बाराक्षार चिकित्सा : विशिष्ट पद्धतीने तयार केलेले बारा ऊतक क्षार (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या–पेशींच्या- समूहांत आढळणारी लवणे) ज्या चिकित्सा पद्धतीत रोग बरा करण्याकरिता वापरतात, त्या पद्धतीला ‘बाराक्षार चिकित्सा’ म्हणतात.

 मानवी जीवनाचा आधार पोषण असून ते रक्त घटकांवर अवलंबून असते. रक्त जर शुद्ध व रासायनिक दृष्ट्या संतुलित (समतोल अवस्थेत) असेल आणि ते आवश्यक असणारे सर्व घटक पुरवण्यास समर्थ असेल, तर मानवी रोग होणार नाहीत. हेच तत्त्व मानसिक रोगांनाही लावता येईल. म्हणजेच जर मेंदूचे पोषण उत्तम असेल, तर तो मानसिक संतुलन ठेवण्यास समर्थ असतो आणि मग मानसिक रोग उद्‌भवत नाहीत. आधुनिक मानवी आहारातील दोषांमुळे त्यात जीवनावश्यक अशा काही खनिज क्षारांची कमतरता असते. जर्मनीतील ओल्डेनबर्ग येथील वैद्य डब्ल्यू. फोन शुस्लर (१८२१–९८) यांनी विचारांती असा सिद्धांत मांडला की, सर्व मानवी  रोग एका किंवा अधिक खनिज क्षारांच्या कमतरतेमुळे उद्‌भवतात. शरीरकोशिकांतील खनिज क्षारांचे हे बिघडलेले संतुलन पूर्ववत करण्याकरिती हे क्षार विशिष्ट पद्धतीने तयार करून तोंडाने अत्यल्प मात्रेत दिल्यास ते उत्प्रेरकासारखे (रासायनिक विक्रियेत स्वतः प्रत्यक्ष भाग न घेता तिचा वेग बदलणाऱ्या पदार्थांसारखे) कार्य करतात व मूळ आहारातील नैसर्गिक क्षारांच्या सात्मीकरणास (शरीरात समाविष्ट होण्याच्या क्रियेस) मदत करतात व त्यामुळे रोग बरा होतो. या विचारप्रणालीला ‘शुस्लर सिद्धांत’ म्हणतात आणि त्यावर आधारलेल्या चिकित्सा पद्धतीला ‘शुस्लर चिकित्सा पद्धत’ किंवा ‘जीवरासायनिका चिकित्सा’ अशी नावेही आहेत. हे क्षार ऊतक कोशिकांशी संबंधित असल्यामुळे या पद्धतीला ‘बारा ऊतकीय उपचार’ असेही संबोधितात.

 इतिहास : होमिओपॅथी (समचिकित्सा पद्धती) या उपचार पद्धतीचे आद्यप्रणेते झामूएल हानेमान (१७५५–१८४३) यांनी कोशिकांतर्गत क्षारांची उपचारातील उपयुक्तता प्रथम निदर्शनास आणली. १८४६ मध्ये औषधिविज्ञ कोन्स्टान्टीन हेरिंग यांनी पुढील विचार प्रसिद्ध केला. ‘मानवी शरीराचे सर्व घटक ज्या इंद्रियामध्ये कार्य करतात त्यावर प्रामुख्याने परिणाम करतात, ते जेथे लक्षणे उत्पन्न करतात तेथेच कार्यपूर्तीही करतात’. या सर्व विचारप्रणालीतून काही प्रयोगांती शुस्लर यांनी १८७३ मध्ये आपल्या नव्या पद्धतीसंबंधी एका होमिओपॅथीच्या नियतकालिकात एक लेख प्रसिद्ध केला. पुढे अधिक स्पष्टीकरणार्थ त्याच नियतकालिकातून त्यांची एक लेखमाला प्रसिद्ध झाली. या लेखमालेची इंग्रजी भाषांतरेही नंतर प्रसिद्ध झाली.  या कामामध्ये जे. टी. ओकॉनर, एम्.डोसेटी वॉकर इ.शास्त्रज्ञांचा भाग होता. मृत्यूपूर्वी स्वतः शुस्लर यांनी जर्मन भाषेतील या विषयावरील आपल्या पुस्तिकेची पंचवीसाची आवृत्ती प्रसिद्ध केली होती आणि तिचेही इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झाले होते.

