ब्यर्नसॉन, ब्यर्नस्टेअर्ने : (८ डिसेंबर १९३२ – २६ एप्रिल १९१०). विख्यात नॉरेवजियन साहित्यिक. जन्म नॉर्वेतील क्व्हिक्न या छोटेखानी डोंगराळ गावी. १८३७ मध्ये ब्यर्नसॉन कुटुंब नेसेत या पॅरिशमध्ये (स्वतंत्र चर्च आणि धर्मोपदेशक असलेला परगण्याचा पोटविभाग) राहावयास आले. अतिशय देखण्या निसर्गाने नटलेल्या या प्रदेशातच ब्यर्नसॉनचे बालपण व्यतीत झाले. मॉल्ड गावच्या माध्यमिक शाळेत असताना गोष्टीवेल्हाळ म्हणून तो पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. विद्यापीठात प्रवेश मिळविण्याच्या उद्देशाने, तत्संबंधीची तयारी करण्यासाठी, मॉल्ड गाव सोडून तो क्रिस्तियाना (सांप्रतचे ऑस्लो) येथे आला आणि १८५२ मध्ये त्याने तेथील विद्यापीठीत प्रवेश मिळविला. मात्र विद्यापीठीय शिक्षण तो पूर्ण करू शकला नाही. १८५५ च्या सुमारास त्याने क्रिस्तियाना येथील अनेकविध वर्तमानपत्रांतून नियमित लेखनास प्रारंभ केला आणि मोर्गेन ब्लादे ह्या नावाच्या एका ख्यातनाम दैनिकाचा नाट्यसमीक्षक म्हणून त्याची नेमणूक झाली. इलस्तेरेस फोल्केब्लाद ह्या नावाच्या एका नियतकालिकातून त्याच्या पहिल्या-वहिल्या कथा प्रसिद्ध झाल्या. कालांतराने या नियतकालिकाचा तो संपादकही बनला. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत त्याने स्वीडनमधील अप्साला या नगरीच्या इतिहासापासून स्फूर्ती घेऊन प्राचीन स्कँडिनेव्हियातील अनेक लोककथा आणि ऐतिहासिक महाकथा (सागा) यांवर आधारित नाटके व कविता लिहिल्या. नॉर्वेजियन कृषिजीवनावर त्याने अनेक उत्तम कथा लिहिल्या त्या सनी हिल्स (१८५७, इं. भा. १९३९), आनें (१८५८, इं. भा. १८९०), हॅपी बॉय (१८६०, इं. भा. १८९६), द फिशर लॅसी (१८६८, इ. भा. १८९६) आणि द ब्रायडल मार्च (१८७३, इ. भा. १८९३) ह्या कथासंग्रहांत अंतर्भूत आहेत. त्याने लिहिलेली गीते ही तर नॉर्वेजियन कृषिजीवनाचा एक अभिजात भागच होऊन बसली आहेत. ‘या वि एल्स्के देत्ते लान्ने’ (इं. अर्थ-येस्, वुई लव्ह धिस कंट्री) हे नॉर्वेचे राष्ट्रगीत ब्यर्नस्टेअर्नेच्याच लेखणीतून उतरले आहे. त्याचे पहिले नाटक मेल्लेम स्लागेन्ने (१८५७, इं. भा. बिट्वीन द बॅटल्स) हे त्याच्या सिन्नोवे सूलबाक्केन ह्या नावाच्या कादंबरीवर आधारलेले होते. या नाटकाचा विलक्षण प्रभाव तत्कालीन नॉर्वेजियन रंगभूमीवर पडला.

