नौका : पाण्याच्या पृष्ठभागावरून जाण्यासाठी तयार केलेले, सहज तरंगणारे व माणसाच्या अंगमेहेनतीने (वल्ह्यांचा किंवा लांब बांबूचा उपयोग करून) किंवा शिडाने चालणारे लहान वाहन. नौकेचा उपयोग करमणुकीकरिता जलविहार करणे, व्यापारी माल आणि उतारू वाहून नेणे, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची फुले वा फळे गोळा करणे, मासे धरणे पाण्याच्या आश्रयाने राहणाऱ्या पक्ष्यांची शिकार करणे इ. विविध कामांकरिता करण्यात येतो. नद्या, सरोवरे, कालवे, समुद्र अशा निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशांनी वापरावयाच्या व उपलब्ध स्थानिक कच्च्या मालापासून (उदा., जनावरांची कातडी, लाकडाचे ओंडके वा फळ्या इ.) तयार केलेल्या नौका प्राचीन काळापासून विविध देशांत वापरात आहेत. सुरुवातीच्या नौकांचा माणसे व माल वाहून नेण्यासाठी तसेच मासेमारीसाठी उपयोग केला जाई. त्यांचा वापर प्रथमतः नद्या, खाड्या, सरोवरे यांत केला गेला आणि नंतर हळूहळू चांगल्या हवामानात समुद्रातही होऊ लागला. प्रस्तुत नोंदीत फक्त वल्ह्यांनी अथवा शिडांनी चालवावयाच्या लहान नौकांचे वर्णन दिलेले असून यांत्रिक शक्तीवर चालणा‍ऱ्या नौकांविषयी ‘मोटारबोट’ या नोंदीत, मोठ्या मच्छीमारी नौकासंबंधी ‘मच्छीमारी नौका’ या नोंदीत व शिडाच्या किंवा यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या मोठ्या जहाजांविषयी ‘जहाज’ या नोदींत माहिती दिली आहे.

इतिहास व विकास : जगातील पहिली नौका कोणी व कधी तयार केली हे समजण्यास काहीच मार्ग नाही. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे नोआने बांधलेली नौका (आर्क) ही सर्वांत पुरातन नौका समजली जाते. हिंदूंच्या शतपथ ब्राह्मण, महाभारत इ. धार्मिक ग्रंथांत मनूने जलप्रलय काळी बांधलेल्या नौकेचा उल्लेख आहे. मानवाने नद्या, नाले इ. नैसर्गिक अडथळे ओलांडण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगण्यास मदत करू शकणाऱ्या एकत्रित बांधलेल्या वस्तू किंवा पाण्यावर तरंगणारा एखादा लाकडाचा ओंडका यांचा उपयोग प्रथमतः केला असावा आणि त्यापासूनच नौकांचा उदय झालेला असावा, असा अंदाज करण्यात आलेला आहे. मोठ्या ओंडक्यावर दोन माणसे दोन्हीकडे पाय सोडून बसली, तरी तो बुडत नाही पण त्यावरचा भार असमतोल झाला, तर मात्र तर फिरून किंवा कलंडून बुडण्याचा धोका संभवतो.

नौकांसंबंधीचा पूर्वेतिहास जहाजांच्या इतिहासाच्या मानाने फारसा उपलब्ध नाही. कारण इतिहासपूर्व कालीन चित्रांत वा शिल्पांत त्यांचे जहाजांइतके काळजीपूर्वक चित्रण केलेले आढळत नाही. नौकांचा विकास कशा तऱ्हेने झाला असावा, हा एक केवळ तर्काचाच विषय आहे. तथापि दूरदूरच्या व एकमेकांशी काहीही संबंध न आलेल्या लोकांत नौकांविषयी जवळजवळ सारख्याच कल्पना कशा उद्‌भवल्या हे एक विलक्षण कोडेच आहे. झाडाचे खोड वा ओंडका आतील बाजूने तीक्ष्ण हत्याराने कोरून काढून अथवा जाळून व बाहेरून आकार देण्यासाठी तासून तयार केलेली जोडरहित नौका आणि काही ओंडके आडवे एकत्र बांधून तयार केलेला तराफा यांपैकी कोणता प्रकार प्रथम प्रचारात आला यासंबंधी मतभेद आहेत. आफ्रिका, स्कँडिनेव्हिया, दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया अशा दूरदूरच्या प्रदेशांत कोरलेल्या नौका प्रचलित होत्या व काही ठिकाणी अद्यापही त्या आढळून येतात. झाडांच्या फांद्यांवर सालीचे तुकडे ताणून बांधून तयार केलेली नौका तसेच जनावराच्या कातड्यापासून केलेली नौका हे प्रकार बऱ्याच कालावधीनंतर प्रचारात आले आसावेत.

टायग्रीस नदी पार करण्यासाठी इ. स. पू. ७०० च्या सुमारास हलक्या बोरूच्या सांगाड्यावर जनावराच्या कातड्याची खोळ घालून तिचे सांधे शिवून पाण्यावर तरंगणारी व फुगलेल्या पिशवीसारखी दिसणारी नौका वापरीत असत, असा उल्लेख आढळतो. तिबेटातील काही भटक्या जमाती अजूनही जनावराच्या कातड्यांचा अशा तऱ्हेने उपयोग करतात.

ईजिप्तमध्ये पपायरस (सायपेरस पपायरस) या वेतासारख्या वनस्पतीपासून तयार केलेल्या लांबट टोपलीसारख्या नौका नाईल नदीवर फार पुरातन काळापासून प्रचलित आहेत. या नौकांच्या स्वरूपात फारसा बदल झालेला नाही. पपायरस ही वनस्पती नाजूक आणि कमकुवत असल्याने या नौका थोडे महिनेच टिकू शकतात. दक्षिण यूरोपातील काही देशांत ही टोपलीसारखी नौका साधारण वर्तुळाकार करतात व आतून डांबर लावून ती जलाभेद्य करतात.

कोरलेल्या नौका तयार करण्यासाठी पुष्कळ श्रम पडतात व बरेचसे लाकूड वाया जाते. कोकणात व द. भारतात अशा नौका अजूनही तयार करण्यात येतात. कोरलेली नौका तराफ्यापेक्षा वेगाच्या बाबतीत चांगली असते व थोड्याफार प्रमाणात जलाभेद्य असल्याने आतून कोरडीही राहू शकते परंतु माल वाहून नेण्याची क्षमता व समतोल या बाबतींत ती कमी प्रतीची असते. मोठे खोड उपलब्ध होण्यालाही मर्यादा असल्याने या नौकेत सुधारणा करणे अवघड झाले होते. नौकेची नाळ व पिछाडीच्या भागाचा आकार, बाजूंचा फुगीरपणा, फळ्यांनी बांधून बाजूंची उंची वाढविणे इत्यादींमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांमुळे ‘कनू’ या नौकेचा उदय झाला. कनू ही कोरलेली नौका व आधुनिक यांच्या मधली पायरी आहे, असे मानण्यात येते.

खोदलेल्या नौका अरुंद व लहान असत आणि त्यामुळे वारा किंवा लाटा यांचा मारा थोडा जरी जास्त झाला, तरी त्या उलटत असत. अशा उलटण्यामुळे वारंवार अपघात होऊ लागल्याने त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न होऊन त्यातूनच उलांडी नौकेचा शोध लागला. लांबट नौकेलाच तिच्या मध्यापासून समान अंतरावर लांबीशी काटकोनात दोन दांड्या घट्ट बांधून त्यांच्या टोकाशी एक लाकडाचा ओंडका पाण्यात तरंगत राहील अशा प्रकारे बांधण्यात येऊ लागला. या ओंडक्याचा आकार दोन्ही टोकांना निंमुळता केलेला असल्यामुळे पाणी कापताना रोध कमी होतो तसेच या ओंडक्यामुळे नौका उलटीही होत नाही. अशा प्रकारच्या नौकेस ‘चौक’ किंवा ‘उलांडी’ बांधलेली नौका म्हणतात. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, श्रीलंकेत तसेच आशियात इतरत्रही लहान मच्छीमारी नौकांकरिता या पद्धतीचा अवलंब करतात. कोकणपट्टीत उलांडीकरिता पांगाऱ्याच्या जून खोडाचा वापर करतात आणि ते कुजू नये म्हणून त्यावर डांबराचे थर देतात. सुरक्षिततेकरिता दोन नौका किंवा तराफे एकत्र जोडण्याची पद्धतही असून साधारणतः त्यांचा नद्या, अरुंद खाड्या, तलाव इ. ठिकाणी उपयोग करतात. आसाम, बिहार व उत्तर प्रदेश येथे अशा जोड नौकांचा वा तराफ्यांचा मालमोटारी, गुरेढोरे आणि इतर वाहतुकीसाठी अजूनही वापर करण्यात येतो.

