बोयरा : उथळ पाण्याखाली दडलेला धोका दर्शविण्यासाठी व उथळ पाण्यात जहाजांना मार्गनिर्देशन करण्यासाठी समुद्रात तरंगत ठेवलेल्या पिपासारख्या वस्तूला बोयरा म्हणतात. जहाज योग्य सुरक्षित मार्गाने बंदरात आणण्यास बोयऱ्यांचा उपयोग होतो. सर्व जहाजांवर बोयऱ्यांची स्थाने व त्यांचे प्रकार दर्शविणारे तक्ते ठेवलेले असतात.

बोयऱ्याच्या तळाला साखळदंड जोडलेला असून त्या साखळदंडाचे दुसरे टोक समुद्राच्या तळाला अवजड काँक्रीटने भक्कम रोवलेले असते. बोयरे वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगांचे असून त्यांच्यावर त्यांचा प्रकार दर्शविणारी खूण पटविणारी निरनिराळी चिन्हे असतात. समुद्राच्या पाण्याला प्रवाह असेल, तर जहाज बांधून ठेवण्यासाठीही काही बोयऱ्यांचा उपयोग होतो. निरनिराळ्या सूचना देण्यासाठीही निरनिराळ्या प्रकारचे व एकाच प्रकारच्या अनेक बोयऱ्यांपैकी वेगवेगळे बोयरे एकमेकांपासून ओळखता यावेत म्हणून त्यांच्या माथ्यावर विशिष्ट चिन्हे अथवा अंक बसविलेले असतात. दिवसा बोयरे दिसू शकतात आणि त्यांच्या स्वरुपावरुन व चिन्हावरुन ते ओळखू येतात पण रात्रीच्या वेळीही ते दिसावेत यासाठी त्यांच्यावर दिवे बसविलेले असतात. या दिव्यांचा प्रकाश सतत टिकणारा नसून खंडित व काही नियमित वेळाने चकमकणारा असतो आणि त्यामुळे प्रकाशाच्या चमकेच्या पुनरावृत्तीच्या अवधीवरुन ते इतर सामान्य दिव्याहून वेगळे असल्याचे कळते व बोयऱ्यांची खूणही पटते. वेगवेगळ्या रंगांचेही दिवे वापरले जातात व प्रकाशाच्या रंगावरुनही बोयऱ्यांची खूण पटते.

आ. १. बोयऱ्यांचे प्रकार : (१) दिवा व शिटीयुक्त, (२) दिवा व घंटायुक्त, (३) सोटासारखा, (४) साधा दिवायुक्त, (५) साधा शिटीयुक्त, (६) साधा घंटायुक्त, (७) कोनाकार, (८) रुंद दंडगोलाकार व सपाट माथ्याचा

 


जहाजे जगभर संचार करणारी असल्यामुळे बोयऱ्यांची सांकेतिक चिन्हे सर्वत्र एकाच प्रकारची असावीत अशी अपेक्षा असणे साहजिक आहे परंतु भौगोलिक परिस्थिती भिन्न असल्यामुळे पार्श्विक व दिशादर्शक अशा दोन प्रकारच्या संकेत पद्धती वापराव्या लागतात. पार्श्विक पद्धतीत बोयऱ्यांनी जहाज जाण्याचा मार्ग दर्शविला जातो आणि भरतीच्या प्रवाहाबरोबर जात असताना विवक्षित बाजू दाखविणारा बोयरा त्या बाजूस ठेवून जावयाचे असते.

 

आ. २. दिवा, घंटा व रडार परावर्तकयुक्त बोयरा : (१) नांगराची साखळी, (२) बोयऱ्याची पिसासारखी काया, (३) विद्युत् घटमाला, (४) घंटा, (५) रडार परावर्तक, (६) विद्युत् दिवा.

ही पद्धत पुष्कळशा क्षेत्रांत उपयोगी पडते परंतु समुद्राच्या खाड्यांत भरतीच्या प्रवाहाची दिशा जशी निश्चित असते तशी ती सामुद्रधुन्यांत नसते व बाल्टिकसारख्या पुष्कळ बेटे असलेल्या समुद्रात ही पद्धत उपयोगी पडत नाही. तेथे बोयऱ्यांपासून धोकादायक स्थानाची दिशा दाखविण्याची दिशादर्शक पद्धत वापरतात आणि बोयऱ्याच्या चिन्हावरुन व रात्रीच्या वेळी त्याच्या दिव्याच्या खंडित प्रकाशाच्या रंगावरून व चमकेच्या संख्येवरुन दिशा कळते. वायव्य ते ईशान्य म्हणजे स्थूलमानाने उत्तर दिशेकडील धोका दर्शविण्यासाठी पांढरी विषम चमक, पूर्वेकडील धोक्यासाठी लाल सम चमक, दक्षिणेसाठी लाल पण विषम चमक व पश्चिमेसाठी पांढरी सम चमक वापरली जाते


