हंगेरियन भाषा : हंगेरी या देशाची राष्ट्रभाषा आणि शेजारील देशांमधील काही राज्यांत राजव्यवहाराची भाषा, तसेच यूरोपीय महा-संघाच्या चोवीस मान्यताप्राप्त अधिकृत भाषांपैकी एक. हंगेरी, रूमानिया, स्लोव्हाकिया, सर्बिया, युक्रेन, अमेरिका, कॅनडा, इझ्राएल, ऑस्ट्रिया, क्रोएशिया, स्लोव्हेनिया या देशांमध्ये हंगेरियन भाषक सापडतात. एकट्या हंगेरीत पंचाऐंशी लाख भाषक सापडतात. २०११ मध्ये झालेल्या पाहणीत ९८% हंगेरियन लोकांनी आपला वंश हंगेरियन असल्याचे नोंदविले आणि त्यांतील ९९% लोकांनी हंगेरियन ही आपली मातृभाषा असल्याची नोंद केली.

भाषाकुल आणि इतिहास :उरलअल्ताइक भाषासमूहातील फिनो-उग्रिक या उपकुलातील सर्वांत जास्त भाषक असणारीही भाषा आहे. उरल-अल्ताइक भाषाकुल हे इंडो-यूरोपियन भाषाकुलातील उपकुल नव्हे, तर एक स्वतंत्र कुल म्हणून गणले जाते. त्याचा उगम व्होल्गा नदीतीरी जर्मनीत झाला असावा, असा कयास आहे. अर्थात याबाबतअनेक विवाद आहेत तसेच उरालिक कुलात नेमक्या कोणकोणत्याभाषा अंतर्भूत आहेत, याबाबतही पुरेशी स्पष्टता नाही.

पश्चिम सायबीरियातील हान्ती आणि मानसी या भाषांशी सर्वाधिक साधर्म्य असणारी हंगेरियन भाषा ही उग्रिक आणि फिनो-उग्रिक उप-कुलात गणली जाते. उग्रिक आणि इतर भाषांतील संबंध हा १६७० च्या दशकात प्रस्थापित झाला आणि उग्रिक भाषा या उरालिक कुलातील आहेत हे १७१७ मध्ये स्पष्ट झाले असले, तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत हंगेरियन भाषेचे वर्गीकरण कोणत्या कोटीत करावे, ही मात्र राजकीय वादविवादाची बाब बनून राहिली होती. हंगेरियन हे नाव ओनोगर (म्हणजे दहा बाण किंवा दहा टोळ्या) या मूळ तुर्की टोळीच्या नावावरून आले असावे, असे मानले जाते. त्यावरून हंगेरिन, उन्गारिश, वेनगर्स्की अशीनावे हंगेरियन लोक आणि हंगेरियन भाषा यांना इतर भाषांमध्ये मिळाली आहेत. हंगेरियन भाषेत हंगेरियन भाषेला ‘माग्यार’ असे म्हणतात.

जुन्या हंगेरियन भाषेला तिची रोवास अल्फाबेट नावाची लिपी होती व ती दहाव्या शतकापर्यंत वापरात होती. हंगेरीचा स्टिव्हन पहिला ( इ. स. ९९७ -१०३८) याच्या काळात लॅटिन भाषा आणि लिपी ही राजव्यवहाराची भाषा बनली व ती १८४४ पर्यंत राहिली नंतर हंगेरियन भाषादेखील रोमन लिपीत लिहिली जाऊ लागली. आज जरी लोकव्यवहारात आणि प्रशासकीय कामकाजात विस्तारित रोमन लिपी वापरात असली, तरी काही उत्साही मंडळी आवर्जून जुनी लिपी शिकून तिचा वापर करत आहेत. आधुनिक हंगेरियन लिपीतील स्पेलिंग हे बऱ्यापैकी उच्चारानुगामी आहे. म्हणजेच वाचून आपल्याला जवळचा उच्चार करता येतो.