तराफा चालविण्यासाठी नौकेच्या मानाने पुष्कळ जास्त श्रम करावे लागतात. उथळ पाण्यातून जाताना तराफा चालविणारा नावाडी तराफ्यावर उभा राहून एक लांब आणि मजबूत कळक अथवा वासा हातात तिरपा धरतो आणि त्याचे टोक पाण्यात सोडून तळाला रेटतो. या रेट्याच्या प्रतिक्रियेने सबंध तराफा टेक्यापासून दूर सरकविला जातो. खोल पाण्यातून जाताना हा तराफा वल्ह्यांच्या साहाय्याने चालविता येतो. भारतात कोरोमंडल किनाऱ्यावर तसेच दक्षिणेकडे श्रीलंकेत स्थानिक झाडाच्या ओंडक्यांपासून बनविलेले तराफे फार प्राचीन काळापासून वापरात आहेत. या तराफ्यांना ‘कॅटमरान’ म्हणतात आणि ते तीन व पाच ओंडके एकत्र बांधून बनवितात. मधला ओंडका सर्वांत लांब असून तो तराफाच्या पुढच्या भागात नाळेसारखा दिसतो.


सुरक्षिततेसाठी या तराफ्यांना उलांडी बांधण्याची पद्धतही आहे. कृष्णा व गोदावरी या नद्यांवर एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी तराफे वापरीत असत. आफ्रिकेतील ब्युडुमास जमातीचे लोक अँबॅच झाडाचे ओंडके जोडून एकावर एक रचलेल्या दोन किंवा अधिक थरांचा तराफा बनवितात व हातापायांचा वल्ह्यासारखा उपयोग करतात. असे तराफे श्वेत नाईलवर अद्यापही वापरात आहेत. तराफ्यासाठी द. अमेरिकेत बालसाचे ओंडके व ब्रह्मदेशात सागवानी ओंडके वापरतात. फिजी बेटांमध्ये बांबूंचा तराफा शेकडो वर्षे वापरात आहे पण हा तराफा समुद्रावर वापरण्यास अयोग्य असून त्याचा उपयोग केवळ सरोवरांतच करतात. इमारती लाकूड वाहून नेण्यासाठी तराफ्याचा उपयोग उ. अमेरिकेतील नद्यांवर आणि यूरोपातील डॅन्यूब नदीवर तसेच गंगा व ब्रह्मपुत्रेवर अजूनही केला जातो.

तराफा आणि कोरलेली नौका यांचे उपयुक्त गुणधर्म एकत्र करण्याच्या प्रयत्नातून सध्याच्या अनेक प्रकारच्या नौकांचा उदय झालेला आहे. लाकडाचे ओंडके कापून सपाट करून लाकडी खिळ्यांनी जोडून सपाट तळावर सामान ठेवण्यासाठी एक चौथरा तयार करण्याच्या दिशेने तराफ्याचा विकास झाला. अशा तराफ्यांतूनच पंट, सँपॅन इ. सपाट तळाच्या नौका उदयास आल्या.

तराफ्यांचा तळभाग सपाट व मजबूत करण्याच्या पद्धतीचा शोध लागल्यानंतर त्याच्या बाजू फळ्यांनी बांधून त त्यांना आडव्या पट्ट्या मारून मजबुती आणून तसेच फळ्यांच्या जोडांवर डांबराचा वा तत्सम पदार्थाचा लेप देऊन तराफ्याचे जलाभेद्य पेटीत रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला ओबडधोबड फळ्या झाडाच्या मुळ्यांनी बांधीत असत व शेवाळे किंवा लांबी यांनी जोड जलाभेद्य करीत.

तराफ्याचा वरील प्रकारे विकास होत असतानाच लाकडाच्या सांगाड्यावर कातडी घट्ट पसरून तयार करण्यात येणाऱ्या आणि ब्रिटनमध्ये ‘कोरॅकल’ आणि ग्रीनलंडमध्ये ‘उमिआक’ या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या नौकांचाही उदय झाला. अशा नौका वेल्सपासून जपानपर्यंत अद्यापही आढळतात. या नौकांचा उपयोग काही देशांत मासेमारीसाठी वा नद्या अथवा सरोवरे पार करण्यासाठी करतात. स्प्रूस लाकडाच्या चौकटी तयार करून त्यावर बर्च झाडाच्या सालींचे मोठे तुकडे बसवितात आणि सांध्यांतून पाणी आत येऊ नये म्हणून डांबर किंवा सरस वापरतात.

कनू सा नावाने ओळखण्यात येणारी नौका वजनाने हलकी, अरुंद व दोन्ही बाजूंना टोकदार असते. ही नौका पातळसर रुंद वल्ह्याने स्थिर टेकूशिवाय चालविण्यात येते. काही आधुनिक कनूंवर शिडांचाही उपयोग करतात. आद्य स्वरूपाच्या कनू (ब्रिटिश कोरॅकल आणि एस्किमो कायाक यांच्याप्रमाणे) लाकडी सांगाड्यावर कातडे अथवा (उत्तर अमेरिकेतील रेड इंडियन लोकांप्रमाणे) बर्च वृक्षाच्या साली ताणलेल्या स्थितीत घट्ट बांधून बनविली जात असे. अशाच स्वरूपाच्या पण कोरलेल्या नौकांनाही ‘कनू’ ही संज्ञा वापरण्यात येते. रेड इंडियन लोक अरुंद, खडकाळ व आडवळणे घेत जाणाऱ्या जलप्रवाहातून कनू चालविण्यात अतिशय निष्णात असतात. दक्षिण समुद्रातही कोरलेल्या कनू आढळून येतात. न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक काळात वाकातावा नावाची कनू वापरात होती. केरळ राज्यात ओणम् सणाच्या वेळी होणाऱ्या अशाच स्वरूपाच्या नौकांच्या शर्यती प्रख्यात आहेत.

प्रथम पुरेसा मजबूत सांगाडा तयार करून त्यावर वाऱ्याच्या व पाण्याच्या दाबाला टिकू शकेल अशी लाकडी जलाभेद्य रचना करण्याची कल्पना कनू किंवा कोरॅकलपासून निघाली असावी. नौकांच्या बांधणीसाठी पूर्वीपासून वापरण्यात येणाऱ्या दोन पद्धती अद्यापही प्रचलित आहेत. पहिल्या पद्धतीत प्रथम नौकेचे बाह्य कवच तयार करून नंतर त्यात बळकटी आणणारे कणे आणि आडवे आधार घालतात. दुसऱ्या पद्धतीत नौकेचा आतील सांगाडा जरूर त्या आकाराचा व आकारमानाचा प्रथम तयार करून मग त्यावर बाहेरचे लाकडी कवच लावतात. लाकडाच्या फळ्या लावण्याच्याही दोन पद्धती आढळतात. पहिल्या पद्धतीत लाकडाच्या फळ्यांच्या कडा एकमेकींना चिकटवून ठेवून फक्त सांगाड्यालाच बांधण्यात येतात व त्यामुळे बाहेरून नौकेचा पृष्ठभाग सफाईदार दिसतो. या पद्धतीला ‘कॅरव्हेल पद्धत’ म्हणतात. दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक फळीचा काही भाग तिच्या खालच्या फळीच्या वर येईल अशा रीतीने चढवून रचना केलेली असते व त्यामुळे नौकेचा पृष्ठभाग एकमेकांवरील आडव्या थरांसारखा दिसतो. या पद्धतीला ‘क्लिंकर पद्धत’ म्हणतात. पहिली रचना संथ पाण्यात अधिक उपयुक्त असते, तर दुसरी पाण्याच्या लाटांचे तडाखे अधिक प्रमाणात सहन करू शकते. या पद्धती आ. २ (अ) व (आ) मध्ये दाखविल्या आहेत. धातूच्या बंधकांचा वापर सुरू झाल्यावर यूरोपात फळ्या बांधण्याची पद्धती सर्वसामान्य प्रचारात आली.

