क्नूट हामसूनहामसून, क्नूट : (४ ऑगस्ट १८५९–१९ फेब्रुवारी १९५२). श्रेष्ठ नॉर्वेजियन कादंबरीकार. जन्म लोम, नॉर्वे येथे. कुटुंब शेतमजुराचे. औपचारिक शिक्षण त्याने घेतले नव्हते. त्याच्या बालपणीचा बराचसा काळ नॉर्वेजियन समुद्रातील लोफोटेन बेटांवर गेला. आयुष्यात खूप लवकर त्याने अर्थार्जनासाठी विविध प्रकारची कामे करण्यास सुरुवात केली तथापि त्याचा लेखनाकडे कल होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच, एका चर्मकाराकडे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करीत असताना, त्याने लेखन करावयास आरंभ केला. त्यानंतरची दहा वर्षे तो असाच इतरत्र श्रमाची कामे करीत राहिला. ह्याच काळात दोन वेळा अमेरिकेत जाऊन त्याने कामे केली. त्यांतनॉर्थ डकोटा येथे शेतावरच्या मजुराचे कामही होते.

 

१८९० मध्ये हंगर ( इं. भा. १८९९) ही त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली. उपाशी पोटी राहिलेल्या एका तरुण नॉर्वेजियन लेखकाची ही कथा आहे.ह्या कादंबरीमागे त्याचे स्वतःचे दुःखद अनुभव उभे होते. स्कँडिनेव्हिया-मध्ये ह्या कादंबरीला फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि हामसूनला मोठी कीर्ती मिळाली. तत्कालीन नॉर्वेजियन कादंबऱ्यांतून प्रकटणाऱ्या ठराविक ठशाच्या सामाजिक वास्तववादापासून ही कादंबरी फार दूर गेली होती. हामसूनच्या या कादंबरीने दिलेला नवा, ताजा दृष्टिकोण आणि भावगेय शैली यूरोपीय वाङ्मयीन जगाला स्तिमित करून गेली. व्यक्तिविशिष्टता आणि आत्मपरता ह्यांवर लेखकांनी भर दिला पाहिजे मनाच्या अबोध जीवनाचे आकलन लेखकाने करून घेतले पाहिजे अशी त्याची धारणा होती. तीतूनच त्याने इब्सेन सारख्या नाटककारावर आणि टॉलस्टॉय सारख्या कादंबरीकारावरही टीका केली. त्याचा हा वाङ्मयीन दृष्टिकोण त्याच्या ‘फ्रॉम द अन्कॉन्शस लाइफ ऑफ द माइंडङ्ख ह्या निबंधातून व्यक्त झाला आहे. त्याला अनुसरून त्याच्या हंगर ह्या कादंबरीत तो जगाचे वस्तुनिष्ठ चित्र दाखवीत नाही, तर नायकाच्या नजरेतून सारे काही दाखवितो. त्या नायकाच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेतून वास्तवता रंग आणि आकार धारण करते. फ्यॉडर डॉस्टोव्हस्की ह्या रशियन कादंबरी-काराच्या लेखनातून आणि अबोधाचा शोध घेणाऱ्या काही फ्रॉइडपूर्व विचारवंतांच्या प्रभावातून त्याचा हा वाङ्मयीन दृष्टिकोण आकारालाआला होता.

 

हामसूनच्या कादंबऱ्या सामान्यतः दोन कालखंडांत विभागल्याजातात. पहिल्या कालखंडात हंगर मिस्टरीज (१८९२, इं. भा. १९२७) पॅन (१८९४) आणि व्हिक्टोरिया (१८९८) ह्या कादंबऱ्यांचा अंतर्भाव होतो. ह्या कादंबऱ्यां सामाजिक दृष्ट्या एकाकी असलेल्या व्यक्ती आढळतात तथापि पॅनपासून एक नवा भावगेय सूर आणि निसर्गालादिलेले प्राधान्य ह्या त्याच्या कादंबरीलेखनाच्या नव्या वैशिष्ट्यांचा आरंभ प्रत्ययास येतो.

 

त्याच्या कादंबऱ्यांचा दुसरा कालखंड १९१३ पासून सुरू होतो, असे म्हणता येईल. पारंपरिक तृतीय पुरुषी निवेदन आणि अनेक माणसांच्या जीवनांशी त्याने जोडलेले नाते, आधुनिक संस्कृतीच्या सर्व पैलूंबाबत त्याच्या मनात दृढ झालेली नावड आणि आपल्या मातीशी जीव जडवून जगणारी साधीसुधी माणसे, ही वैशिष्ट्ये ह्या कादंबऱ्यांतून दिसतात. हामसून स्वतः दक्षिण नॉर्वेमधील एका मोठ्या शेतावर आपल्या कुटुंबासह स्थायिक झाला होता पण बऱ्याचदा तो त्या शेतापासून दूर असे. ‘आपल्या भूमीकडे वळाङ्ख असा संदेश मात्र तो आपल्या कादंबऱ्यांमधून देत राहिला.

 

हामसूनच्या उत्तरकालातील सर्वांत प्रसिद्ध कादंबरी म्हणजे ग्रोथ ऑफ द सॉइल (१९१७, इं. भा. १९२०). निसर्गाशी सुसंवाद ठेवून आपल्या शेतासाठी काम करणारा माणूस ह्या कादंबरीत त्याने दाखविला आहे.

 

दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने नॉर्वे व्यापल्यानंतर हामसूनने नाझींना पाठिंबा दिला. युद्ध संपल्यानंतर त्याला तुरुंगात टाकले गेले तथापि त्याचे वय ध्यानात घेऊन त्याच्या विरुद्धचे आरोप मागे घेण्यात आले. नाझींना पाठिंबा दिल्यामुळे त्याची कीर्ती धोक्यात आली तथापि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या लेखनात समीक्षकांना पुन्हा स्वारस्य निर्माण झाले. त्याच्या कादंबऱ्यांची नव्याने भाषांतरे होऊन आंतरराष्ट्रीय वाचकवर्गाला त्या उपलब्ध झाल्या. मॅक्झिम गॉर्की आणि टोमास मान यांसारख्या थोर साहित्यिकांनी त्याची थोरवी मान्य केली. १९२० मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले.

 

ग्रिमस्टाड येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.