श्व्हेंडेनर, झीमोन : (१० फेबुवारी १८२९ – २७ मे १९१९). स्विस वनस्पतिवैज्ञानिक. त्यांचा जन्म सेंट गेलेनमधील ब्युक्स येथे झाला. त्यांनी१८५६ मध्ये झुरिक विदयापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. ते १८६० मध्ये म्यूनिक विदयापीठात वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक,१८६७ मध्ये बाझेल येथे शास्त्रीय उद्यानाचे संचालक व प्राध्यापक आणि१८७७ मध्ये ट्युबिंगेन विदयापीठात प्राध्यापक झाले. ते १८७८ – १९१० मध्ये बर्लिन विदयापीठात प्राध्यापक होते.

 

त्यांनी १८६७ मध्ये प्रथमच असा दृष्टिकोन मांडला की, ⇨ शैवाक (दगडफूल) ही वनस्पती ⇨ शैवल व ⇨ कवक यांच्या सहजीवनाने तयार झालेली संमिश्र वनस्पती आहे. ते पुढील कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. १८७४ मध्ये त्यांनी वनस्पतीच्या शरीरातील आधारभूत घटकांच्या संबंधात शारीर (शरीररचनाशास्त्र) या विषयाचे क्रियावैज्ञानिक दृष्टीने संशोधन केले. १८८१ मध्ये त्यांनी यांत्रिकीय दृष्टीने वल्करंध्राच्या (सालीच्या बाह्य स्तरातील सूक्ष्म छिद्रांच्या ( संरचनेचा अभ्यास केला त्यांनी वनस्पती ऊतक (समान रचना व कार्य असणारे कोशिकासमूह) व पाने यांच्या विकास व रचनेसंबंधी यांत्रिकीय सिद्धांत मांडला. १८९३ मध्ये त्यांनी खोडवलयनी (खोडाला विळखे घालून वाढणाऱ्या) वनस्पती व कोशिकावरणाची स्थितीस्थापकता यांवर केलेले कार्य महत्वाचे आहे.

 

Vorlesungen uber Mechanidche Probleme der Botanik (१९०८) हा गंथ त्यांनी प्रसिद्ध केला.

 

जमदाडे, ज. वि.