ईजिप्शियन व फिनिशियन लोकांनी वापरलेल्या नौकांचा उल्लेख सर्वसाधारणपणे मोठ्या जहाजांच्या स्वरूपातच आढळतो. हीरॉडोटस यांनी वर्णन केलेल्या बाभळीच्या (ॲकेशिया) वंशातील एका जातीच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेल्या नाईल नदीवरील नौका मात्र लहान आकारमानाच्या होत्या. विटांच्या बांधकामासारखे एकावर एक रचलेले व आतून एका लांब खांबाला आडव्या आधारांनी बांधलेले ओंडके आणि पपायरस वनस्पतीने जलाभेद्य केलेल्या भेगा अशी त्यांची सर्वसाधारण रचना असे. नाईल व तिच्या उपनद्यांची प्रंचड लांबी, त्यांच्या मार्गातील निरनिराळी नैसर्गिक परिस्थिती व त्यांचे वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्त्व यांमुळे तेथे अनेक प्रकारच्या प्रादेशिक वैशिष्ट्य असलेल्या नौका आढळतात. त्यांपैकी काही अगदी आद्य स्वरूपाच्या आहेत, तर काही अतिशय उच्च विकसित स्वरूपाच्या आहेत. कोरलेल्या नौका, तरंगत्या कळकांचे तराफे व ओंडक्यांचे तराफे अजूनही श्वेत नाईल व तिच्या उपनद्यांवर आढळतात. ओंडक्यांचे तराफे तरंगविण्यासाठी पूर्वी भोपळे किंवा मडकी वापरीत असत. आता यासाठी मोकळी पिपे वापरतात.

नाईल नौकांप्रमाणेच अधिक विकसित झालेला दुसरा प्रकार म्हणजे पूर्व समुद्रात आढळणारा चिनी सँपॅन हा होय. ही नौका नाईल नौकांपेक्षा लांब फळ्यांची तयार केलेली असली, तरी तिच्या नाळेचा आकार नाईल नौकांसारखाच आढळतो. मूलतः तीन ओंडक्यांचा व पुढचे टोक वर उचललेले असा हा एक तराफाच होता आणि त्याचा नौकेच्या स्वरूपात बऱ्याच अगोदरच्या काळात विकास झालेला असावा. सँपॅन हे नाव आता नौकांच्या एका अतिशय मोठ्या वर्गाला प्राप्त झाले आहे. सँपॅनचा तळ सपाट असतो व तिची रुंदी तिच्या लांबीच्या


आ. १. नौकांचे विविध प्रकार : (१) पपायरस नौका, (२) जनावराच्या कातड्याची फुगविलेल्या पिशवीसारखी नौका, (३) झाडाच्या साली किंवा कातडी तुकडे लाकडी सांगाड्यावर जोडून तयार केलेली नौका, (४) न्यूझीलंडमधील कनू प्रकारची वाकातावा नौका, (५) ओंडके जोडून तयार केलेला तराफा, (६) उलांडी किंवा चौक बांधलेली लहान नौका, (७) व्हेनिस येथील गोंडोला, (८) काश्मीरमधील विहार नौका (बजरा), (९) टोनी, (१०) मचवा, (११) पडाव, (१२) बटेला, (१३) होडी, (१४) बट्टेला, (१५) संबूक, (१६) नौरी, (१७) पट्टिमार, (१८) ढांगी.


मानाने बरीच असते. त्यांपैकी काही ९ मी.पर्यंत लांब असून त्यांच्या मधल्या खांबांची लांबी २·५ ते ३ मी. असते. त्यांची माल वाहून नेण्याची क्षमताही चांगली असून शिडाच्या साहाय्याने त्यांना चांगला वेगही मिळू शकतो. वरच्या बाजूला चटयांची अर्धवर्तुळाकार रचना करून माल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था असते. 

चिनी लोकांनी नौकाबांधणीचे प्रमुख प्रश्न सर्वप्रथम सोडविले असण्यासाठी मोठी शक्यता आहे. यूरोपात जलवाहतुकीची कल्पनाही प्रत्यक्षात येण्यापूर्वी काही शतके अगोदर चिनी लोकांनी आपल्या व्यापाराचा भारत व त्याही पलीकडे विस्तार केला होता. नदीवरील लांब नौकांच्या शर्यतीची सुरुवात चिनी लोकांनी सर्व जगात प्रथम केली यात शंका नाही.

थायलंड आणि ब्रह्मदेशात नदी तीरावर राहणाऱ्यांची संख्या मोठी असून उत्सवप्रसंगी नौकांच्या शर्यती तेथे बऱ्याच वेळा होतात. ‘डक बोट’ ही तेथील विशेष प्रकारची नौका असून तिचा सांगाडा कोरलेल्या नौकेच्या अगदी उलट प्रकारचा असतो व ती प्रामुख्याने शिडाच्या साहाय्याने चालवितात.

मलेशियातील लोक उत्कृष्ट नौका बांधणीसाठी प्रसिद्ध आहेत तथापि चांगल्या प्रकारच्या नौका तयार करण्यासारखी तेथील नैसर्गिक परिस्थिती नाही. कोरलेल्या नौका तयार करण्याची पुरातन कला मात्र तेथे अद्यापही टिकून आहे. तोल साधण्यासाठी अशा नौकांच्या सर्व बाजूंनी बांबूचे भारे बांधण्याची पद्धत प्रचलित आहे.

नौका तयार करण्याच्या व त्या चालविण्याच्या पद्धती ईजिप्शियन वा फिनिशियन लोकांनी पूर्वेकडून उचलल्या असाव्यात आणि ग्रीक व रोमन लोकांनी नंतर त्यांचे अनुकरण केले असावे. ग्रीक व लॅटिन साहित्यात नौकांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ग्रीक लोकांत उत्सवप्रसंगी नौकांच्या शर्यतीही होत असत. जहाजे त्यांच्या मागून नौका ओढीत नेत असत किंवा त्यांतून वाहून नेत असत, असा उल्लेख ख्रिस्तपूर्व ग्रीक काव्यात सापडतो. भूमध्य प्रदेशातील ग्रीस व इटली या देशांत अनेक प्रकारच्या सुदंर बांधणीच्या व माल वाहून नेण्याची मोठी क्षमता असलेल्या नौका आढळतात. एड्रिॲटिकमध्ये सर्वत्र आढळणारी सपाट तळाची, उथळ पाण्यातूनही जाऊ शकणारी व मोठ्या प्रमाणावर माल वाहून नेणारी व्हेनिसची प्रसिद्ध गोंडोला ही तराफ्यापासून उदयास आली आहे.

उत्तरेच्या बाजूला अगदी निराळ्याच प्रकारच्या नौका आढळतात आणि त्या जास्त मजबूत अशा कॅरव्हेल पद्धतीने बांधलेल्या असतात. समुद्रात वावरणाऱ्या बहुतेक नौकांचे तळ ओक किंवा फरच्या बऱ्याच रुंद व जाड फळ्यांचे केलेले असतात. या सर्व नौकांचे मूळ व्हायकिंग लोकांच्या प्राचीन नौकांत किंवा पाचव्या शतकातील नौकांत आढळते. उत्तर समुद्र व बाल्टिकमध्ये लहानसहान तपशील वगळल्यास अशाच प्रकारच्या नौका प्रचारात आहेत.