एखादे जहाज प्रवास करीत असताना वरील दोहोंपैकी एखादी पद्धत असलेला प्रदेश संपून दुसऱ्या पद्धतीचा प्रदेश कोठे सुरु होत आहे, हे विशिष्ट प्रकारच्या बोयऱ्यांनी (व प्रकाशाने) दर्शविले जाते. दिवसा वापरल्या जाणाऱ्या बोयऱ्यांपैकी लाल रंगाचे (अथवा लाल-पांढऱ्या चौकडीचे) बोयरे जहाज बंदरात शिरतानाच्या मार्गाची उजवी बाजू दर्शवितात. काळ्या रंगाचे (अथवा काळ्या-पांढऱ्या चौकडीचे) बोयरे डावी बाजू सूचित करतात. काळे व पांढरे (अथवा तांबडे व पांढरे) उभे पट्टे असलेले मध्यमार्ग दाखवितात. आडवे तांबडे व काळे पट्टे (मध्ये अरुंद पांढरा पट्टा) असलेला बोयरा धोक्याचे स्थान दर्शवितो. पांढरा बोयरा किनाऱ्यापासून किती अंतरावर सुरक्षितपणे जहाजाला नांगर टाकता येईल हे दाखवितो. यांखेरीज विशिष्ट सूचना देणाऱ्या बोयऱ्यांत संसर्गजन्य रोगाच्या परीक्षा स्थळाचे स्थान दर्शविणारा पिवळ्या रंगाचा बोयरा, गोदीतील गाळ टाकण्याचे स्थान दर्शविणारा काळ्यावर पिवळा आडवा पट्टा असलेला बोयरा, तळात अवजड काँक्रीट असून कडीस जहाज बांधण्याची सूचना देणारा व हिरवे-पांढरे-काळे पट्टे वा चौकडी असलेला नौबंध बोयरा, हवाई नौका बांधण्याचा रबराचा थर दिलेला लाल रंगाचा बोयरा, हिरव्या रंगात W हे अक्षर लिहिलेला व खाली बुडालेले जहाज असल्याचे दर्शविणारा बोयरा अशा विविध बोयऱ्यांचा समावेश होतो.

उभे सोटासारखे बोयरे लाकडी वा धातूच्या पोकळ खांबाचे बनविलेले असून ते उंच व निमुळते असतात. रुंद दंडगोलाकार बोयरे धातूच्या पिपासारख्या व सपाट माथ्याच्या पात्रांचे केलेले असतात. काही कोनाकार तर काही गोलाकार बोयरेही धातूचे असतात. सामान्यतः रुंद दंडगोलाकार बोयऱ्यांचा रंग काळा व कोनाकार बोयऱ्यांचा रंग तांबडा असतो पण काही वेळा दोहोंवरही उभे वा आडवे पट्टे असतात. काळ्या बोयऱ्यांवर विषम आकडा आणि तांबड्या बोयऱ्यांवर सम आकडा लिहिलेला असतो.

दिवे बसविलेल्या बोयऱ्यांवरील दिवे संपीडित (दाबाखालील) ॲसिटिलीन वा प्रोपेन वायूवर अथवा विद्युत् घटमालेवर चालतात. विद्युत् घटमाला सु. १८ महिने पुरते. हे दिवे दिवस-रात्र सतत चालू असतात. दररोज ते बंद करण्यापेक्षा ते सतत चालू ठेवणेच आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असते. काही बोयऱ्यांवर शिटी, थाळी अथवा घंटा यांच्या आवाजाद्वारे सूचना देण्याची सोय असते. सामान्यतः लाटांच्या गतीमुळे बोयरा पुढे-मागे उचलला जाऊन घंटा वाजते. शिटी अथवा घंटा बसविलेले काही बोयरे विद्युत् घटमालेवर वा संपीडित वायूवर चालतात. असे बोयरे जवळजवळ लाटारहित असलेल्या शांत पाण्यातही उपयुक्त असतात.

 

जेथे दाट धुके असण्याचा संभव असतो तेथे दिवा असलेल्या बोयऱ्यापेक्षा ध्वनी संदेश देणारे बोयरे अधिक उपयुक्त ठरतात. या परिस्थितीत जहाजावरील ⇨ रडारचाही चांगला उपयोग होतो. याकरिता बोयऱ्यावर वेगवेगळ्या आकाराचे रडार तरंग परावर्तक बसविलेले असतात. अशा बोयऱ्यांची रचना आ.२ मध्ये दाखविली आहे.

काही खास प्रकारचे बोयरे विविध कामांकरिता वापरले जातात. उदा., नौबंध बोयरा मार्गनिर्देशनात साहाय्यक नसून त्या ठिकाणी जहाजे बांधण्याकरिता त्याचा उपयोग केला जातो. हे बोयरे कायम स्वरुपाच्या नांगराच्या गटाला जड साखळीने बांधलेले असल्यामुळे ते नांगर व जहाज यांना जोडणारा एक दुवा ठरतात. गर्दी असलेल्या बंदरात नौबंध बोयऱ्यामुळे जहाजाला कमी जागा लागते कारण नांगरलेल्या जहाजापेक्षा नौबंध बोयऱ्याला बांधलेल्या जहाजाला वारा व भरती-ओहोटी यांच्याबरोबर हेलकावे खाण्यास कमी जागा लागते. असे बोयरे युद्धनौकांकरिता बऱ्याचदा वापरतात कारण बंदरातून बाहेर पडण्यास वा टाकलेला नांगर ओढून घेण्यापेक्षा नौबंध बोयऱ्यापासून जहाज लवकर सोडवून घेता येते. वातावरणवैज्ञानिक व महासागरवैज्ञानिक बोयरे हे सामान्यतः जेथे जहाजांची फारशी वर्दळ नसते, तेथे व सु. ३,६०० मी. खोलीपर्यंतच्या पाण्यावर स्थापलेले असतात. हे बोयरे ठराविक कालावधीने वातावरणीय दाब, हवेचे व पाण्याचे तापमान, वाऱ्याचा जोर, लाटांची उंची इ. वैज्ञानिक माहिती बोयऱ्यावरील रेडिओ प्रेषकाद्वारे (रेडिओ तरंग प्रेषित करणाऱ्या साधनाद्वारे) जमिनीवरील केंद्राकडे पाठवितात. जहाजावरील रेडिओ ग्रहणीच्या (रेडिओ तरंग ग्रहण करणाऱ्या साधनाच्या) साहाय्याने अशा बोयऱ्यावरुन जहाजाचे समुद्रावरील स्थानही निश्चित करता येते.

जावडेकर, व. वि.