शुस्लर स्वतः पुढे पुढे होमिओपॅथीचा आणि आपल्या पद्धतीचा काही संबंध नसल्याचे सांगत असत पण त्यांच्या पद्धतीची बीजे मूळ होमिओपॅथीशी निगडित होती, यात शंकाच नाही.

मूलभूत सिद्धांत : शरीरातील अवयवांची रचना व जैव शक्ती त्यांच्यातील जैव पदार्थांच्या योग्य परिमाणावर व प्रमाणावर अवलंबून असतात. अकार्बनी घटकांवर विशेषेकरून खनिज क्षारांवर, शरीरातील अवयव व ऊतके यांचे रचनात्मक अखंडत्व व क्रियाशीलता अवलंबून असतात. जिवंत ऊतकातील कोशिकांतर्गत असलेल्या या घटकांची कमतरता पडून कोशिकांतील या क्षारांची  रेणवीय हालचाल बिघडते व रोग उत्पन्न होतो. हे बिघडलेले संतुलन हे खनिज क्षार अत्यल्प मात्रेत तोंडाने दिल्यास प्राकृतिक (सर्वसाधारण परिस्थितिनुरूप) करता येते. ही क्रिया ऊतकांतर्गत रासायनिक आप्तभावामुळे घडते. या कारणामुळे  शुस्लर यांनी या पद्धतीला ‘जैवरासायनिक पद्धती’, असे म्हटले होते.

निरोगी शरीर अथवा स्वास्थ्य आणि विकृती अथवा रोग :  जोपर्यंत अन्नग्रहण व जलपानाद्वारे रक्तांतील (ऊतक पुरवठ्यामुळे कमी झालेले) पोषणज पदार्थ योग्य प्रमाणात पूर्ववत केले जातात तोपर्यंत शरीर निरोगी राहते. ही क्रिया चालू असेल, तरच जुन्या कोशिकांचा नाश आणि नव्या कोशिकांचे उत्पादन चालू असते. याशिवाय त्याज्य पदार्थांचे उत्सर्जनही होत असते.विकृतीमध्ये ऊतकातील अकार्बनी क्षारांपैकी कोणत्या तरी क्षाराच्या रेणवीय हालचालीत बिघाड उत्पन्न होतो. या क्षाराची अत्यल्प मात्रा कोशिकांतील हा बिघाड घालवते म्हणजेत रोग बरा करते.

 प्रत्येक कोशिकेमध्ये काही पदार्थ अवशोषण्याची व काही पदार्थ बाहेर टाकण्याची क्षमता असते. कोशिकेच्या या गुणधर्मातील बिघाडामुळे रोग उत्पन्न होतो. अकार्बनी क्षारांची कमतरता कोशिकेतील या बिघाडामुळे किंवा अप्रत्यक्ष रीत्या आहारातीलच कमतरतेमुळे उद्‌भवू शकते. जर कोशिकाच बिघडली असेल, तर क्षाराची मात्रा देताना औषध अधिक घोटलेले म्हणजेच विरल केलेले असावे लागते. या उपचार पद्धतीत क्षारांची कमतरता प्रत्यक्ष पुरवठ्याने भरून काढण्याचा हेतू असतो.

शरीरात विविध रासायनिक संयुगे ज्या निरनिराळ्या जागी विखुरलेली असतात, ते भाग कोष्टक क्र. १ मध्ये दर्शविले आहेत.