स्कँडिनेव्हियामध्ये उत्खनन केलेल्या व्हायकिंग जहाजांमध्ये त्या जहाजांच्याच लहान प्रतिकृती आढळलेल्या आहेत. नॉर्स लोकांच्या नौकांचे पश्चिम यूरोपभर मच्छीमारी व इतर उपयोगांकरिता अनुकरण झाले आणि त्यांचा प्रभाव अजूनही कित्येक ठिकाणी आढळतो.

ब्रिटनमध्ये मच्छीमारी धंद्यामुळे नौकांच्या रचनेत आणि आकारात अनेक सुधारणा झालेल्या असून क्लिंकर पद्धतीची बांधणी जास्त खर्चिक असूनही अधिक प्रचारात आलेली आहे. इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावर आढळणाऱ्या बऱ्याच नौकांवर डच प्रकारच्या नौकांचा प्रभाव दिसून येतो.

उत्तर समुद्रात नॉर्स नौका वगळल्यास सर्वांत जुन्या प्रकारच्या नौका हॉलंडमध्ये आढळतात व तेथील नौकानयनाच्या पद्धतीतही फारसा बदल झालेला दिसून येत नाही.

एस्किमो लोकांची एकच माणूस बसू शकेल अशी कातडी नौका ‘कायाक’ या नावाने ओळखण्यात येते. ही नौका किनाऱ्यावर वाहून येणारी लाकडे व सीलची कातडी यांपासून बनवितात. हडसन उपसागराच्या पश्चिमेस शिकार करण्यासाठी कॅरिबून कातड्याच्या कायाकसुद्धा वापरतात. ॲल्यूशन बेंटातील कायाकमध्ये दोन-तीन माणसे बसू शकतील अशी तिची रचना केलेली असते.

एकोणिसाव्या शतकात वाफेच्या एंजिनांचा व विसाव्या शतकात अंतर्ज्वलन एंजिनावर (ज्यातील सिलिंडरातच इंधन जाळून कार्यकारी द्रव्याला उष्णता दिली जाते अशा एंजिनावर) चालणाऱ्या मोटारबोटींचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्यामुळे निरनिराळ्या देशांतील वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक नौकांचा वापर कमी होत चाललेला आहे आणि काही प्रकारच्या नौका तर अजिबात प्रचारातून गेलेल्या आहेत. हिंदी महासागर व दक्षिण पॅसिफिकमधील कॅन्व्हास व उलांडी वापरणाऱ्या नौका, दक्षिण अमेरिकेतील नद्यांवर व आफ्रिकेतील सरोवरांत वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या नौका, मद्रास सर्फ बोट इ. नौकांच्या बांधणीत अतिशय कल्पकता आढळते आणि त्यांपैकी अनेक प्रकार मोटारबोटींच्या युगात अजूनही टिकून आहेत. 

भारत: मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेल्या एका खापरावर नौकेचे चित्र आढळून आलेले आहे. वेदांमध्ये नौका, जहाजे व समुद्रपर्यटन यासंबंधी अनेक उल्लेख आहेत ऋग्वेदामध्ये वादळात टिकू शकणाऱ्या व मजबूत अशा ‘प्लव’ नावाच्या नौकेचे वर्णन आहे. अमरकोशात नौबंधन (नांगर), नौकरण (सुकाणू) इ. नाविक शास्त्रातील शब्द आढळतात. अथर्ववेदसंहितेत बळकट, उत्तम बांधणीच्या आणि लाटांना उत्तम प्रकारे तोंड देऊ शकतील अशा नौकांचे वर्णन आहे. मार्कंडेय पुराणात व वराह पुराणात समुद्रावर संचार करणाऱ्या नौकांचे वर्णन आहे. रामायणमहाभारत या पौराणिक ग्रंथांत समुद्रपर्यटनाची व नौकांची वर्णने आहेत. इतर काही ग्रंथांत इ. स. पू. सहाव्या शतकापासूनचे सागरी व्यापारासंबंधीचे उल्लेख आहेत.

ग्रीक सम्राट अलेक्झांडर यांनी पंजाबातील क्षत्री नावाच्या जमातीने तयार केलेल्या, प्रत्येकी ३० वल्ही असलेल्या वा नदीवरून संचार करणाऱ्या नौकांच्या साहाय्याने सु. २,४०० किमी. प्रवास केला. वादळे व खवळलेले पाणी यांना तोंड देऊनही या नौका सुरक्षित राहिल्या. कौटिलीय अर्थशास्त्रात नौकांच्या बांधणीची माहिती दिली आहे. मौर्य काळात माणसे व माल वाहून नेण्यासाठी लाकडाच्या, बांबूच्या, कातड्याने मढविलेल्या टोपलीसारख्या अथवा नुसत्या कातड्याच्या नौका वापरीत असत.

बौद्ध जातककथांमध्ये नौकांचा उल्लेख आढळतो. सांचीच्या एका स्तूपावर (इ. स. पू. दुसरे शतक) कनूसारख्या नौकेचे खोदकाम आहे. त्यात ओबडधोबड फळ्या वाखाने वा दोराने बांधलेल्या दाखविलेल्या असून दोन माणसे वल्हविताना व एक माणूस मधे बसलेला दाखविलेला आहे. अजंठा येथील दुसऱ्या गुंफेत (इ. स. ५२५–६५०) नौकांचे चित्रण असून त्यात राजाची एक विहारनौकाही दाखविलेली आहे. धारच्या भोज राजांनी (इ. स. अकरावे शतक) रचलेल्या युक्तिकल्पतरु या ग्रंथात नौकांच्या प्रकारांचे व त्यांच्या बांधणीचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. वृक्षायुर्वेद या ग्रंथात लाकडांचे प्रकार व त्यांपैकी नौकाबांधणीस कोणते उपयुक्त आहेत, याचे वर्णन दिलेले आहे.

मध्ययुगीन काळात गंगा, ब्रह्मपुत्रा इ. नद्यांमध्ये त्यांच्या मुखापासून हजार किमी. आतपर्यंत मालाची वाहतूक करणाऱ्या नौका तसेच लढाऊ नौकाही प्रचारात होत्या. मंजनिक व संबूची या मालवाहू संथ नौका म्हणून प्रसिद्ध होत्या. कापिल ही शीघ्रगामी उतारू नौका होती. यांशिवाय हिंदू राजांच्या पारू, चतुरी, फस्टा या विहार नौका विख्यात होत्या. मोगल काळात आरमारातील नौकांच्या घ्राब, किस्ती, कोसा, जलवा, परिन्दह, बजरा, पतिला, सालब, भार इ. जाती होत्या.


एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत इंग्रज लोकही भारतीय नौका वापरीत असत. ओलोंको ही उतारूंची ने-आण करणारी नौका होती, तर मसूला ही नौका मोठ्या जहाजांवरचा माल अंतर्गत व्यापारासाठी हलवीत असे. वडगारू ही श्रीमंतांची विहार नौका होती. बजरेवर राहण्यासाठी एक लहान खोली असे. बूरा ही हलकी नौका २० ते ३० वल्ह्यांनी चालविली जाई.