या भाषेत ऑ, आ, ऍ, ए, इ, ई, उ, ऊ, यु (अग्र), यु (पश्च), ओ, ओ ऽ, ओ (अग्र), ओ (पश्च) असे १४ स्वर आहेत. दीर्घ अगर ऱ्हस्व, संवृत अगर विवृत, अग्र अगर पश्च अशा स्वरांच्या जोड्या जुळतात. स्वरांमध्ये स्वरसादृश्य हा विशेष आढळतो. व्याकरणातील मूळ हंगेरियन शब्दांत अगर अंगात केवळ पश्च स्वर आणि संकुल स्वर किंवा अग्रस्वर आणि संकुल स्वर आढळतात. तीनही एकत्र सापडत नाहीत व अशा प्रकारे मूळ स्वरूपात स्वरसादृश्य आविष्कृत होते. प्रत्ययांमध्ये मात्र अग्र आणि पश्चस्वरांचे पदिमांतरांच्या माध्यमातून स्वरसादृश्य राखले जाते. उदा kert-ész-ünk-kel (बाग-वान-आमच्या-सोबत) आणि fodr-ászunk-kal (न्हावी-आमच्या-सोबत). यात पहिल्या शब्दात kert मधील e मुळे पुढील प्रत्ययात é दिसतो. दुसऱ्या शब्दात मात्र पहिल्या o मुळे पुढील प्रत्ययात á दिसतो, तर पुढे उम्लाऊटरहित u दिसतो आणि पुढे a अशा प्रकारे स्वरसादृश्याच्या फरकामुळे पदिमांतरांच्या जोड्या तयार होतात.

या भाषेत २५ व्यंजने आहेत. ती अशी : प, ब, ट, ड, ट्य, ड्य, क, ग, फ़, व, स, श, ज (‘जर’ मधला), ह, च, च (चटईतला), ज, म, न, न्य, ल, र, ज. व्यंजनांचे द्वित्व जसे क्क, ट्ट यांना द्वित्व न म्हणता व्यंजनाचे दीर्घत्व म्हटले जाते. कारण जीभ दोनदा स्पर्श करत नसूनउच्चार सावकाश सोडला जातो. पदिमसीमेवरील व्यंजनांमध्ये मृदूकरण, कठोरीकरण अशा प्रक्रिया दिसून येतात.

शब्दगत स्वराघात शब्दातील पहिल्या स्वरावर होतो, तर पदबंधगत आघात पहिल्या मुख्य शब्दजातीच्या शब्दावर पडतो.

शब्दसिद्धीच्या पातळीवर हंगेरियन ही आसक्तिप्रवण भाषा आहे. वचन आणि विभक्तीनुसार नामांची रूपे होतात. एकूण अठरा विभक्ती आहेत. यांतील अनेक विभक्ती या क्रियाविशेषणांची कार्ये पार पाडतात. उदा., स्थान, लक्ष्य, उद्भवस्थान इत्यादी. या भाषेतील षष्ठी मोठी विचित्र आहे. यात स्वामित्व असलेल्या वस्तूवर स्वामित्वदर्शक अगर संबंधदर्शक प्रत्यय लागतो आणि पुढे स्वामी जी कुणी व्यक्ती आहे, तिच्या पुरुष आणि संख्येनुसार तद्विशिष्ट प्रत्यय लागतो. क्रियापदे ही पुरुष, वचन, काल आणि अर्थ (विध्यर्थ, आज्ञार्थ इ.) या बाबी दाखवतात.

महत्त्वाचा प्रतिपाद्य भाग-क्रियापद-कोणताही पदबंध असा शब्दक्रम वाक्यात दिसून येतो. महत्त्वाचा प्रतिपाद्य भाग म्हणजे वाक्य कोणाबाबत, कशाबाबत आहे, तो संदर्भानुसार महत्त्वाच्या असणाऱ्या घटकाबाबत असतो तर, क्रियापद हे नेहमी द्वितीय स्थानी येईल. एखादे कर्म अगर कर्तृपद हे अखेरीस जाऊ शकते.

इ. स. अठरावे व एकोणिसावे शतक हा या भाषेतील साहित्याचा उत्कर्षकाळ मानला जातो.

पहा : उरल-अल्ताइक भाषासमूह.

धारुरकर, चिन्मय मालशे, मिलिंद