कोष्टक क्र. १. विविध रासायनिक संयुगे व त्यांच्या शरीरातील जागा 

संयुग 

शरीर भाग 

जल 

सर्व शरीरात, सर्व ऊतकांत 

कारबॉनिक अम्ल 

रक्त, मूत्र व घाम 

कार्बोनेट ऑफ सोडियम 

रक्तद्रव, लाळ, घाम, पित्त, अश्रू व 

 

श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) 

कार्बोनेट ऑफ लाइम 

उपास्थी (कूर्चा), अस्थी व दात 

फॉस्फेट ऑफ लाइम 

कार्बोनेट ऑफ लाइम असते त्या 

 

सर्व ऊतकांत 

फॉस्फेट ऑफ आयर्न 

रक्त, जठररस व मूत्र 

क्लोराइड ऑफ सोडियम 

अस्थी, उपास्थी, रक्त,स्नायू, मेंदू, 

 

तंत्रिका (मज्जा), शरीरातील सर्व 

 

द्रव घन भाग 

क्लोराइड ऑफ पोटॅशियम 

रक्त, मेंदू, स्नायू, जठररस,लाळ 

क्लोराइड ऑफ कॅल्शियम 

जठररस 

सल्फेट ऑफ पोटॅशियम 

जठररस, उपास्थी व मूत्र

सल्फेट ऑफ सोडियम

पित्त, उपास्थी व घाम

सल्फेट ऑफ लाइम

त्वचा, पित्त व केस

ऑक्साइड ऑफ आयर्न

रक्त, त्वचा व केस

क्लोराइड ऑफ कॅल्शियम

अस्थी व दात

फॉस्फेट ऑफ पोटॅशियम

रक्त, मेंदू, तंत्रिका व स्नायू

फॉस्फेट ऑफ मॅग्नेशियम

मेंदू, तंत्रिका, स्नायू, अस्थी व दात

फॉस्फेट ऑफ सोडियम

मेंदू, रक्त, स्नायू व तंत्रिका

सिलिका

संयोजी (जोडणारी) ऊतके, त्वचा,

 

नखे व केस


शुस्लर यांनी आपल्या चिकित्सा पद्धतीत वरील संयुगांपैकी बारा संयुगे (क्षार) वापरली. त्यांची या चिकित्सा पद्धतीतील नावे व संक्षिप्त नावे कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहेत.

कोष्टक क्र. २ बाराक्षार चिकित्सा पद्धतीतील संयुगांचीपूर्ण व संक्षिप्त नावे.

संयुगे

मूळ पदार्थ

पूर्ण नाव

संक्षिप्त नावे

फॉस्फेटे

लाइम

कॅल्शियम फॉस्फोरिका

कॅल. फॉस.

 

आयर्न

फेरम फॉस्फोरिकम

फेरम फॉस.

पोटॅश

काली फॉस्फोरिकम

काली फॉस.

सोडा

नेट्रम फॉस्फोरिकम

नेट्रमफॉस.

मॅग्नेशिया

मॅग्नेशियम फॉस्फोरिका

मॅग. फॉस.

क्लोराइडे

पोटॅश

काली म्युरिॲटिकम

काली मूर.

सोडा

नेट्रम म्युरिॲटिकम

नेट्रम मूर.

सल्फेटे

लाइम

कॅल्शियम सल्फ्यूरिका

कॅल सल्फ.

 

सोडा

नेट्रम सल्फ्यूरिकम

नेट्रम सल्फ.

पोटॅश

काली सल्फ्यूरिकम

काली सल्फ.

फ्ल्युओ राइड

लाइम

कॅल्शियम फ्ल्युओरिका

कॅल. फ्ल्युओर.