इंग्रजी अंमलात व त्यानंतरही भारतात टिकून राहिलेले नौकांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. टोनी ही मुबंई बंदरात चार-सहा माणसे वाहून नेणारी व लाकूड कोरून तयार केलेली नौका असून उंची वाढविण्यासाठी वरच्या बाजूला तिला फळ्या मारलेल्या असतात व मागच्या दोन मी. भागात माणसे बसण्याची व्यवस्था असते. जॉली बोट ही उथळ किना‍ऱ्यापासून दूर उभ्या असलेल्या मोठ्या जहाजावरील १००–१२५ माणसे वाहून नेणारी नौका आहे. रुंद, बसकी व दोन्ही बाजूंस टोकदार असलेली होडी कोळी लोक मासेमारीसाठी वापरतात. मचवा हा होडीपेक्षा मोठा असून त्याचा मागचा भाग गोल व पुढचा भाग वर आलेला असतो. मालवाहू नौकांपैकी पडाव हा २५ मी. लांब असून तो ६० टनांपर्यंत माल वाहू शकतो. याच कामाकरिता कच्छ व काठेवाडात बटेल नौका बांधली जाते. तिच्या फासळ्यांची टोके वर राहतील अशी ठेवतात. बट्टेला ही कोळसा इ. नाशवंत नसलेला माल वाहणारी आणि जरा ओबडधोबड असलेली नौका आहे. संबूक ही तिच्यापेक्षा मोठी पण तशीच असते व ती इराण, अरबस्तानपर्यंतच्या व्यापाराकरिता वापरली जाते. तिच्यात १५० टनांपर्यंत माल वाहून नेला जातो. नौरी व ढांगी या नौका बलुचिस्तान अथवा सिंधमध्ये बांधल्या जातात आणि किनाऱ्यालगत व्यापारी मालाची ने-आण करतात. पट्टिमार या सामान्यतः कोचीन व रत्नागिरी येथे बांधल्या जाणाऱ्या नौका मुंबईच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर व्यापारासाठी वापरतात. कोठिया, ठांगी व बाघला या मोठ्या मालवाहू नौका असून त्या चितगाँगपासून निकोबारमार्गे मॅलॅगॅसी अथवा उत्तरेस इराणचे आखात व तांबडा समुद्र या मार्गांनी ४०० टनांपर्यंत मालाची वाहतूक करतात.

कोकण किनाऱ्यावरील बंदरांत उतारूंची ने-आण करण्यासाठी अनेक प्रकारच्या नौका वापरण्यात येतात. तेथे १० माणसे बसू शकतील अशा नौकेला होडी, २०–२५ माणसे बसू शकतील अशा नौकेला पडाव आणि ५० माणसे व काही माल नेऊ शकणाऱ्या नौकेला खपाटा म्हणतात. या नौका वळविण्यासाठी साधारणतः एखादे वल्हे सुकाणूसारखे वापरतात परंतु काही ठिकाणी स्वतंत्र सुकाणूही बसवितात.

आधुनिक तराफा : मोठ्या नदीतून किंवा कालव्यामधून सर्व प्रकारचा व्यापारी माल कमीतकमी खर्चात नेण्यासाठी तराफा वापरतात. फार पूर्वीच्या काळात तराफा ओढण्यासाठी किनाऱ्यावरून जाणारे बैल, गाढवे किंवा घोड्यांचा उपयोग करीत असत. भारतामध्ये तराफा ओढण्यासाठी तराफ्यामध्ये मुद्दाम उभ्या केलेल्या खांबांच्या वरच्या टोकाला एक लांब मजबूत दोरी बांधतात व तिचे दुसरे टोक हातात धरून किनाऱ्यावरून चालत जाणारा मजूर ती दोरी ओढत पुढे जातो, त्यामुळे संबंध तराफा पाण्यातून हळूहळू पुढे सरकतो.

यंत्रयुग सुरू झाल्यावर काही ठिकाणी तराफा ओढण्यासाठी किनाऱ्यावर बसविलेल्या रूळ मार्गाने जाणारी विजेची ट्राम वा साध्या रस्तावरून जाणारा ट्रॅक्टर वापरण्यात आला परंतु या दोन्ही पद्धती एकंदरीने गैरसोईच्या वाटल्याने मागे पडल्या. आता बहुतेक सर्व देशांत तराफा किंवा अनेक तराफे जोडून तयार केलेला ताफा चालविण्यासाठी डीझेल एंजिनाने चालणारी लहानशी आगबोट वापरतात. खोल पाण्यातून जाणाऱ्या आगबोटी चालविण्यासाठी आगबोटीच्या मागे फिरणारे एक ते चार मळसूत्री पंखे बसवलेले असतात परंतु उथळ पाण्यातून जाणारी आगबोट चालविण्यासाठी पाण्याचा पंप बसवतात. या पंपातून निघणाऱ्या पाण्याचा झोत आगबोटीच्या मागे सोडतात आणि त्याच्या प्रतिक्रियेने आगबोट पुढे जाते. अशा आगबोटी वळविण्यासाठी विशेष प्रकारची यंत्रणा जोडलेली सुकाणू वापरतात. काही प्रकारांत मळसूत्री पंख्याच्या बाहेरून एक मोठी पोलादी नळी बसवतात. ती यांत्रिक शक्तीने फिरवून आगबोट पाहिजे तिकडे वळविता येते.

व्यापारी माल नेण्याचा तराफा ठराविक लांबी-रुंदीचा, लांबट चौकोनी पेटीसारखा बनवितात. त्याचा तळ अगदी सपाट असतो. त्यामुळे तराफा अगदी उथळ पाण्यातूनही नेता येतो. मोठ्या नदीतून जाताना एकाच मापाचे अनेक तराफे एकमेकांना नीट जुळवून बांधतात व त्यांचा एक ताफा बनवतात. हा ताफा चालविण्यासाठी पूर्वी ओढबोट (टग) वापरीत असत परंतु आगबोटीच्या पंख्याने उत्पन्न केलेला पाण्याचा झोत ताफ्यावर आपटत असल्यामुळे ताफा ओढण्यासाठी बऱ्याच मोठ्या शक्तीची आगबोट वापरावी लागे. आता ताफा चालविणारी आगबोट ताफ्याच्या मागे ठेवतात व तिच्या शक्तीने ताफा पुढे ढकलतात. या रचनेत ताफ्याच्या पुढचा तराफा चौकोनी न करता त्याच्या पुढच्या बाजूला साध्या नावेसारखीच गोलाई दिलेली नाळ वापरतात. त्यामुळे तराफ्यांच्या ताफ्याला होणारा पाण्याचा रोध पुष्कळ कमी होतो.

व्यापारी माल नेण्याचे तराफे पूर्वी नावेप्रमाणेच लाकडी फळ्या जोडून बनवीत असत परंतु आता नवे तराफे आगबोटीच्या बांधणीप्रमाणेच पोलादी खांब आणि पत्रे वापरून बनवतात व सर्व भाग वितळजोड (वेल्डिंग) पद्धतीने जोडतात. त्यामुळे तराफा गळत नाही व त्यात कोणताही द्रव पदार्थ भरून नेता येतो. कच्च्या खनिज तेलासारखे द्रव पदार्थ नेण्याच्या तराफ्यावर उत्तम प्रकारे बसणारे पोलादी पत्र्याचे झाकण असते परंतु कोळसा, मीठ, धान्य, लोखंडी माल असा सुका माल नेण्यासाठी उघड्या जातीचेच तराफे वापरतात. तराफ्यांचा ताफा मोठ्या नदीतून सरळ नेताना फारशी अडचण वाटत नाही परंतु अरुंद कालव्यातून जाताना वळणावर विशेष काळजी घ्यावी लागते, नाहीतर ताफ्यातील तराफा किनाऱ्यावर आपटतो व मोडतो किंवा किनारा ढासळून पडतो. कालव्यातून जाताना तराफ्यांचा वेग साधारणतः ३ ते ५ किमी./तास असतो. यापेक्षा जास्त वेगाने जाणे महाग पडते परंतु मोठ्या नदीच्या पात्रात तराफ्याचा कमाल वेग १० किमी./तास पर्यंत वाढविता येतो.

नौकेची रचना : भरलेल्या मालाचा वा माणसांचा भार पडत असतानाही पाण्यावर तरंगण्याची क्षमता (उत्प्लावकता) नौकेत असावी लागते. ती पाण्याच्या लाटांनी अथवा सोसाट्याच्या वाऱ्याने उलटू नये अशी स्थायी समतोल अवस्था तिला प्राप्त होईल, अशी तिची रचना असावी लागते. तिच्या पाण्यात बुडणाऱ्या भागाचा आकार पाण्याचा रोध कमीतकमी होईल असा असावा लागतो व त्या भागाची उंची शक्य तितकी कमी असावी लागते. चालना देण्यासाठी व इच्छित दिशेला वळविण्यासाठी योग्य त्या प्रेरणा देणारी आवश्यक ती उपकरणे तिच्यावर असावी लागतात. यांशिवाय वाहतुकीच्या मालाची सुरक्षितता आणि नावाडी व प्रवासी यांना लागणाऱ्या सुखसोयी यांकरिता तिच्यात योग्य ती व्यवस्था असावी लागते.


