तूळ : भारतीय राशिचक्रातील सातवी रास. हिच्यात चित्रा नक्षत्राचे २, स्वाती व विशाखा नक्षत्रांचे ३ चरण (चतुर्थांश) येतात. या निरयन [संपातचलन लक्षात न घेतलेल्या → संपातचलन] राशीमध्ये सूर्य १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या मुदतीत असतो. पूर्वी या ठिकाणाच्या तारकासमूहात शरत् संपात बिंदू होता. या ठिकाणी सूर्य असताना दिवस व रात्र समसमान असतात. त्यामुळे तूळ (तराजूदर्शक) हे नाव दिले गेले असावे. आता संपात कन्या राशीत आहे. चिनी ज्योतिषशास्त्रात तूळ राशीचा संबंध प्रशासनाशी जोडला जातो. फलज्योतिषीय दृष्ट्या या राशीचा स्वामी शुक्र असून शनी उच्चीचा असतो. हा तारकासमूह होरा १५ ता. व १५° द. क्रांती [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] यांच्या आसपास आहे. या समूहाच्या सीमेवर कन्या, वृक, वृश्चिक, भुजंगधारी व भुजंग असे तारकासमूह येतात. याचे सर्व क्षेत्र खगोलीय विषुववृत्ताच्या लगत पण दक्षिणेस आहे. यातील झुबेन एल् गेनुबी हा आल्फा तारा विशाखा नक्षत्रातील प्रमुख तारा आहे आणि तो बरोबर क्रांतिवृत्तावर (सूर्याच्या वार्षिक भासमान गतिमार्गावर) येतो. हा तारकायुग्म आहे. बीटा म्हणजे झुबेन एल् शमाली व डेल्टा हे तारे रूपविकारी (ठराविक कालावधीने तेजस्विता कमी होणारे) आहेत. हा समूह मे महिन्याच्या सुरुवातीस मध्यरात्रीस याम्योत्तर वृत्तावर येतो.
ठाकूर, अ. ना.