सिलिका (शुद्ध)

सिलिका

सिलिका

सिलिका

औषधांची शक्ती अथवा परिणामकारकता : बाराक्षार औषधांची परिणामकारकता,ती तयार करते वेळी घोटण्याच्या अथवा चूर्णीकरण करण्याच्या श्रेणीवर अवलंबून असते. औषध परिणामकारक होण्याकरिता ते संपूर्ण व काही काळपर्यंत सतत घोटणे आवश्यक असते. या कारणामुळे ज्या उत्पादकांकडे ही क्रिया खात्रीपूर्वक केली जाते, त्यांचीच औषधे वापरणे हितावह असते. योग्य औषध असूनही त्यावर योग्य क्रिया केलेली नसल्यास ते परिणामशून्य ठरते.

क्षाराचा एक भाग व नऊ भाग दुग्धशर्करा (लॅक्टोज) यांचे मिश्रण विद्युत् चलित खलन यंत्रात घालून दोन ते तीन तासांपर्यंत उत्तम प्रकारे घोटतात. अशा रीतीने तयार झालेल्या मिश्रणाची परिणामकारकता १ × या आकड्याने दर्शवितात. या मिश्रणाचा एक भाग नऊ भाग दुग्धशर्करा यांचे मिश्रण पुन्हा दोन ते तीन तासांपर्यंत वरीलप्रमाणे घोटल्यानंतर तयार होणाऱ्या मिश्रणाची परिणामकारकता २ X होते. या प्रकारे सर्व क्रिया पुन्हा पुन्हा करीत गेल्यास परिणामकारकता ६ X ते १२ X किंवा त्याहूनही अधिक वाढविता येते. सर्वसाधारणपणे ६ X परिणामकारकतेची औषधे वापरतात. शुस्लर स्वतः फेरम फॉस, सिलिका व कॅल. फ्ल्युओर ही  औषधे १२ X परिणामकारकतेची व इतर ६ X परिणामकारकतेची वापरीत. घरगुती वापराकरिता ३ X ते १२ X परिणामकारकतेची औषधे चांगली. शुस्लर औषधाचे वाटाण्याच्या आकारमानाइतके चूर्ण मात्रा म्हणून कोरडेच जिभेवर ठेवून किंवा चमचाभर पाण्यात विरघळवून देत. सर्वसाधारण चिकित्सक तीव्र रोगात दर तासास आणि गंभीर व वेदनामय रोगात दर दहा ते पंधरा मिनिटांनी २ ते ४ ग्रेन (१ ग्रेन = ०.०६५ ग्रॅम) मात्रा देतात. या औषधांच्या २ ग्रेन वजनाच्या गोळ्याही मिळतात. या उपचार पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. या पद्धतीतील औषधे संपूर्णपणे निर्धोक आहेत. लहान मुले तोंडे वेडीवाकडी न करता स्वखुशीने औषधे घेतात. सुशिक्षित कुटुंबातून ती घरगुती उपचार म्हणून वापरता येतात. विशेषप्रसंगी या पद्धतीच्या तज्ञांचा सल्ला घेणे हितावह असते. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना ही औषधे सहज परवडणारी आहेत.

 शुस्लर यांनी स्वतः होमिओपॅथीचे शिक्षण घेतलेले होते, तरी बाराक्षार चिकित्सा व होमिओपॅथी यांत फरक असल्याचे ते प्रतिपादन करीत असत. पहिली पद्धत अप्रत्यक्ष रीत्या क्रियाशील असते, तर दुसरी प्रत्यक्ष रीत्या म्हणजे उणीव भरून काढून क्रियाशील बनते.

 पहा : होमिओपॅथी.

 संदर्भ : 1. Boericke, W. Dewey, W. A. The Twelve Tissue Remedies of Schussler,Calcutta, 1960.

            2. Powell, E. F. W. Bio-chemic Prescriber, Wayside (Surrey, England), 1960.

            3. Schannon, S. F. A Complete Repertory  of Tissue Remedies of Schussler,Calcutta, 1961.

            ४. भादुरी, एन्. सी. दि बृहद् बायो कैमिक चिकित्सा निदान, मोरादाबाद, १९३८.

भालेराव, य. त्र्यं.