नौकेची उत्प्लावकता ही तिच्या पाण्यात बुडालेल्या भागाने दूर सारलेल्या पाण्याच्या वजनाइतकी असते म्हणजे ती नौकेच्या वजनावर व तिच्या आतील घनफळावर अवलंबून असते. नौकेला स्थायी समतोल येण्यासाठी तिच्या आंदोलन अक्षाच्या खाली तिचा गुरुत्वमध्य असावा लागतो. गुरुत्वमध्य खाली नेण्यासाठी जड सामान तळाशी

कालव्यातून जाणाऱ्या तराफ्यांचे सामान्य आकारमान

कालव्याचा प्रदेश 

प्रकार 

लांबी 

(मी.) 

रुंदी 

(मी.) 

डुबाव 

(मी.) 

उपयुक्त वजन 

(टन) 

इंग्लंड 

अरुंद तराफा 

२२ 

२ 

१ 

३० 

फ्रान्स 

प्रमाणभूत कालव्यातील तराफा 

३९ 

५ 

२·६ 

३०० 

फ्रान्स 

सीन नदीतील तराफा 

८३ 

९·४ 

३·२ 

५००–१,००० 

नेदर्लंड्स 

ऱ्हाइन नदीतील तराफा 

१२२ 

१४·० 

३·६ 

२,०००–३,००० 

भरतात वा नौकेच्या कण्याला शिसे जोडतात. आंदोलन अक्ष गुरुत्वमध्याच्या किती वर नेता येईल हे पाण्याच्या पृष्ठाने नौकेच्या छेदलेल्या क्षेत्राच्या (जलपृष्ठीय छेदाच्या) आकारावर अवलंबून असते. पाण्यात बुडालेल्या भागाच्या केंद्रास उपप्लव केंद्र म्हणतात [→ द्रायुयामिकी नाविक वास्तुशिल्प]. नौकेची रुंदी वाढविल्यास पाण्याचा रोध वाढतो. म्हणून दोन अथवा अधिक नौका अथवा ओंडके (तराफा) किंवा एक नौका व एक ओंडका (उलांडी) ही काही अंतरावर राहतील अशी समांतर एकत्र बांधली म्हणजे स्थिरता वाढते.

आ.२. लाकडी नौकांच्या आडव्या छेदांचे मुख्य प्रकार : (अ) एकावर एक चढवून बसविलेल्या फळ्यांची गोलाई दिलेली काया (क्लिंकर पद्धत) (आ) काठाला काठ चिकटवून बसविलेल्या फळ्यांची गोलाई दिलेली काया (कॅरव्हेल पद्धत) (इ) प्लायवुडाच्या दोन तक्त्यांची गोलाई दिलेली काया (ई) प्लायवुडाचे तक्ते वापरून बनविलेली सरळ रेषीय काया (उ) प्लायवुडाचे तक्ते वापरून बनविलेली सपाट तळाची व सपाट बाजूंची काया.नौकेच्या गतीला होणारा पाण्याचा रोध कमी व्हावा याकरिता तिचा पाण्यात बुडालेला भाग प्रवाहरेषीय असावा लागतो आणि विवक्षित वेगासाठी ही प्रवाहरेखीयता तिन्ही अक्षांत साधावी लागते. याकरिता नौकेचा पुढचा भाग निमुळता व कोचदार करून नौकेच्या दोन्ही बाजूंवरील लांबट भाग प्रवाहरेषीय करतात. त्याचप्रमाणे खालचा आडवा छेद गोलसर करतात. त्यामुळे ठराविक श्रमाने नौकेला जास्त वेग देता येतो परंतु नौकेचा आडवा छेद गोलसर करणे कठीण असते. त्यामुळे प्रत्यक्ष नौका बनविण्यासाठी निरनिराळे छेद वापरण्यात येतात. आ. २ मध्ये लाकडी नौकांच्या आडव्या छेदांचे मुख्य प्रकार दाखविले आहे. ज्या नौका उथळ पाण्यातही तरंगाव्यात अशी अपेक्षा असते व ज्यांच्या बाबतीत वेगाची बाब दुय्यम असते, अशा नौकांचे तळ सपाट करतात.

शास्त्रीय दृष्टीने तयार केलेल्या नौकेचा आकार लहान प्रतिकृतीवर प्रत्यक्ष प्रयोग करून निश्चित करतात. फळ्या जोडून तयार केलेल्या आधुनिक नौकेचा एक सामान्य प्रकार आ. ३. मध्ये दाखविला आहे. या नौकेचा पुढचा निमुळता भाग कोचदार व मागचा आडवा भाग सपाट असतो. नौकेची काया बनविण्यासाठी उत्तम प्रकारच्या लाकडाबरोबरच ॲल्युमिनियमाचे पत्रे, प्लॅस्टिक, रबर, तंतुरूप काच (फायबरग्लास) इ. पदार्थ वापरतात.

आ.३. आधुनिक नौकेचा एक सामान्य प्रकार : (१) नाळ, (२) बैठक, (३) वल्हे बसविण्याचा धारवा.

वल्ही व शिडे : पाणी उथळ (३–४ मी. खोल) असेल, तर एखाद्या लांब काठीच्या साहाय्याने तळाचा टेकू घेऊन नौका ढकलीत नेणे सोपे जाते. समुद्राजवळील उथळ खाड्यांत बहुधा याच पद्धतीचा उपयोग करतात. ही काठी बांबूची असून तिला ‘ताज काठी’ म्हणतात.

पाण्याच्या आधारे नौका लोटण्याकरिता दोन प्रकारची वल्ही म्हणजे हात वल्ही व आडवी वल्ही वापरतात. हात वल्हे हे १–१·५ मी. लांब असून त्याचा दांडा गोलसर व मुठीत बसेल इतपत जाड असतो. त्याचे दुसरे टोक रुंद व सपाट असते. निमुळत्या नाळेकडे तोंड करून हात वल्ह्याने पाण्याचा आधार घेऊन वल्हविल्यावर नौका पुढे खेचली जाते. एकाच वल्ह्याचा उपयोग करावयाचा असेल तेव्हा नावाडी पाठीमागच्या टोकाशी बसतो व वल्हे नौकेच्या दोन्ही बगलांवर आलटून पालटून चालवितो. १·५ मी. लांब, ०·५ मी. रुंद व ०·५ मी. उंच अशा नौकेस एकच वल्हे पुरते. नौका एकच माणूस बसण्याइतकीच रुंद असेल, तर वल्ह्याच्या दोन्ही बाजू सपाट असतात. आ. ४ मध्ये नौका वल्हविण्याची सामान्य पद्धत दाखविली आहे. या पद्धतीत नावाडी नौकेच्या मागच्या बाजूकडे तोंड करून बसतो व दोन्हीकडील वल्ही पाण्यात बुडवून पाणी नौकेच्या मागच्या बाजूला रेटतो आणि त्यामुळे नौका पुढे जाते. ज्या बाजूचे वल्हे मारावे त्याच बाजूला नौका वळत असल्यामुळे वेगळ्या सुकाणूची गरज पडत नाही. वल्ह्यांच्या थोड्या विषम गतीने नौकेच्या दिशेने नियंत्रण करता येते. वल्ही मारणारे नावाडी अधिक असतील, तर त्यांची सम विभागणी करून दोन्ही बगलांवर वल्हवितात. शेवटचा नावाडी सुकाण्याचे काम करतो. नाळेकडे तोंड केले असता उजव्या बगलेस धोस व डाव्या बगलेस दमाण म्हणतात. मोठ्या उंच नौकांसाठी लांब व जड अशी वल्ही वापरावी लागतात. ती नौकेच्या बगलांवर उभ्या खुंट्यांत अथवा अर्धचंद्राकृती लोखंडी कड्यांत (धारव्यांत) बसवून चालविली जातात. त्यांचे कार्य तरफेप्रमाणे होते. या प्रकारात नावाडी सुकाणूकडे तोंड करून बसतो आणि पायांना मजबूत आधार घेऊन आपल्या हाताने सर्व शक्ती वल्ह्यांच्या टोकास लावून ती ओढतो.


