व्हॅर्‌गेलान, हेन्‍रिक : (१७ जून १८०८- १२ जुलै १८४५). श्रेष्ठ नॉर्वेजियन कवी. क्रिश्चनसँड येथे जन्म. १८१४ मध्ये नॉर्वेची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यात आली. व्हॅरगेलानचे वडील नीकलाय हे त्या घटनासमितीचे सदस्य होते. क्रिस्तिआना विद्यापीठातून त्याने ईश्वर विद्येतली पदवी घेतली. तेथे शिकत असतानाच व्हॅरगेलानचे ‘क्रिएशन ह्यूमॅनिटी अँड मेसाया’ (१८३०. इं.शी.) हे दीर्घ नाट्यकाव्य प्रसिद्ध झाले. विख्यात इंग्रज कवी ⇨ जॉन मिल्टन ह्याच्या पॅराडाइज लॉस्ट ह्याच्या तोडीची काव्यरचना व्हॅरगेलानला अभिप्रेत होती, असे म्हणतात. ‘पोएम्स, फर्स्ट सायकल’ (१८२९, इं. शी.), ‘द स्पॅनिआर्ड’ (१८३३, इं. शी.) आणि ‘द ज्यू’ (१८४२, इं. शी.) ह्या त्याच्या नंतरच्या काही काव्यकृती. ह्यांपैकी ‘पोएम्स, फर्स्ट सायकल’ मधील काही, तसेच इतर काही कवितांचा इंग्रजी अनुवाद (पोएम्स, १९२९) प्रसिद्ध आहे. ‘यान व्हान ह्यूइसूम्स फ्लॉवरपीस’ (१८४०, इं. शी.) व ‘द इंग्लिश पायलट’ (१८४४, इं.शी.) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट काव्यकृती मानल्या जातात.

व्हॅर्‌गेलान कट्टर राष्ट्रवादी व क्रांतिकारक विचारांचा पुरस्कर्ता होता. फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल त्याला आस्था होती. नॉर्वेच्या इतिहासातील डेन्मार्क आणि स्वीडन यांच्या आक्रमक अमलांचे शल्य त्याला बोचत होते. आपल्या देशाने कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक आणि राजकीय दास्यात राहू नये, अशी त्याची राष्ट्रवादी भूमिका होती.  त्यामुळेच संस्कृती ही व्यक्तिनिष्ठ असून डॅनिश परंपरेतील जे मोलाचे असेल ते स्वीकारावे, अशी भूमिका घेणाऱ्या योहान व्हेलहालव्हेन (१८०७-७३) ह्या नॉर्वेजियन कवी आणि समीक्षकाबरोबर त्याचा वाद गाजला. नॉर्वेतील ज्यूंबाबतही त्याला सहानुभूती होती. नॉर्वेमधून ज्यूंना वगळण्याबाबतचा नॉर्वेच्या राज्यघटनेमधील परिच्छेद वगळण्यासाठी त्याने प्रखर लढा दिला.

स्वातंत्र्याची आकांक्षा आणि निसर्गप्रेम ह्या त्याच्या काव्यलेखनामागील दोन महत्त्वाच्या प्रेरणा ठरल्या. तो स्वच्छंदतावादी असला, तरी युरोपातील उद्बोधन युगाच्या (एनलायटनमेंट) ध्येयवादाचा खोल प्रभावही त्याच्यावर होता. नॉर्वेचा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय कवी म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली आणि नॉर्वेच्या स्वातंत्र्याचे तो प्रतीक बनला. भाषेतील शब्दबंबाळपणा, प्रतिमांची अनावश्यक उधळण, विचारातला गोंधळ आणि कवितांवर संस्करण करण्याच्या बाबतीतला बेफिकीरपणा हे त्याच्या काव्यातले दोष म्हणून सांगण्यात येतात परंतु असे असले, तरी एक श्रेष्ठ कवी म्हणूनच त्याला मान्यता लाभलेली आहे.

क्रिस्तिआना येथे तो निधन पावला.

पहा : नॉर्वेजियन साहित्य.

कुलकर्णी अ. र.