तो बर्गेन येथील नॅशनल थीएटर (देन नासुनाल सीने) चा १८५७ ते १८५९ या काळात दिग्दर्शक होता. येथेच त्याचा कॅरॉलिन रायनर्स या अभिनेत्रीशी परिचय झाला व त्याचे रूपांतर अखेर तिच्याशी विवाह होण्यात झाले. साहित्यनिर्मितीबरोबरच तो तत्कालीन उदारमतवादी राजकारणातही सहभागी होत होता आणि बर्गेन येथील एका वर्तमानपत्राचे संपादनही करीत होता. १८५९ साली तो क्रिस्तियाना येथे आला आणि आफ्तेनब्लादे ह्या नावाच्या आजही चालू असलेल्या दैनिकाचे संपादकत्व त्याच्याकडे आले. याच सुमारास त्याने ‘सोसायटी फॉर नॉर्वेजियन कल्चर’ या नावाची संस्था स्थापन केली. त्याचे साहित्यविषयक व राजकीय कार्य एकाच वेळी ऐन जोमाने चालू होते. त्याच्या उदारमतवादी आणि सुधारणावादी लेखांमुळे१८६० मध्ये त्याला आफ्तेनब्लादेचे  संपादकत्व सोडावे लागले आणि नॉर्वेजियन सरकारच्या आर्थिक मदतीने त्याने संपूर्ण यूरोप खंडाचा दौरा केला. ह्या दौऱ्याच्या तीन वर्षांच्या कालावधीत त्याने लोककथा आणे ऐतिहासिक महाकथांवर बेतलेली नाटके लिहिण्याचा प्रपंच सुरूच ठेवला होता. सिगूर्द स्लेंबे (१८६२, इं. भा. सिगूर्द द बॅस्टर्ड, १८८८) या शीर्षकाची नाट्यत्रयी त्याने रोमच्या वास्तव्यात लिहून पुरी केली. मायदेशी परतल्यावर स्थानिक राजकारणात तो पूर्वीपेक्षा जोमाने सामील झाला. १८६५-६७ या काळात मात्र त्याने नॅशनल थीएटरच्या दिग्दर्शनाची सूत्रे पुन्हा हाती घेतली आणि १८३३-७१ या कालावधीत नोशक्त फोल्केब्लादे ह्या नावाच्या नियतकालिकाचे संपादकत्व सांभाळले.

त्याने १८७३-७६ या वर्षांत यूरोपचा प्रवास केला. रोमच्या वास्तव्यात तो डार्विन आणि विख्यात डॅनिश साहित्यिक ⇨गिऑर ब्रांडेस  यांच्या प्रभावाखाली आला. १८७०-८० या दशकाच्या उत्तरार्धात लोककथांकडून त्याने स्त्रियांचे हक्क, लैंगिक समस्या, राजकीय  स्वातंत्र्य यांसारख्या सामाजिक प्रश्नांकडे साहित्यनिर्मितीसाठी आपला मोर्चा वळविला. औपचारिक धर्मसंस्थेविरूद्धचा आपला जीवनविषयक दृष्टीकोण याच सुमारस तो प्रदर्शित करू लागला. ह्याचे प्रत्यंतर त्याच्या रिदाक्तरेन (१८७४, इ. भा. द एडिटर, १९१४), एन फालीत (१८७५, इं. भा., बँकरप्ट, १९१४), काँगेन (१८७७, इं. भा. द किंग, १९१४) आणि ओव्हे एव्हने (भाग १, १८८३, इं. भा. बियाँड आवर पॉवर, १९१३ भाग २, १८९५, इं. भा. बियाँड अवर माइट, १९१४) ह्या त्याच्या नाटकांत तसेच द हेरिटेज ऑफ द कुर्टस (१८८४, इं. भा. १८९३) व गॉड्स वे (१८८९, इं. भा. १८९०) या कादंबऱ्यांतून दिसून येते. तथापि त्यामुळे संवेदनाशील जनतेचे त्याच्यावर टीकेची झोड उठविली आणि त्याच्याविरूद्ध राष्ट्रद्रोहाचा खटला भरावा, अशी मागणी केली. त्यानंतरचे त्याचे जीवन बव्हंशी नॉर्वेबाहेरच व्यतीत झाले. १८८०-९० या दशकाच्या कालावधीत त्याने वैयक्तिक नीतिमत्तेचा प्रकर्षाने पाठपुरावा केला. दलित अल्पसंख्यांक आणि जागतिक शांतता यांसाठी त्याने मनस्वी प्रयत्न् केले. अर्धांगवायूच्या विकाराने गाठले, तरी या प्रयत्‍नांची पराकाष्ठा त्याने सोडली नाही. अखेर पॅरिस येथे तो कालवश झाला. १९०३ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले होते. जागतिक रंगभूमीचे रंगरूपच बदलून टाकणारा जगद्विख्यात नाटककार व ब्यर्नस्टेअर्नेचा व्याही हेन्रिक इब्सेन याना ब्यर्नस्टेअर्नेविषयी ‘त्याचे जीवन हीच एक अक्षर कलाकृती होती’  अशा आशयाचे उद्गार काढले होते.

संदर्भ : 1. Downs, Brian W. Modern Norwegian Literature, 1860-1918, London, 1966.

           2. Larson, Harold B. Bjornstijerne Bjornson : A Study in Norwegian Nationalism, New Yorkm 1954.

रेगे, सदानंद