आ.४. नौका वल्हविण्याची सामान्य पद्धतशिडे बनविण्यासाठी सुरुवातीस कातडी किंवा झाडांच्या साली अथवा विणलेले तट्टे वापरीत. सध्या घट्ट विणीच्या अतिशय मजबूत कापडाची शिडे बनवितात. शिडांचा उपयोग करून घेणे हे एक विशिष्ट तंत्रच आहे. पाठीमागून येणाऱ्या वाऱ्याचा नौकेला इष्ट दिशेने गती देण्यास उपयोग होतोच पण शिडांची योग्य योजना करून प्रवासाच्या दिशेला तिरप्या किंवा बऱ्याच तिरप्या किंवा बऱ्याच तिरप्या इतकेच नव्हे, तर उलट दिशेने येणाऱ्या वाऱ्याचाही उपयोग करून इष्ट दिशेने गती मिळविणे शक्य होते. अनुकूल दिशेने वारा असेल, तर लहान आकार गुणोत्तराची (उंचीचा वर्ग / क्षेत्रफळ) शिडे मोठ्या आकार गुणोत्तराच्या शिडापेक्षा अधिक प्रेरणा उत्पन्न करतात. एक दोनच शिडे असतील, तर ती मोठ्या आकार गुणोत्तराची व त्रिकोणी असावीत. मोठ्या गलबतावर पुष्कळ शिडे असतात व त्यांत दोन्ही प्रकारची शिडे ठेवतात. वादळी हवेत शिडावर अथवा डोलकाठीवर योणाऱ्या जोरामुळे नौका उलटण्याची भिती असते म्हणून शिडे उतरवून व नांगर टाकून नौकेची लांबी वाऱ्याच्या दिशेत येईल अशी ती उभी करतात. नांगर टाकता न आल्यास एका लहान वादळी शिडाने गती घेऊन सुकाणूच्या साहाय्याने नौका योग्य दिशेत ठेवली जाते. कारण नौकेला थोडी गती असल्याशिवाय सुकाणू प्रतिसाद देत नाही.

आ. ५ - ७ मी. लांबीच्या नौकेचा आराखडा : (अ) बाजूकडून दिसणारे दृश्य (आ) छेद रेषा (प-प) पाण्याची पातळी.नौकांची बाधंणी : नवीन नौका तयार करताना प्रथम आ. ५ मध्ये दाखविल्याप्रमाणे त्या नौकेची प्रमाणशीर आकृती काढतात व तीवर सर्व मापे मांडतात. नंतर त्या मापाप्रमाणे लहानमोठ्या आकारमानाचे लाकडी तुकडे जोडून नौकेचा सांगाडा तयार करतात. हा सांगाडा उलटा करून सपाट मजबूत जमिनीवर ठेवतात व त्याच्या बाहेरून लाकडी फळ्या वा इतर प्रकारच्या तक्त्यांचे तुकडे जोडून नौकेची सर्व काया तयार करतात. कायेचा भाग तयार करण्यासाठी लाकडाच्या फळ्या विशिष्ट रीतीने वाकवाव्या लागतात. फळ्या वाकविण्यासाठी त्या वाफेने गरम करतात व साच्यात दाबून ठेवतात म्हणजे काही वेळाने फळ्यांना साच्याप्रमाणे कायमचा नवा आकार येतो. नौकेच्या फळ्या एकमेंकीना जोडण्यासाठी दोन पद्धती वापरात येतात त्या आ. २ (अ) आणि (आ) मध्ये दाखविल्या आहेत. नौकेची काया फळ्या जोडून करण्याऐवजी प्लायवुडाच्या तक्त्याचे तुकडे जोडून तयार करता येते. या जातीच्या कायांचे तीन प्रकारचे आडवे छेद आ. २ (इ), (ई) व (उ) मध्ये दाखविले आहेत. आ. २ (उ) मध्ये दाखविलेल्या छेदात नौकेचा तळ अगदी सपाट केलेला आहे. त्यामुळे अशा छेदाची नौका अगदी उथळ पाण्यातही चालविता येते परंतु ती चालविताना होणारा पाण्याचा रोध गोलसर छेदाच्या नौकेपेक्षा बराच जास्त असतो.

नौकेचा सांगाडा व बाहेरच्या फळ्या बनविण्यासाठी सागवान, मॅहॉगनी, स्प्रूस, ॲश, ओक, पाइन, लाल सावर, साल, ऐन, बाभूळ, निंब, खैर, आंबा, भेंड इ. झाडांचे लाकूड वापरता येते. फळ्या जोडण्यासाठी उत्तम प्रकारात तांब्याचे चौकोनी छेदाचे खिळे वापरतात. मध्यम प्रकारात सिलिकॉन पोलादाचे गोल खाचा पाडलेले गोल छेदाचे खिळे वापरतात व स्वस्त प्रकारात चौकोनी छेदाचे पोलादाचे घडीव खिळे वापरतात परंतु प्लायवुडाच्या किंवा इतर प्रकारच्या तक्त्यांचे तुकडे जोडण्यासाठी उत्तम प्रकारचा पितळी स्क्रूच वापरतात. फळ्यांचे जोड करताना ते झिरप प्रतिबंधक करण्यासाठी यूरिया-फॉर्माल्डिहाइडापासून बनविलेला कृत्रिम सरस त्यामध्ये भरतात. कायेची बांधणी पूर्ण झाली म्हणजे तिचा बाहेरचा पृष्ठभाग घासून गुळगुळीत करतात व त्यावर प्राथमिक रंगलेप लावतात. हा रंगलेप चांगला वाळला म्हणजे त्यावरून पाहिजे त्या प्रकारचा आकर्षक रंगलेप लावतात व शेवटी नौकेच्या आतल्या बाजूने डांबराचा लेप लावतात. नंतर उत्तम प्रकारात वल्ही बसविण्याचे खिळीवर फिरणारे धारवे ठराविक जागेवर पितळी स्क्रू वापरून पक्के बसवितात. सामान्य प्रकारात धारव्याचे काम दोरीच्या वेटोळ्यानेच भागवितात. नौका चालविण्याची वल्ही तयार मिळतात तीच वापरणे फायद्याचे असते.

तंतुरूप काच किंवा प्लायवुडाच्या तक्त्यापासून नौका तयार करण्याची पद्धत लाकडी नावेच्या पद्धतीपेक्षा अगदी वेगळी आहे. या प्रकारात नावेच्या अभिकल्पाप्रमाणे (आराखड्याप्रमाणे) प्रथम प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून साचा तयार करतात. तो स्वच्छ करून त्यावर मेणाचे रोगण लावतात व त्यावर पॉलिव्हिनिल अल्कोहॉलाचे चूर्ण पसरतात. हा साचा चांगला वाळला म्हणजे त्यावर जिलेटिनाचा ०·१ ते ०·२५ मिमी. जाडीचा लेप चढवतात. नंतर त्यावर मापाप्रमाणे कापलेले तंतुरूप काचेचे तुकडे क्रमाक्रमाने चिकटवत जातात. हे काम करताना दुसऱ्या तुकड्याचा काठ पहिल्या तुकड्याच्या काठावर २५ मिमी. इतका चढवून बसवितात. प्लायवुडाचे तुकडे बसविताना दोन तुकड्यांमध्ये थोडी फट ठेवतात आणि तीत तंतुरूप काचेची पट्टी भरतात.


