व्यक्तींच्या निकट सहवासाचा लाभ त्याला झाला आणि पॅरिसमधील त्याचे घर म्हणजे साहित्यिक, कलाकार व विचारवंत ह्यांचे नेहमी एकत्र येण्याचे स्थळ होऊन बसले. अनेक साहित्यिकांच्या-उदा., प्येअर कोर्नेय आणि निकॉला ब्वालो-देप्रेओ-साहित्याचे खाजगी वाचन तेथे होत असे.

ला रॉशफूकोच्या प्रमुख साहित्यकृतींत मेम्वार (१६६२) आणि रेफ्‌लेक्‌स्याँ उ सांतांस उ माक्सीम मॉराल (१६६५ १६६४ मध्ये द हेग येथे ह्या ग्रंथाची एक चोरटी आवृत्ती निघालेली होती) ह्यांचा समावेश होतो. मेम्वार ह्या त्याच्या आठवणी. ह्या आठवणींची शैली प्रासादिक आणि डौलदार असून त्यांतून त्याने उभी केलेली विविध व्यक्तींची स्वभावचित्रे उत्कृष्ट गणली जातात. सूक्ष्म आणि सखोल निरीक्षणावर ती आधारलेली आहेत. रेफ्लेक्‌स्याँ. . . हा त्याच्या विविध सुभाषितांचा संग्रह. माक्सीम ह्या लघुनामानेही तो ओळखला जातो. मोजक्या शब्दांत व्यापक आशय व्यक्त करणे, हे उत्तम सुभाषितांचे वैशिष्ट्य. ते ला रॉशफूकोच्या सुभाषितांत आढळते. ह्या सुभाषितांतून मानवी स्वभावाच्या विशेषांचे दर्शन त्याने परखडपणे घडविले आहे. सर्व मानवी वर्तनाच्या मुळाशी स्वार्थ आणि आत्मप्रेम हयाच प्रेरणा मुख्यतः असतात, असे एकंदरीने त्याचे मत आहे.

त्याच्या सुभाषितांचा प्रभाव तत्कालीन तसेच उत्तरकालीन विचारवंतांवर बराच पडला. थोर फ्रेंच विचारवंत व्हॉल्तेअर ह्याच्यावरील त्याचा प्रभाव स्पष्टच दिसतो.

पॅरिस येथेच तो निधन पावला.

टोणगावकर, विजया