नंतर या थरावरून जिलेटिनाचा लेप चढवितात व त्यावरून तंतुरूप काचेचा किंवा प्लायवुडाचा दुसरा थर चिकटवितात. दुसरा थर चिकटविल्यानंतर त्यावरून रबरी रूळ दाबून फिरवितात. त्यामुळे आत अडकलेली हवा बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर निघून जाते. बुडबुडे निघण्याचे थांबले म्हणजे पुन्हा जिलेटिनाचा लेप व तक्त्याचा थर बसवून १ ते ३·५ सेंमी. पर्यंत पाहिजे तितकी जाडी तयार करतात. नंतर कोपऱ्यावर आलेले जादा भाग कातरून कोपरे साफ करतात. हे सर्व काम बंदिस्त जागेत करतात व तेथील तापमान ६०º ते ८०º से. ठेवतात. अशा प्रकारे तयार झालेली काया साच्यातून सोडवून घेतात व दहा दिवस तशीच ठेवून मुरू देतात. नंतर कायेवर ज्या ठिकाणी जास्त ताण पडणार असेल तो भाग आणखी काही भाग जोडून प्रबलित करतात. नंतर नावेला लागणारे धातूचे साहित्य बसवितात. मग नावेच्या आतल्या बाजूने पाहिजे तसा आकर्षक रंगलेप लावतात व बाहेरच्या बाजूवर जलरोधी रोगण लावतात. भारतामध्ये काकिनाडा येथे सरकारी कारखान्यात व मुंबई येथे ॲफको कंपनीच्या कारखान्यात अशा नावा तयार करतात. ॲफकोमध्ये प्लायवुडच्या नावाही बनवितात.

नौकांचे विशेष प्रकार : घडीची नौका : काही लहान नौका घडी करून मोटारगाडीतून नेता येण्यासारख्या बनविलेल्या असतात. त्यांचा आतला सांगाडा ॲल्युमिनियमाच्या नळ्या जोडून बनविलेला असतो व त्याची घडी करता येते. या सांगाड्यावरून रबराची काया बसवितात. या कायेचा आकार नौकेसारखाच असतो त्यामुळे सांगाडा नीट उघडून बसविला म्हणजे रबरी नौका चांगली बळकट होते व तिच्यामध्ये एक दोन माणसे बसून ती साध्या नौकेप्रमाणेच वल्हविता येते.

चपट्या तळाची नौका : (पंट). अगदी उथळ पाण्यातही ताज काठीने चालविता येईल अशी चपट्या तळाची नौका भारतातील अनेक राज्यांत सरोवरामध्ये वापरण्यासाठी फार पुरातन काळापासून बनविण्यात येते. अशी नौका काही सपाट फळ्या जोडून तयार करतात व त्यांच्या सांध्यामध्ये डिंक किंवा डांबर भरून ते झिरपबंद करतात. ही सर्वसाधारणपणे चौकोनी आकाराची असते. अशी नौका सुरक्षित बंदराच्या अंतर्गत भागातही वापरता येते. यांचा उपयोग उथळ पाणी असलेल्या खाड्या, अगदी किनाऱ्याजवळचा समुद्राचा भाग, नद्या व सरोवरे अशा ठिकाणी होऊ शकतो. कलकत्त्याला हुगळी नदीत अशा नौका सर्रास वापरतात. काश्मीरमध्ये वापरात असलेली वजरा (आराम नौका), माल्टामध्ये वापरात असलेली डायसा आणि व्हेनिसमध्ये वापरात असलेली गोंडोला या सर्व नौका याच जातीच्या आहेत.

जहाजावर ठेवावयाच्या नौका : मोठे जहाज किनाऱ्यापासून दूर अंतरावर समुद्रात उभे केले म्हणजे किनाऱ्याकडे जाणाऱ्या उतारूंच्या सोयीसाठी मोठ्या जहाजावर काही नौका ठेवलेल्या असतात. त्या पाहिजे तेव्हा जहाजाच्या गच्चीवरून समुद्रात सोडतात आणि काम झाल्यावर यारीच्या साहाय्याने पुन्हा वर उचलून घेतात. या नौकांचा मुख्य उद्देश उतारूंचे व खलाश्यांचे संकटकाळात प्राणरक्षण करणे हा असतो. या नौका वल्ह्याने, शिडाने व काही ठिकाणी यांत्रिक शक्तीने चालवितात. त्यांमध्ये १० ते ३० माणसे बसण्याची सोय असते. घडीच्या नौकाही जहाजावर जीवरक्षक नौका म्हणून वापरतात. या नौकांत प्रसंगोपयोगी सामग्री म्हणजे पिण्याचे पाणी, प्राणरक्षक पट्टे इ. सदैव सज्ज ठेवण्यात येते. [→ प्राणरक्षक नौका].

विहारनौका : (यॉट). काही नौका मुद्दाम जास्त रुंद करतात व त्यांच्या मध्यभागी उत्तम रीतीने सजविलेला वरचा मजला बांधतात. तेथे करमणुकीचे कार्यक्रम करतात. वाराणसी येथे वापरीत असलेल्या काही नौकांच्या मध्यभागात हौदासारखी बंदिस्त खोलगट जागा तयार करतात व तीमध्ये बाहेरचे पाणी घेण्याची सोय करतात. अशा बंदिस्त हौदात निर्धास्तपणे स्नान करता येते. अशा प्रकारच्या अनेक सोयी असलेल्या मोठ्या नौका किनाऱ्यापासून दूर नेऊन एकांतात उभ्या करतात. अशा नौका चालविण्यासाठी उथळ पाण्यात लांब काठीचा किंवा कळकाचा उपयोग करतात परंतु खोल पाण्यात त्या वल्ह्यांनी किंवा शिडानेही चालविता येतात. अशा नौका लहान नावेपासून एच. एम. एस. ब्रिटानियासारख्या प्रचंड नौकेच्या आकारमानाच्या असू शकतात.

शर्यतीच्या नौका : नौकाविहार हा एक फार उत्साहवर्धक छंद आहे. यामध्ये चांगली करमणूक होऊन चागंला व्यायामही होतो. काही नौका शक्य तितक्या वेगाने नेण्यासाठी बनविलेल्या असतात. त्या उत्तम जातीच्या हलक्या लाकडापासून बनवितात. त्यांची रुंदी अगदी कमी ठेवतात व लांबी जरूरीप्रमाणे पाहिजे तितकी ठेवतात. अशा नौकांचे पुढचे टोक निमुळते व कोचदार असते. या नौका वल्ह्याने चालवितात. काही ठिकाणी शिडाने चालणाऱ्या नौकाही शर्यतीमध्ये वापरण्यात येतात. [→ नौकाक्रीडा शीडजहाज शर्यती].

लहान वल्ह्यांची नौका : शर्यतीत वापरण्यात येणाऱ्या वल्ह्यांपेक्षा लहान वल्ही वापरण्यात येतात अशा नौकेला ‘स्कलिंग बोट’ असे नाव आहे. अंतर्गोल पाती असलेली ही वल्ही दोन्ही हातांनी सहज चालविता येतील अशी बसवितात. तळी व सरोवरे यांच्यावर अशा नौका बहुधा आढळून येतात.

नौकांच्या सुट्या भागांचा संच : पुष्कळ हौशी मंडळींना आपली नौका स्वतःच तयार करण्याची इच्छा असते परंतु सर्व प्रकारचे लाकूडकाम करून नौका तयार करणे हे सामान्य माणसाला शक्य होत नाही. म्हणून काही मोठ्या कंपन्या नौका बांधणीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचा संच पुरवितात व नौका बांधणीसाठी लागणारे सचित्र सूचनापत्रकही देतात. ते वाचून कोणाही सामान्य माणसाला आपल्या आवडीची नौका सुटे भाग जोडून तयार करता येते. या संचामध्ये नौकेच्या आराखड्याप्रमाणे अंक घातलेल्या सर्व लाकडी फळ्या, खिळे, स्क्रू, डिंक, सरस, रंगलेप वगैरे सर्व साहित्य दिलेले असते.

पहा : जहाज मोटारबोट.

संदर्भ : 1. Bell, G. Building Your Own Boat, London, 1960.

   2. Hornell, J. Water Transport : It’s Origin and Early Evolution, New York, 1946.

   3. Landstrom, B. The Ship, London, 1961.

   4. Shridharan,  K. A  Maritime History of India, New Delhi, 1965.

 

इनामदार, य. न. जावडेकर, व. वि. तांबे, मु. शं. ओक, वा. रा.